(Source: ECI/ABP News/ABP Majha)
शिवसेना नेते संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना 9 फेब्रुवारीपर्यंत ईडी कोठडी
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना 9 फेब्रुवारीपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे.
मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना ईडीनं अटक केली आहे. एचडीआयएलमधील 1 हजार 34 कोटी रुपयांच्या पत्रा चाळ जमीन घोटाळ्यात सहभाग असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणात त्यांना 9 फेब्रुवारीपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आलीय. मुंबई सत्र विशेष पीएमएलए कोर्टाने हे निर्देश दिले आहेत. संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना 55 लाख रुपये बिनव्याजी कर्ज दिल्याप्रकरणीही ईडीनं चौकशी केली होती. प्रवीण राऊत आणि संजय राऊत या दोघांच्या पत्नी एका कंपनीत पार्टनर आहेत.
प्रवीण राऊत हे एचडीआयएलची सहयोगी कंपनी गुरु आशिष कन्स्ट्रक्शनचे संचालक आहे. पीएमसी बँक घोटाळ्यातही प्रवीण राऊत यांचं नाव आलं होतं. या घोटाळ्यात प्रवीणचा जबाबही ईडीनं नोंदवला होता पीएमसी बँकेचे 90 कोटी रुपये हडपल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी प्रवीण राऊत यांची 72 कोटींची मालमत्ता जप्त
पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी ईडीनं शिवसेना नेते संजय राऊत यांचे निकटवर्तीय मानले जाणारे प्रवीण राऊत यांची 72 कोटी रुपये किमतीची मालमत्ता जप्त केली होती. पीएमसी बँकेतील 4 हजार 300 कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणी ईडी तपास करत आहे. या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं प्रवीण राऊत यांना गेल्या फेब्रुवारी महिन्यात अटक केली होती. पीएमसी बँकेचे 90 कोटी रुपये हडपल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
प्रवीण राऊत यांच्या पत्नी माधुरी राऊत यांच्या अकाउंटवरून संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या अकाउंटवर 55 लाख रुपये ट्रान्सफर करण्यात आले होते. हा व्यवहार का करण्यात आला होता याचं उत्तर ईडीला हवं आहे. याचसाठी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस बजावली होती. ज्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण चांगलंच तापलं होतं.
कोण आहेत प्रवीण राऊत?
प्रवीण राऊत संजय राऊत यांचे कौटुंबिक मित्र मानले जातात. तर एचडीआयएल आणि पीएमसी बँक घोटाळाशी संबंधित असलेले वाधवान कुटुंबियांशी सुद्धा त्यांची जवळीक आहे. प्रवीण राऊत यांनी पीएमसी बँक घोटाळाचे 90 कोटी रुपये हडपले, असा आरोप ईडीने केला. प्रवीण राऊत यांची कंपनी गुरुआशिष कन्स्ट्रक्शन लिमिटेड यांचा व्यवहार एचडीआयएलसोबत होते. या व्यवहारमुळेच प्रवीण राऊत यांची एचडीआयएल कंपनीशी संबंध वाढले. प्रवीण राऊत यांचा एचडीआयएल आणि पीएमसी बँक घोटाळ्यात सहभाग असल्याची खात्री ईडीला आहे.
महत्वाच्या बातम्या