(Source: ECI/ABP News/ABP Majha)
महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा, साताऱ्यातील शेतकरी पुत्राचा लंडनमध्ये सन्मान
Satara News : शेतकरी घरातून येणाऱ्या प्रवीण निकम याचा लंडनमध्ये सन्मान झाला. ब्रिटनमधल्या 75 महत्त्वाच्या व्यक्तीमध्ये त्याचा समावेश करण्यात आला आहे.
Satara News : साताऱ्यातील शेतकरी पुत्राला लंडनमध्ये ब्रिटिश कॉन्सिलतर्फे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त प्रभावशाली काम करणाऱ्या देशातील 75 युवकांचा सन्मान ब्रिटिश कौन्सिल आणि नॅशनल इंडियन स्टुडंट अँड अॅलूम्नी युनियन माध्यमातून लंडन येथे करण्यात आला. यामध्ये महाराष्ट्रातील प्रवीण निकम याचाही समावेश आहे. लंडनमध्ये उच्च शिक्षण घेतल्यानंतर प्रवीण सध्या समता सेंटर या संस्थेच्या माध्यमातून उच्च शिक्षणासाठी काम करत आहे. महाराष्ट्रातून प्रवीण निकम यांच्यासह चैतन्य मारपकवार, राजू केंद्रे आणि विवेक गुरव यांचाही लंडनमध्ये सन्मान करण्यात आला.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त प्रभावीपणे काम करणाऱ्या 75 प्रतिभावान युवकांचा सन्मान ब्रिटिश कौन्सिल व नॅशनल इंडियन स्टुडंट अँड अॅलूम्नी युनियन माध्यमातून करण्यात आला. या 75 युवकांमध्ये पुण्याच्या प्रवीण निकमची निवड झाली. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला लंडन येथे हा गौरवसोहळा पार पडला.
शिक्षक प्रशिक्षण, दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना विदेशात असणाऱ्या उच्चशिक्षणाच्या संधीबाबत मार्गदर्शन, 53 देशांची समिती असणाऱ्या राष्ट्रकुलचा प्रतिनिधी म्हणून काम इ.ची दखल ब्रिटिश कौन्सिल व नॅशनल इंडियन स्टुडंट अँड अलूम्नी युनियन यांनी घेतली. भारताचे निवडणूक आयोगाचे माजी आयुक्त डॉ. एस. वाय. कुरेशी, ब्रिटिश कौन्सिल शिक्षण विभाग संचालिका ऋतिका पारुक, ऑक्सफर्ड फेलो शाहीद जमील, रीडिंग विद्यापीठ कुलगुरू पाल इनमन, विद्यापीठ संघटनेतील प्रमुख कार्यकारी अधिकारी विविनी स्टर्न या परीक्षकांनी भारतातील ब्रिटनमध्ये शिक्षण घेतलेल्या 75 युवकांची निवड या पुरस्कारासाठी केली आहे. ब्रिटिश कॉन्सिल, ब्रिटिश सरकारच्या उच्च-शिक्षण विभाग आणि युके राष्ट्रीय विद्यार्थी संघटनेच्या यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या 75 वर्षात ब्रिटन मध्ये शिकलेल्या भारतातील ७५ माजी विद्यार्थी ज्यांचं वेगेवेगळ्या क्षेत्रांत ठसा आहे, त्यांचा ह्या ठिकाणी सत्कार करण्यात आला आहे, सदर अवार्ड मध्ये अभिनेत्री परिणीती चोप्रा, राज्यसभा सदस्य राघव चड्डा, आदर पूनावाला इत्यादी प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वाचा समावेश आहे.
मूळ साताऱ्यातील आसू पवारवाडीतील असणारे प्रवीण यांचे वडील नोकरीसाठी शेती सोडून पिंपरी-चिंचवडला स्थायिक झाले. वडील पिंपरीतील एका कंपनीत कामगार तर आई गृहिणी. आर्थिक संकटांना न घाबरता, दिवाळीतील उटणे, फिनेल विकून, जोडधंदे करून आपल्या मुलांचे शिक्षण चालू ठेवलं. पिंपरी-चिंचवडच्या कामगार वसाहतीत जेमतेम परिस्थितीत लहानाचा मोठा झालेल्या एका तरुणाने नामांकित चेवेनिंग शिष्यवृत्तीच्या माध्यमातून शिक्षणासाठी थेट लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सपर्यंत गरुडझेप घेतली. परदेशातील उच्च शिक्षण पूर्ण करून सहजासहजी मिळणारी मोठ्या पगाराची नोकरी न स्वीकारता भारतात पूर्णवेळ ग्रामीण आणि वंचित बहुजन समाजातील तरुणाईला उच्च शिक्षणाच्या माध्यमातून सक्षम करण्यासाठी त्याने समता केंद्राची स्थापना केली. समता केंद्र ही नुसती शिक्षणावर काम करणारी संस्था नाही तर नेतृत्व, कौशल्य निर्माण करणार एक केंद्र बनत आहे. योग्य मार्गदर्शनाअभावी विद्यार्थ्यांना चांगल्या विद्यापीठांमध्ये अर्ज करता येत नाहीत. आर्थिक अडचणी किंवा प्रवेश प्रक्रिया किंवा शिष्यवृत्तीची माहीत नसते. हीच असमानता ज्ञानाने दूर करून प्रतिष्ठित विद्यापीठांमध्ये बहुजन तृतीयपंथी व दुर्बल तरुणाईला प्रतिनिधित्व कसं मिळेल यासाठी समता सेंटर काम करत आहे. कौशल्य विकास कार्यक्रमही राबवत आहे. तळागाळातील विद्यार्थ्यांना शिक्षणातील विषमता संपवून भारत आणि जागतिक प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थांमध्ये प्रतिनिधित्व मिळावे आणि भारतातील शिक्षकांचा क्षमता विकास या दोन पातळीवर रचनात्मक काम तो करीत आहे.