(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पावसाचा हाहा:कार, आतापर्यंत 102 जणांचा मृत्यू
Maharashtra Rain : महाराष्ट्र मुसळधार पावसामुळे राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी 1 जूनपासून आतापर्यंत 102 लोकांचा बळी गेला आहे. राज्यामध्ये 14 एनडीआरएफ (NDRF) आणि 5 एसडीआरएफ (SDRF) पथकांकडून बचावकार्य सुरु आहे.
Maharashtra Heavy Rain : देशभरात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक भागांमध्ये पाणी साचलं आहे. मुसळधार पावसामुळे (Water Logging) रस्ते पाण्याखाली जाऊन अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. भूस्खलन (Landslide) तसेच वीज पडल्याने (Lightning) अनेकांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र मुसळधार पावसामुळे राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी 1 जूनपासून आतापर्यंत 102 लोकांचा बळी गेला आहे. राज्यामध्ये 14 एनडीआरएफ (NDRF) आणि पाच एसडीआरएफ (SDRF) पथकांकडून बचावकार्य सुरु आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरुच आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची संततधार सुरु आहे. गडचिरोली, भंडारा, पालघर, चंद्रपूर, गोंदिया, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पुण्यासह मुंबईतही जोरदार पाऊस सुरु आहे. यावर्षी आतापर्यंत पावसाने 100 हून अधिक जणांचा बळी घेतला आहे.
पावसामुळे 183 जनावरांचा मृत्यू
राज्यात पावसाचा फटका माणसांसह जनावरांनाही बसला आहे. अनेक जनावरांना पावसामुळे जीव गमवावा लागला आहे. आतापर्यंत मुसळधार पावसामुळे सुमारे 183 जनावरांचा मृत्यू झाला आहे. हा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पूरजन्य परिस्थिती पाहता राज्यात विविध भागांमध्ये एनडीआरएफ (NDRF) आणि एसडीआरएफ (SDRF) पथकं तैनात करण्यात आली आहेत. 14 एनडीआरएफ आणि 5 एसडीआरएफ पथकांकडून बचावकार्य सुरु आहे. आतापर्यंत 11 हजार 836 जणांना पूरातून सुखरुप बाहेर काढण्यात आलं आहे.
पावसापासून उसंत मिळण्याची शक्यता
मागील काही दिवस सतत पडणाऱ्या पावसापासून पुढचे काही दिवस उसंत मिळण्याची शक्यता आहे. हवामान विभागाकडून राज्यातील बहुतेक जिल्ह्यांना येलो आणि ग्रीन अलर्ट देण्यात आला आहे. हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे की, राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर कमी असेल.
महत्त्वाच्या इतर बातम्या