(Source: Poll of Polls)
नेत्यांच्या घरच्या लग्नांत नियमांची पायमल्ली, लग्नसोहळ्यात हजेरी लावणारे नेते पॉझिटिव्ह
नेतेमंडळीच निर्बंध लावतात आणि कार्यक्रमांमध्ये तेच नियम गुंडाळून ठेवतात. त्यामुळे नियम फक्त सामान्य जनतेसाठीच मर्यादित आहेत का ? असा प्रश्न आता उपस्थित होतोय.
मुंबई : एकीकडे राज्यावर निर्बंधांचं सावट आहे, मात्र दुसरीकडे लोकप्रतिनिधीच सरकारने घालून दिलेल्या नियमांना पायदळी तुडवताना दिसून येतंय. राज्यात असे एकदोन नव्हे तर चार सोहळे गेल्या दोन दिवसांत समोर आलेत. नाशिकमध्ये बुधवारी सायंकाळी कन्नड विधानसभेचे शिवसेना आमदार उदयसिंह राजपूत यांच्या मुलाचा विवाह सोहळा पार पडला. तर नाशिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांच्या मुलीचा विवाह सोहळा गंगापूर रोडवरील गीता लॉन्समध्ये पार पडला. या दोन्ही सोहळ्याना वऱ्हाडी मंडळी आणि नेतेमंडळीनी तुफान गर्दी केली होती.
शिवसेना खासदार संजय राऊत, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार हे देखिल या सोहळ्यात उपस्थित होते. विशेष म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर यावेळी मास्कही नव्हते. तर तिकडे भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्या मुलाच्या लग्नसोहळ्यातही नियमांचा बोजवारा उडाला. विशेष म्हणजे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील यासह अनेक नेते सुद्धा विनामस्क उपस्थित होते. तर तिकडे पनवेलमध्ये उपमहापौरांच्या वाढदिवसाला कोरोना नियम पायदळी तुडवले गेले भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत सर्व नियमांची पायमल्ली झाली. आणि हे सर्व दृश्य बघून नियम फक्त सामान्य जनतेसाठीच मर्यादित आहेत का ? असा प्रश्न विचारला जातोय.
भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना कोरोना संसर्ग झालाय आहे. त्यांनी अहमदनगरमधील रुग्णालयात केलेल्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आलाय. यात गंभीर बाब अशी की, विखे पाटील यांनी नुकत्याच संपलेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनाला हजेरी लावली होती. तसंच भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्या मुलाच्या लग्नातही विखे पाटील यांनी काल उपस्थिती लावली होती. आणि या सोहळ्यात विखे-पाटील चक्क विनामास्क वावरताना दिसले होते. तर भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनाही कोरोना संसर्ग झाला आहे. त्यांनी केलेली कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आलेली आहे. हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता हिचा विवाह 28 डिसेंबरला पार पडला होता. या विवाह सोहळ्याला आलेल्या सुप्रिया सुळे यांना कोरोना संसर्ग झाला होता. त्यांच्या कुटुंबाची कोरोना चाचणी काल पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर हर्षवर्धन पाटल यांनी चाचणी केली असता त्यांनाही कोरोना संसर्ग झालेला आहे.
नेतेमंडळीच निर्बंध लावतात आणि अशा कार्यक्रमांमध्ये तेच नियम गुंडाळून ठेवतात. त्यामुळे नियम फक्त सामान्य जनतेसाठीच मर्यादित आहेत का ? असा प्रश्न आता उपस्थित होतोय. नियम मोडल्यास तात्काळ गुन्हे दाखल होत असताना मंत्र्यांना नियमावली नाही का असा सवाल आता विचारण्यात येत होता.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
शिवसेना आमदार उदयसिंह राजपूत यांच्या मुलाच्या लग्नात 'कोरोना'च्या नियमांचा फज्जा