Maharashtra CM : शिवसेना आक्रमक, भाजपचे सावध पाऊल; मुख्यमंत्रिपदाचा सस्पेन्स कायम
Maharashtra New CM : एकीकडे शिवसेना आमदार एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रिपदासाठी आक्रमक होत आहेत. तर दुसरीकडे दिल्लीतील भाजप नेत्यांनी मात्र कोणतीही घाई न करता सावध पावले टाकायला सुरुवात केल्याचं दिसतंय.
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पदाचा आज राजीनामा राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांना सादर केला. मुख्यमंत्र्यांना पर्यायी व्यवस्था होईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्र्यांचा कार्यभार सांभाळण्यास सांगण्यात आलं आहे. दरम्यान निकाल लागून चार दिवस उलटून गेले तरी अद्याप मुख्यमंत्रीपदाबाबत सस्पेंस कायम आहे. महायुतीमध्ये नेमकं काय सुरु आहे पाहूयात याचसंदर्भातला एक रिपोर्ट.
महायुतीने मोठं यश मिळवल्यानंतर तिन्ही पक्षांकडून मोठा जल्लोष केला गेला. लोकसभेतील अपयश भाजपनं या विधानसभेत भरुन काढत मोठं कमबॅक केलं. महायुतीला अपेक्षेपेक्षाही मोठं यश मिळाल्याने सत्तेच्या वाटेतील सर्व समीकरणं बदलली आहेत. सोबत भाजपनं थेट बहुमतापर्यंत मजल मारल्याने मुख्यमंत्रीपदावर देखील दावा केला जात आहे. अशात या सत्तेच्या समीकरणासंदर्भात मांडणी पुन्हा नव्याने तिन्ही पक्षांना करावी लागणार आहे.
दिल्लीतील भाजप नेत्यांना घाई नाही
एकीकडे भाजपचे दिल्लीतील वरीष्ठ नेते देखील हिवाळी अधिवेशनात व्यस्त दिसत आहेत. यंदाच्या अधिवेशनात अनेक महत्त्वाची विधेयकं मांडली जाणार असल्याची माहिती आहे. भाजपला महाराष्ट्रात मिळालेलं यश मोठं आहे. अशात सत्तास्थापनेसंदर्भात विरोधकांची देखील दिल्लीतील नेत्यांची चिंता मिटल्याने भाजपकडून घाई न करता वेळ घेत असल्याची चर्चा आहे. सोबतच मुख्यमंत्रीपदासंदर्भात तिन्ही पक्षांसोबत दिल्लीतील नेते चर्चा करणार असल्याने कोणी नवा चेहरा दिला जातो का यासंदर्भात देखील तर्कवितर्क लावली जात आहेत.
सव्वाशेहून अधिक जागा जिंकल्याने भाजपचा मुख्यमंत्रीपदावर दावा आहे. दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात लढल्याने हे यश मिळाल्याचा दावा शिवसेना करत आहे. सोबतच शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावे म्हणून आक्रमक होत असताना यासंदर्भात सावध पाऊलं टाकली जात असल्याचं दिसतं.
मुख्यमंत्रिपदाचा सस्पेन्स कायम
सव्वादोनशेहून अधिक जागा जिंकत सत्तेत आलेल्या महायुतीचा मुख्यमंत्रिपदावरुन पेच कायम आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी निवड झाली असली तरी भाजपचा यासंदर्भात निर्णय होऊ शकलेला नाही. त्यामुळे जोपर्यंत दिल्लीतील नेत्यांकडून हालचाली होत नाहीत तोपर्यंत मुख्यमंत्री पदाबाबतचा निर्णय देखील होऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे दिल्लीतील नेते निर्णय कधी घेतात आणि मुख्यमंत्रिपदी कोणाची वर्णी लागते हे बघणं महत्त्वाचं असेल.
ही बातमी वाचा: