(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Raj Thackeray FIR : तोंडात बोळा कोंबा ते अभी नही तो कभी नही, पोलिसांच्या FIR मधील शब्द आणि शब्द जसाच्या तसा
Raj Thackeray Fir : औरंगाबादमध्ये राज ठाकरेंनी केलेल्या एकूण भाषणातील शेवटच्या साडेचार मिनिटाच्या भाषणामुळे राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर औरंगाबादच्या सिटी चौकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या दाखल गुन्ह्याची प्रत माझाच्या हाती लागलीय. औरंगाबादमध्ये राज ठाकरेंनी केलेल्या एकूण भाषणातील शेवटच्या साडेचार मिनिटाच्या भाषणामुळे राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर दुसरीकडे दुसरीकडे पोलीस राज ठाकरे यांना कलम 149 अंतर्गत नोटीस देण्यासाठी राज ठाकरेंच्या निवासस्थानी पोहचण्याची शक्यता आहे.
औरंगाबादच्या सिटी चौक पोलिस स्टेशनमधील पोलीस उपनिरीक्षक गजानन इंगळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या गुन्ह्यात राज ठाकरे हे मुख्य आरोपी आहेत तर औरंगाबादमधील खडकेश्वर परिसरातील मराठवाडा सांस्कृतिक क्रीडा केंद्राच्या मैदानावरील राज ठाकरे यांच्या सभेचे आयोजक राजीव जावळीकर यांचा समावेश सहआरोपी म्हणून करण्यात आला आहे.
1 मे रोजी झालेल्या गुन्ह्याची नोंद तब्बल दोन दिवसांनंतर म्हणजे आज 3 तारखेला करण्यात आली आहे, एफआयआरमधील तरतुदींनुसार या विलंबासाठी सीसीटीव्ही फूटेज तसंच व्हिडिओ रेकॉर्डिंगची तपासणी करण्यासाठी दोन दिवसांचा वेळ लागल्याचं या एफआयआरमध्ये नमूद करण्यात आलंय.
राज ठाकरेंवर दाखल झालेल्या गुन्ह्याच्या प्रतीत काय म्हटले?
माझी पोलिसांना नम्र विनंती आहे. जर सभेच्या वेळेला बांग सुरु करणार असतील, आपण आत्ताच्या आत्ता ताबडतोब तोंडात बोळा कोंबावा. यांना जर सरळमार्गाने समजत नसेल, तर मग त्याच्यानंतर महाराष्ट्रात काय होईल, मला माहित नाही. येथे जे कुणी पोलीस अधिकारी असतील, तर त्यांना मी सांगतो, की आत्ताच्या आत्ता पहिले जाऊन बंद करा... आणि माझं एक म्हणणं आहे, या बाबतीत त्यांना जर समजा, सरळ भाषेत समजत नसेल ना... तर एकदा काय ते होऊन जाऊ द्या.... अजिबात शांत बसता कामा नये तुम्ही. संभाजीनगरच्या पोलिसांना माझी नम्र विनंती. परत करतोय मी... आपल्याला परत सांगतोय... ते जर या पद्धतीने वागणार असतील... त्यांना जर सरळ सांगून समजत नसेल... तर महाराष्ट्राच्या मनगटात काय ताकद आहे... ती यांना एकदा दाखवावीच लागेल. आणि म्हणून माझी पोलिसांना विनंती आहे... की, ही पहिल्यांदा थोबाडं बंद करा या लोकांची. माझी संपूर्ण देशवासियांना, अख्ख्या देशातल्या माझ्या हिंदू बांधवांना, भगिनींना माझी विनंती आहे की, बिलकुल मागचा पुढचा काही विचार करु नका. हे भोंगे उतरले गेलेच पाहिजेत. सगळ्या धार्मिक स्थळांवरचे. मग मंदिरावरचे असले, तरी उतरले गेले पाहिजेत. पण यांचे उतरल्यानंतर... आपण सगळे जण. आज ही परिस्थिती आहे... अभी नहीं तो कभी नहीं.... माझ्या देशातल्या सर्व देशवासियांना व हिंदू बांधवांना, भगिनींना विनंती आहे की, जर हे 3 तारखेपर्यंत ऐकले नाहीत... तर, 4 तारखेला मला हनुमान चालिसा ऐकू आलीच पाहिजे. पोलिसांकडून वाटल्यास परवानगी घ्या. रितसर परवानगी घ्या. लाऊडस्पीकरची परवानगी घ्या. त्यांना द्यावी लागते. पण ती परवानगी घेऊन, आपण सगळ्या गोष्टी जोरात कराल, सामाजिकदृष्या हा इतक्या वर्षांचा प्रलंबित प्रश्न हा कायमचा निकाली लागेल, यासाठी आपण सगळ्यांनी हातभार लावावा.
सभेचे CCTV फुटेज रेकॉर्डिंगची तपासणी व अवलोकनात दिसून आले आहे. नमुद भाषणातील वक्तव्यामुळे सभेला उपस्थित असणा-या जनसमुदायाला कारावासाच्या शिक्षेस पात्र असणारा अपराध करण्यास चिथावणी मिळेल, त्यांच्याकडून गंभीर शांतताभंग होईल, त्यांच्याकडून सार्वजनिक प्शांतता विरोधी अपराध घडेल. जर दंगलीसारखा अपराध घडेल हे माहित असूनही बेछुट, चिथावणीखोर वक्तव्य करुन पोलीस आयुक्त कार्यालय औरंगाबाद शहरतर्फे त्यांना लेखी पत्राने घालून दिलेल्या व अटी व शर्तीचा भंग केला, म्हणून मनसे अध्यक्ष राज ठाकरे, संजीव जावळीकर आणि इतर संयोजकांविरुध्द भादंवि कलम 116,117,153 सह कलम 135 महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 प्रमाणे कायदेशीर फिर्याद करण्यात आली आहे