Maharashtra Rain : राज्याच्या विविध भागात पावसाची दमदार हजेरी, काही ठिकाणी शेती पिकांना फटका
राज्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळताना दिसत आहे. या पावसामुळं काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत.
Maharashtra Rain : राज्याच्या अनेक भागात पावसानं धुमाकूळ घातला आहे. या पावसामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत असून, अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पूर आल्यानं नागरिकांचं मोठं नुकसान झालं आहे. तसेच शेतीला देखील मोठा फटका बसला आहे. विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा या जिल्ह्यात गंबीर स्थिती आहे. तसेच मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली या भागात देखील पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. त्याचबरोबर मुंबईसह ठाणे, कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यातही चांगला पाऊस पडत असल्याचं चित्र दिसत आहे. या पावसामुळं काही ठिकाणी शेती पिकांना मोठा फटका बसला आहे.
आंबोली घाटात झाड कोसळलं
सिंधुदुर्ग जिल्ह्यातही जोरदार पाऊस कोसळत आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली घाटात झाड कोसळल्याची घटना घडली. यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. सध्या तिथे एकेरी वाहतूक सुरु आहे. दरम्या, झाड बाजूला करण्याचे प्रयत्न सरु आहेत.
इंदापूर तालुक्यात जोरदार पाऊस
इंदापूर तालुक्यातही जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळं शेतकरीसमाधानी झाले आहेत. दरम्यान, वरकुटे खुर्द गावात निरा डावा कालव्याला मोठे भगदाड पडले असून लाखो लिटर पाणी वाया जात आहे. यामध्ये शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांसह शेततळ्यांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. वरकुटे खुर्द पत्रेवस्ती या ठिकाणी निरा डावा कालव्याच्या एक भराव अचानक खचून त्यातून लाखो लिटर पाणी वाया जात आहे. पाण्याच्या वाढत्या प्रवाहामुळं कालवा मोठ्या प्रमाणात खचू लागला आहे. वाहून जाणारे पाणी थेट शेतकऱ्यांच्या ढोबळी, मका,ऊस,डाळिंब आधी पिकांमध्ये गेले असून शेततळ्याचे मोठे नुकसान झाले आहे.
अमरावती जिल्ह्यातही जोरदार पाऊस
अमरावती जिल्ह्याला वरदान असलेल्या अप्पर वर्धा धरणाची 13 गेट उघडण्यात आली आहेत. तेरापैकी 9 गेट 70 सेंटिमीटरने तर चार गेट 60 सेंटिमीटरने उघडण्यात आली आहेत. त्यामधून 1 हजार 392 दश लक्ष घन मीटर क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे.
चंद्रपूर शहर परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता
चंद्रपूर शहर आणि जिल्ह्यातील पूरस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. वर्धा, अमरावती, भंडारा जिल्ह्यातून आणि चंद्रपूरच्या इरई धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. शहराला वळसा घालणाऱ्या इरई नदीचे बॅक वॉटर सखल भागात शिरण्याची शक्यता आहे.