(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Rain : आजपासून राज्यात पावसाची उघडीप, मात्र, काही ठिकाणी पावसाचा अंदाज
Maharashtra Rain : मुंबईसह परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातही काही ठिकाणी पाऊस झाला आहे.
Maharashtra Rain : सध्या राज्यात पावसाचा (Rain) जोर ओसरला आहे. काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसानं हजेरी लावली आहे. मुंबईसह (Mumbai) ठाणे (Thane) परिसरात रात्रभर जोरदार पावसाने हजेरी लावली. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातही काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला आहे. अन्य ठिकाणी मात्र पावसानं उघडीप दिली आहे. दरम्यान, आजपासून राज्यात पावसाची स्थिती काय असू शकते याबाबतचा अंदाज ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे (Meteorologist Manikrao Khule) यांनी सांगितला आहे. आजपासून राज्यात पावसाची काहीशी उघडीप मिळू शकते असा अंदाज खुळे यांनी व्यक्त केला आहे. राज्यात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याचा अंदाज त्यांनी वर्तवला आहे.
दरम्यान, राज्यात आत्तापर्यंत पावसाचे प्रमाण समाधनाकारक राहिले आहे. जूनपासून आत्तापर्यंत राज्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. नदी आणि धरणांच्या पाणी साठ्यात देखील मोठी वाढ झाली आहे. जून महिन्यात पावसानं दडी मारली होती. मात्र, जुलै आणि ऑगस्टमध्ये राज्यात सर्वत्र पावसाने जोरदार हजेरी लावली होती. दरम्यान, मराठवाडा, विदर्भ आणि कोकणात मुसळधार पावसामुळं काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं होतं. अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आल्यानं वाहतुकीवरही परिणाम झाला होता. तसेच शेतीचंही मोठं नुकसान झालं आहे.
कोल्हापूर पाऊस
कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात हलक्या सरींनी हजेरी लावली आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये दमदार पावसाने हजेरी लावल्याने राधानगरी धरणाचा स्वयंचलित 6 व्या क्रमांकाचा दरवाजा उघडला आहे. राधानगरी धरणातून एकूण 3 हजार 28 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. राजाराम बंधारा येथे पंचगंगा नदीची पातळी 18 फूट 11 इंचापर्यंत खाली आली आहे. जिल्ह्यातील अजूनही 12 बंधारे पाण्याखाली आहेत. दरम्यान, राधानगरी, शाहूवाडी, गगनबावडा या पावसाचे आगार असणाऱ्या तालुके सोडून जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळं जिल्ह्यातील पुराचे संकट टळले आहे.
पावसाचा अंदाज काय
संपूर्ण मराठवाड्यातील 8 जिल्ह्यात अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ पाऊस पडण्याचा अंदाज माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला आहे. याव्यतिरिक्त पुढील आठवडाभर म्हणजे सोमवारपर्यंत (29 ऑगस्ट) पावसाची उघडीप मिळू शकते असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. तर मध्य महाराष्ट्रातील खान्देश ते सोलापूर पर्यंतच्या 10 जिल्ह्यात आजपासून (23 ऑगस्ट) तुरळक ठिकाणी किरकोळ पावसा व्यतिरिक्त उघडीपच जाणवेल अशी माहिती ही खुळे यांनी दिली आहे.
घाटमाथ्यासह विदर्भात काही ठिकाणी पावसाचा अंदाज
सह्याद्रीतील घाटमाथ्यावरील नद्या उगम आणि धरण पाणलोट क्षेत्रात मात्र मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता अजुनही कायम असल्याचे खुळे यांनी सांगितले. नद्या आणि कॅनॉल पात्रातील सध्या होत असलेला सततचा पाणी विसर्ग कायम व नियंत्रणात ठेवण्याचे कार्य सिंचन विभागाला चालूच ठेवावे लागेल, अशी स्थिती दिसत आहे. दरम्यान, कोकणातील 4 जिल्ह्यात पुढील 3 दिवस जोरदार पावसाची शक्यता कायम असल्याचे हवामान विभागानं सांगितले आहे. विदर्भात पुढील 3 दिवस तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शुक्रवारपासून (26 ऑगस्ट) पुन्हा तिथे मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता जाणवत असल्याची माहिती खुळे यांनी दिली.