Covishield Vaccine : कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर कमी करा, राजेश टोपेंची मोदी सरकारकडे मागणी
Covishield Vaccine : राजेश टोपे यांनी राज्यातील परिस्थितीची माहिती मनसुख मांडविया यांना माहिती दिली. यावेळी त्यांनी कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर कमी करण्याची मागणी केली.
Covishield Vaccine : कोविड प्रतिबंधात्मक कोविशिल्ड लशीच्या दोन डोसमधील अंतर कमी करावे, अशी मागणी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांच्याकडे केली आहे. मंगळावरी राजेश टोपे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांची निर्माण भवन येथे भेट घेतली. याभेटीदरम्यान राजेश टोपे यांनी राज्यातील परिस्थितीची माहिती मनसुख मांडविया यांना माहिती दिली. यावेळी त्यांनी कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर कमी करण्याची मागणी केली.
राजेश टोपे यांनी मंगळवारी केंद्रीय मंत्री मांडविया यांना राज्यातील कोरोना परिस्थितीबद्दल माहिती दिली. त्याशिवाय कोरोनावर मात करण्यासाठी राज्य शासनाने केलेल्या उपाययोजना, लसीकरणाच्या बाबतीत मुंबई महानगरपालिकेने केलेले उल्लेखनीय काम यासारख्या विविध मुद्यांबाबत सविस्तर माहिती दिली. कोरोना लसीकरणाला वेग येण्यासाठी कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर कमी करावे, अशी विनंती केली. कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर 84 दिवसांवरुन 28 दिवस करता येईल का? याबाबत फेरविचार करवा, जेणेकरुन लसीकरणाला वेग येईल, असं मत राजेश टोपे यांनी व्यक्त केलं. काही देशांमध्ये लसीकरणाच्या दोन डोसमधील अंतर कमी करण्यात आलेय. त्याप्रमाणे आपल्या देशातही विचार व्हावा. परदेशी नोकरी अथवा शिक्षणासाठी जाणारे नागरिकांसाठी दोन मात्रांमधील अंतर कमी करण्यात आले आहे, त्याचप्रमाणे याचाही विचार व्हावा, अशी विनंती राजेश टोपे यांनी मांडविया यांना केली.
तिसरी लाट येण्याची शक्यता गृहीत धरून आरोग्य कर्मचाऱ्यांना कोविड लसीचा बुस्टर डोस देण्याबाबत विचार करावा. शाळा सुरू करणे सुरक्षित होण्यासाठी 18 वर्षाखालील मुलांचे लसीकरण लवकरात लवकर सुरु करण्यात यावे, अशी आग्रही मागणीही यावेळी टोपे यांनी केली.
मुंबई महानगरपालिकेचे केंद्रीय मंत्र्यांकडून कौतुक
मुंबई महानगरपालिकेने लसीकरणाच्या बाबतीत केलेल्या कामगिरीबाबत केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी यावेळी कौतुक केले. मुंबई महानगरपालिकेने लसीकरणाच्या पहिल्या मात्रेचे शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे. या कामगिरीबद्दल मांडविया यांनी टोपे यांचे अभिनंदन केले आणि आभार मानले. मुंबई सारख्या महानगरात लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण केले ही मोठी कामगिरी आहे. राज्यातील इतर शहरातही अशाच पध्दतीने लसीकरण केले जावे, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त केली.