Aurangabad: राज्यपालांवर टीका करतांना अंबादास दानवेंची जीभ घसरली, शिवराळ भाषेत केली टीका
Aurangabad : माझ्यावर काय गुन्हा दाखल करायचं ते करा मात्र असेच बोलणार असल्याचे देखील दानवे म्हणाले.
Aurangabad News: छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान केल्याने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्यावर राज्यभरातून टीका होत आहे. दरम्यान औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आलेल्या ठाकरे गटाच्या महाप्रबोधन यात्रेत बोलतांना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी देखील राज्यपाल यांच्यावर निशाना साधला. मात्र याचवेळी टीका करतांना दानवे यांची जीभ घसरली आणि त्यांनी राज्यपाल यांच्यावर शिवराळ भाषेत टीका केली. तर माझ्यावर काय गुन्हा दाखल करायचं ते करा मात्र असेच बोलणार असल्याचे देखील दानवे म्हणाले.
काय म्हणाले दानवे...
राज्यपाल यांनी छत्रपती शिवरायांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानावर बोलतांना दानवे म्हणाले की, एक काळी टोपीवाला काल औरंगाबादमध्ये आला होता. अरे हरा***, मी बोलणाराच, काय गुन्हा दाखल करायचा माझ्यावर तो करा. छत्रपती शिवाजी महाराज आजच्या काळाचे देखील आदर्श आहेत लक्षात ठेवा, मी जबाबदारीने बोलतो. गुन्हा दाखल झाला आणि अटक झाली तरीही चालेल असे दानवे म्हणाले.
सुधांशू त्रिवेदींचाही समाचार...
आधीच्या काळात अनेक लोक सुटकेसाठी माफी मागत होते. छत्रपती शिवाजी महाराजांनीही औरंगजेबला पाच वेळा पत्र लिहिलं होतं, असे विधान करणाऱ्या राज्यसभा खासदार आणि भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी (Sudhanshu Trivedi) यांचा देखील यावेळी दानवे यांनी समाचार घेतला. 'अरे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे भवानी तलवार होती. आज जर शिवाजी महाराज असते तर त्यांनी तुझी जीभ एका मिनटात कापली असती', असा निशाना दानवे यांनी सुधांशू त्रिवेदी यांच्यावर साधला.
मनसेवरही टीका...
यावेळी बोलतांना अंबादास दानवे यांनी मनसेवर देखील टीका केली. 'परवा सावकरांबद्दल राहुल गांधी बोलले तर या महाराष्ट्रात अनेक पडलेले, भोंगे वाले रस्त्यावर उतरले होते. भारतीय जनता पार्टी रस्त्यावर उतरली. मात्र छत्रपती शिवरायांचा एवढा अवमान राज्यपाल यांनी केला असताना, या भामट्यांची दातखिळी बसली. आज नाही तुम्हाला हिंदुत्व आठवलं का? असा प्रश्न देखील दानवे यांनी यावेळी उपस्थित केला.
बंडखोर आमदारांवर टीका...
औरंगाबाद येथील पाच आमदारांनी बंडखोरी केली. कोणी म्हणत होते उद्धव ठाकरे भेटत नव्हते, तर कोणी म्हणतोय आमच्या मतदारसंघात निधी मिळत नव्हता म्हणून गेलोय, तर कोणी म्हणतोय हिंदुत्वासाठी गेलो आहे. त्यामुळे नेमके हे कशासाठी गेले. किती खोक्यासाठी गेले, असा टोलाही दानवे यांनी यावेळी लगावला.