Nashik Trimbakeshwer : त्र्यंबक राजाचं दर्शन भरल्यापोटी होणार, देवस्थान ट्रस्टकडून अल्पोहारची सोय
Nashik Trimbakeshwer : त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) मंदिरात दर्शनबारीत थांबणाऱ्या भाविकांसाठी अल्पोहारची सोय करण्यात येणार.
Nashik Trimbakeshwer : त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) मंदिरात कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव कमी झाल्यापासून हजारोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत आहेत. शिवाय शनिवार-रविवार आणि शासकीय सुट्टीच्या दिवशी दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढत आहे. अशातच भाविकांना दर्शन रांगेत तासंतास ताटकळत उभे राहावे लागते. वृद्ध, लहान मुले, महिलांना यामुळे त्रास होतो. म्हणून दर्शन रांगेत थांबून असलेल्या भाविकांसाठी ट्रस्ट लवकरच अल्प दरात चहा बिस्किटांची सुविधा उपलब्ध करून देणार आहे.
राज्यसह देशभरातून बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग (Trimbakeshwer Jyotirlinga) पर्यटन स्थळी मोठ्या प्रमाणावर लाखोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात. या पार्श्वभूमीवर मागील महिन्यातच देवस्थान ट्रस्टने भाविकांना दर्शनासाठी आठ कोटी रुपये खर्चून सुसज्ज दर्शन बारी साकारली आहे. कोरोनानंतर भाविकांच्या गर्दीत कमालीची वाढ झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे दर्शन बारीतून गर्भगृहापर्यंत पोहचण्यास भाविकांना तीन ते चार तास लागून जातात. परिणामी त्र्यंबक राजाच्या दर्शनाला भाविकांना ताटकळत उभे राहावे लागते. शिवाय भाविकांसोबत असलेल्या लहान मुलांना देखील याचा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे अनेकदा पोटात भुकेने कावळे ओरडत असताना दर्शन बारीत उभे राहून भाविकांना दर्शनासाठी वाट पाहावी लागत असते. त्यामुळे देवस्थान ट्रस्टने दर्शनबारीच भाविकांना अल्प आहार देण्याचा निर्णय घेतला आहे
दरम्यान यापूर्वीच नव्याने साकारलेल्या दर्शन बारीत पिण्याचे पाणी, वृद्धांसाठी आरामात बसण्याची आणि शौचालयाची सुविधा आहे. मात्र लहान मुले, वृद्ध त्याचे सोबत असलेल्या व्यक्तींना यावेळी चहा बिस्किट उपलब्ध मिळावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. मागच्या काही दिवसात देवस्थान ट्रस्टने लहान मुलांना बिस्कीट पुढे वाटप केले. मात्र आता ते बंद करण्यात आले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भाविकांना अल्प दरात चहा बिस्किटांची सुविधा देण्याचा मानस देवस्थान ट्रस्टचा आहे. या निर्णयाची अंमलबजावणी लवकरच करण्यात येईल असल्याचे देवस्थान ट्रस्ट कडून सांगण्यात आले आहे.
तसेच त्र्यंबक राजाला दररोज नैवेद्य दिला जातो. यावेळी गर्भगृह दर्शनासाठी बंद करण्यात येते. त्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना तीन तास ताटकळत राहावे लागते. अशावेळी दर्शनबारीतील रांगही संथ गतीने चालू लागते. याबाबत देवस्थान ट्रस्ट प्रशासन आणि विश्वस्तांनी गांभीर्याने विचार करावा अशी मागणी भाविकांनी केली आहे. या प्रकारामुळे अनेक भाविक हे दर्शन न घेताच रांगेतून बाहेर पडतात. दर्शन बारीची सुविधा करताना चहा फराळाच्या पदार्थांसाठी स्टॉल लावण्यासाठी जागा सोडली आहे तिचा वापर करून अल्प दरात चहा दूध बिस्किटे पाण्याची बाटली वेफर्स उपलब्ध करण्याचा असल्याचा मानस विश्वस्त अडसर यांनी व्यक्त केला आहे भविष्यात पर्यटक भाविकांना या सुविधेचा लाभ होणार असला तरी ट्रस्ट याबाबत कधी पुढाकार घेणारे याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
सशुल्क दर्शन सक्तीचं नाही...
श्री त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) देवस्थान मंदिरातील विश्वस्त मंडळानं सुरू केलेला सशुल्क दर्शनाचा लाभ घ्यावा की नाही. हे सर्वस्वी त्र्यंबक राजाच्या भाविकांवर अवलंबून आहे. तसेच मंदिर विश्वस्तांकडून हा निर्णय सक्तीचा करण्यात आलेला नाही, असं महत्त्वपूर्ण निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयानं नोंदवलं आहे. याप्रकरणी दाद मागणा-या याचिकाकर्त्यांना कोणताही तातडीचा दिलासा देण्यास नकार देत त्यांना पुढील सुनावणी वेळी आपली भूमिका योग्यरित्या न्यायालयाला पटवून देण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान या प्रकरणी पुढील सुनावणी ३० नोव्हेंबर रोजी होणार असून याचिकाकर्त्यांना सशुल्क दर्शनाविषयी न्ययालयाला पटवून दयावे लागणार आहे.