(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IMD alerts: पुन्हा पावसाचं सावट, राज्यात तीन दिवस कोसळधारेचा इशारा
Maharashtra Rain Forecast : ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर येथे तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह आणि वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता
IMD alerts maharashtra rain forecast : अरबी समुद्रात कर्नाटकच्या किनाऱ्यालगत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे राज्यावर पुन्हा एकदा पावसाचं सावट घोंगावत आहे. हवामान विभागाने पुढील तीन दिवस राज्यात पावसाचा अंदाज वर्तवला आहे. ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर येथे तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह आणि वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे.
दिवाळीमध्येही जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र, कमी दाबाचे क्षेत्र समुद्र किनाऱ्यापासून दूर गेल्यामुळे कोकण किनारपट्टीवर त्याचा प्रभाव कमी जाणवला होता. आता पुन्हा एकदा कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. पुढील तीन ते चार दिवस मुसळधार पाऊस वर्तवण्यात येत आहे.
मंगळवारी रात्री राज्यातील विविध भागात पावसाने हजेरी लावली. कोकण, सातारा आणि पुण्यात पावासाने धुंवाधार बँटिग केली.रात्री एक ते पहाटे तीन पर्यंत सातारा शहर परिसर, महाबळेश्वर, पाचगणी परिसरात तब्बल दोन तास मेघगर्जनेसह पाऊस कोसळला. या पावसामुळे महाबळेश्वर पाचगणीमधील स्ट्रॉबेरीचे नुकसान होण्याची शक्यता आहे. तर कोकणातील पावसामुळे अंब्याच्या नुकसानीची शक्यता वर्तवण्यात येत आहे. रत्नागिरी, खेड येथे मुसळधार पावसाने हजेरी लावली. दापोली, मंडणगडात ढगाळ वातावरण होते, काही ठिकाणी तुरळक पाऊस पडला; तर चिपळूण, संगमेश्वरसह लांजा-राजापुरात पावसाने हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह सायंकाळी एक तास कोसळलेल्या पावसाने रत्नागिरीकरांची तारांबळ उडाली.
या राज्यात पावासाचा इशारा –
अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे हवामान विभागाने सात राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू आणि मध्यप्रदेशमध्ये पुढील तीन ते चार दिवस मुसळधार पावासाचा इशारा देण्यात आलाय.17 आणि 19 तारखेला तेलंगणाच्या समुद्र किनाऱ्या लगतच्या भागात पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
केरळमध्ये पाच जणांचा मृत्यू –
समुद्र किनाऱ्यालगतच्या भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. केरळमध्ये मुसळधार पावसामुळे झालेल्या दुर्घटनेमध्ये दोन मुलांसह पाच जणांचा मृत्यू झालाय. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, बंगळुरुमध्ये आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय.