Election Duty : मुंबईतील जवळपास 1000 शिक्षकांना 'इलेक्शन ड्युटी, शिक्षक संघटनांचा विरोध, परिपत्रक रद्द करण्याची मागणी
Election Duty : जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांनी यासंदर्भात तातडीची नोटीस पाठवून शिक्षकांना रुजू होण्याचे आदेश दिले आहेत.
Election Duty : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका (BMC), खाजगी अनुदानित प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील शिक्षकांना निवडणुकीचे काम म्हणजेच 'इलेक्शन ड्युटी' लावण्यात आली आहे. मात्र राज्यातील शिक्षक संघटनांनी याला विरोध दर्शविला आहे. या संदर्भातील परिपत्रक मागे घेण्याचा आणि कामावर रुजू होण्याचे आदेश रद्द करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेकडून करण्यात आली आहे.
ऐन परीक्षेच्या काळात शिक्षकांना इलेक्शन ड्युटी, शिक्षकांमध्ये रोष
शिक्षण हा हक्क कायद्यानुसार शिक्षकांना अशैक्षणिक कामे देऊ नका, अशा प्रकारचे आदेश असताना सुद्धा ऐन परीक्षेच्या काळात शिक्षकांना इलेक्शन ड्युटी लावण्यात येत असल्याने मुंबईतील शिक्षकांमध्ये रोष आहे. अशात मुंबईतील जवळपास 1000 शिक्षकांना ऐन परीक्षेच्या काळातच 'इलेक्शन ड्युटी लावण्यात आल्याने शिक्षकांनी याचा विरोध केला आहे. परीक्षांच्या काळात लादण्यात येणाऱ्या अशैक्षणिक कामं दिली जात आहे, असं म्हणणं शिक्षकांचं असून शिक्षक संघटनांनी याला विरोध दर्शविला आहे. तर अशाप्रकारे कामे लावणे हे शिक्षण हद्द कायद्याचे उल्लंघन असल्याचं शिक्षक संघटनांचे म्हणणं आहे.
जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांचे शिक्षकांना तातडीने रुजू होण्याचे आदेश
जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांनी यासंदर्भात तातडीची नोटीस पाठवून शिक्षकांना रुजू होण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये जवळपास एक हजार शिक्षकांनाही इलेक्शन ड्युटी लावण्यात आल्याची माहिती आहे, तसेच या आदेशाचे पालन न केल्यास शिस्तभंगाची कारवाई या शिक्षकांवर केली जाणार आहे. त्यामुळे त्या कामाविरोधात शिक्षक संघटना आक्रमक झाल्या असून हे परिपत्रक मागे घेऊन हे आदेश रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. हे काम देण्यापूर्वी मुंबई महापालिकेतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी हे मागासवर्गीय आयोगाने केलेल्या सूचनेनुसार मराठा आरक्षणासंदर्भात सर्वेक्षणाचे काम करत होते. हे काम पूर्ण होताच आता त्यांना इलेक्शन ड्युटीवर रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांना शिकवायचं कसं? असा प्रश्न शिक्षकांसमोर उपस्थित झाला आहे.
शिक्षक वर्गात प्रचंड नाराजी, कामावर बहिष्कार टाकण्याची भूमिका
आधी मराठा आरक्षणासंदर्भातील सर्वेक्षणाच्या कामाची ड्युटी, आता आगामी लोकसभा निवडणुकीच्या कामांबाबत परिपत्रक जारी करत निवडणुकीच्या कामाला जुंपण्यात आले आहे. अनेक शाळांमधील जवळपास 50 टक्के शिक्षकांना या कामासाठी पाचारण करण्यात आल्याने शिक्षक वर्गात प्रचंड नाराजी आहे. मुंबईतील शिक्षकांनी तर निवडणूक कामावर बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतली आहे.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI