Maharashtra Rain: मुंबईसह राज्याच्या विविध भागात चांगला पाऊस, रायगड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट
मुंबई आणि उपनगरासह राज्याच्या विविध भागात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळाला आहे.
Maharashtra Rain : राज्याच्या विविध भागात पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे. हळूहळू मान्सून राज्यात पुढे सरकत आहे. काही ठिकाणी चांगला पाऊस पडत आहे. मुंबई आणि उपनगरासह राज्याच्या विविध भागात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. ठाणे, पालघर, पुणे, परभणी, चंद्रपूर, वाशिम, नागपूर, अहमदनगर, रायगड या जिल्ह्यात पावसानं चांगलीचे हजेरी लावली. त्यामुळं शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळाला आहे. काही जिल्ह्यात जरी पाऊस पडत असला तरी अद्याप राज्याच्या अनेक भागात पावसानं दडी मारली आहे. त्यामुळं खरीपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत.
चंद्रपूरमध्ये पहिला मुसळधार पाऊस
मोठ्या प्रतीक्षेनंतर चंद्रपुर जिल्ह्यात पहिला मुसळधार पाऊस झाला. संध्याकाळी विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस बरसला. पावसाच्या आगमनानं उष्ण हवामानापासून नागरिकांना मिळाला दिलासा मिळाला आहे. सोसाट्याचा वारा व पाऊस यामुळं शहरातील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती. दरम्यान, समाधानकारक पाऊस नसल्यानं जिल्ह्यातील पेरण्या खोळंबल्या आहेत. बळीराजाला पेरणीसाठी सलग काही दिवस दमदार पावसाची गरज आहे.
वाशिममध्ये पावसाची हजेरी
हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार वाशिम जिल्ह्यातही पावसानं हजेरी लावली. जिल्ह्यात कुठे हलका तर कुठे मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. त्यामुळं वातावरणात चांगलाच गारवा निर्माण झाला आहे. तर बरसलेल्या पावसानं शेतीच्या कामांना अधिक वेग मिळणार असून, खोळंबलेल्या खरीप पेरण्याला वेग मिळणार आहे.
परभणी जिल्ह्यात जोरदार पाऊस, शेतकऱ्यांना दिलासा
परभणी शहरासह परिसरात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. या पावसामुळं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात पावसाचे आगमन झाले आहे. परभणी शहरासह,सेलू, लिमला, लोहगाव,आदी भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस बरसला. या पावसानं उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे. या पावसामुळं वातावरण आल्हाददायक झाले आहे. मात्र, सर्वत्र दमदार पाऊस नसल्यानं पेरण्या खोळंबल्या असून, अजूनही पेरणीसाठी मोठ्या पावसाची आवश्यकता आहे.
रायगड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट
रायगड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. दोन दिवस जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवला आहे.
अहमदनगर जिल्ह्यातही पावसाची हजेरी
अहमदनगर जिल्ह्यातही काही ठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे. कोपरगाव शहरात दुपारी मान्सुनच्या पावसानं दमदार हजेरी लावली आहे. अचानक आलेल्या पावसानं अनेकांची तारांबळ उडाली. अनेक ठिकाणी रस्त्यावर तसेच सखल भागात पावसाचे पाणी साचल्यानं वाहनधारकांना वाहन चालवण्यास त्रास होत आहे. या पावसामुळं उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना काहिसा दिलासा मिळाला आहे.