राज्यात पावसाचा जोर वाढला! नदी नाल्यांना पूर, अनेक गावांचा संपर्क तुटला, धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ
राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अनेक भागात मुसळधार पाऊस सुरु असून, नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत.

Maharashtra Rain : राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अनेक भागात मुसळधार पाऊस सुरु असून, नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. तर काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली असून, काही गावांचा संपर्क देखील तुटला आहे. काही भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे.
हिंगोली जिल्ह्यात जोरदार पाऊस, अनेक गावांचा संपर्क तुटला
हिंगोली जिल्ह्यांमध्ये आज सकाळपासूनच कुठे हलक्या तर कुठे जोरदार स्वरूपाचा पाऊस पडतोय. या पावसामुळे हिंगोली जिल्ह्यातील भंडारी गावाजवळ असलेल्या ओढा पूर आल्याने पुराचे पाणी रस्त्यावरून वाहून जात होतं परिणामी रस्त्यावरील वाहतूक बंद झाली आहे. या रस्त्यावरून सायंकाळच्या सुमारास सेनगाव हिंगोली या शहरात कामानिमित्त गेलेल्या अनेक नागरिकांना गावाकडे जाता येत नाही तर शाळा सुटल्यानंतर मुलींना गावी सोडणारी परिवहन विभागाची बस सुद्धा या पुरामुळे अडकून बसली आहे. सध्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणामध्ये प्रवासी ताटकळत थांबले आहेत. परिणामी पुढील अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे.
जालना
जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातल्या वजीरखेडा गावात पावसामुळे एसटी महामंडळाची बस थेट शेतात जाऊन फसल्याची घटना घडली. विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी ही बस रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे खड्ड्याचा अंदाज न आल्याने चालकाचे नियंत्रण सुटून शेतात घसरली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. घटनेनंतर गावकऱ्यांनी तातडीने मदतीला धाव घेत, तासभराच्या प्रयत्नांनंतर बस शेताबाहेर काढण्यात यश मिळवलं.
परभणी शहरासह जिल्ह्यात जोरदार पाऊस
परभणी शहरासह जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला आहे. शहरातील रस्त्यांवर पाणी साचले आहे. जिल्ह्यातील पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. परभणी जिल्ह्यामध्ये मागच्या तीन दिवसांपासून सूर्यदर्शन नाही दोन दिवस पावसाच्या हलक्या सरी कोसळल्यानंतर आज तिसऱ्या दिवशी शहरासह जिल्हाभरामध्ये जोरदार पाऊस बरसतोय. मागच्या दोन तासांपासून पावसाचा जोर मोठ्या प्रमाणावर वाढलाय. यामुळे परभणी शहरातील रस्त्यांवर जागोजागी पाणी साचायला सुरुवात झालेली आहे. ज्यामुळं परभणीकरांना या पाण्याचा मोठा त्रास सहन करावा लागतो. तर दुसरीकडे जिल्ह्यातील पिकांनाही मोठा दिलासा मिळालाय.
बुलढाणा जिल्ह्यात मोठा पाऊस, काच नदीला पूर, पिंपरी सरहद शिवारातील शेती तिसऱ्यांदा पाण्याखाली
बुलढाणा जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसानंतर वाशिमच्या रिसोड तालुक्यातील पिंपरी सरहद गावाजवळून वाहणाऱ्या काच नदीला पुन्हा एकदा पूर आला आहे. त्यामुळं अवघ्या महिन्याभरात या परिसरातील शेती तिसऱ्यांदा पाण्याखाली जाऊन शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. या भागातून जाणाऱ्या समृद्धी समृद्धी महामार्गावरचं किमान 10 किलो मीटर भागातील पाणी एकाचं ठिकाणावरून बाहेर पडत असल्यानं थोडा पाऊस झाला तरी वारंवार काच आणि उतावळी नदीला पूर येत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला असून, या संदर्भात लवकर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
गोंदिया जिल्ह्यात 4 तालुक्यातील 17 मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद
गोंदियात सकाळपासून पावसाने हाहाकार माजविला असून या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तर गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा, गोरेगाव, गोंदिया आणि आमगाव या 4 तालुक्यांमधील 17 मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद घेण्यात आलेली आहे. परिणामी संपूर्ण गोंदिया जिल्ह्यातील 45 मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेले आहेत. तर 3 घरांची देखील पडझड झाली आहे. घटेगाव येथील मीरा मेंढे, वडेगाव येथील विशाल मेंढे आणि गोरेगाव तालुक्यातील तीमेझरी येथील ज्ञानेश्वर कटरे यांच्या घरांची पडझड झाली आहे. तर गोंदिया जिल्ह्यातील हजार हेक्टर धान पिकाची शेती पाण्याखाली आलेली आहे.
मुसळधार पावसामुळे गोंदिया शहर जलमय
गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. गोंदिया शहरातील अनेक भागांमध्ये नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरलं आहे. नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी भाजपचे आमदार विनोद अग्रवाल हे गेले होते. या दरम्यान आमदार विनोद अग्रवाल यांनी स्वतः गुडघाभर पाण्यातून प्रवास करत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. तर नागरिकांना नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन यावेळी आमदार विनोद अग्रवाल यांनी दिले आहे.
बीडमध्ये पावसाची संततधार सुरु
बीडमध्ये पावसाची संततधार सुरु आहे. या पावसाने तुंबलेल्या नाल्यातील पाणी रस्त्यावर साचल्याने दुर्गंधी पसरलीय. शहरातून जाणाऱ्या धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पडलेल्या खड्ड्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. पाण्याचा निचरा होत नसल्याने संपूर्ण पाणी रस्त्यावर येत आहे. परिणामी या मार्गावरील वाहतूक संथ गतीने सुरू आहे. मोठ्या विश्रांतीनंतर पावसाने हजेरी लावल्याने समाधान व्यक्त केले जातेय.
मेळघाट भागात मुसळधार पाऊस
मेळघाट भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. धारणी तालुक्यातील उतावली गावाजवळ चाकरडा पाटीयाकडे जाणारा मार्ग दोन तासांपासून बंद आहे.
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस, कोयना धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग सुरु
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरु आहे. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर पुन्हा वाढल्याने धरणातून पुन्हा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. धरणातील पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी सकाळी 11 वाजल्यापासून कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे 4 फूट उघडून 16565 क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सुरु करण्यात आला आहे. कोयना धरणाचा पायथा विद्युतगृहाचे दोन्ही युनिट सुरु असून त्याद्वारे 2100 क्युसेक विसर्ग सुरू आहे. असा एकूण 18665 क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू झाल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या:
शेतकऱ्यांनो सावधान! 'या' तारखांना पडणार मुसळधार पाऊस, राज्यातील कोणत्या जिल्ह्यांना इशारा























