(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Coronavirus Update : राज्यात 11 दिवसात कोरोनाच्या ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या दुप्पट
Maharashtra Coronavirus Update : राज्यात 11 दिवसात ॲक्टिव्ह कोरोनाची रुग्णसंख्या दुप्पट झाली आहे. पाच महिन्यांनंतर राज्यातील कोरोनाच्या (Maharashtra Coronavirus Update) सक्रिय रुग्णांची संख्या पुन्हा एकदा अडीच हजारांच्या पार गेली आहे.
Maharashtra Coronavirus Update : महाराष्ट्रात (Maharashtra) 11 दिवसात सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या जवळपास दुप्पट झाली आहे. 19 मार्च रोजी कोरोनाच्या (Coronavirus) ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 1 हजार 308 एवढी होती. तर 29 मार्च रोजी ॲक्टिव्ह रुग्णांची आकडेवारी 2 हजार 506 वर पोहोचली आहे. पाच महिन्यांनंतर राज्यातील कोरोनाच्या (Maharashtra Coronavirus Update) सक्रिय रुग्णांची संख्या पुन्हा एकदा अडीच हजारांच्या पार गेली आहे. मागील वर्षी 21 ऑक्टोबर 2022 रोजी सक्रिय रुग्णांची संख्या 2 हजार 567 एवढी होती.
सर्वाधिक सक्रिय रुग्ण पुणे, पुणे, ठाणे, रायगड, नाशकात
राज्यात काल (29 मार्च) 483 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. मुंबई, पुणे, ठाणे, रायगड आणि नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक ॲक्टिव्ह रुग्णसंख्या आहे
एकूण सक्रिय रुग्णसंख्येच्या 80 टक्के ॲक्टिव्ह रुग्ण मुंबई, पुणे, ठाणे, रायगड आणि नाशिकमध्ये आहे.
XBB 1.16 सब-व्हेरियंटचे रुग्ण सर्वाधिक पुण्यात
राज्यात कोरोनाच्या एक्सबीबी 1.16 रुग्णांची संख्या 230 वर पोहोचली आहे. तर यापैकी एका रुग्णाचा मृत्यू देखील झाला आहे. उर्वरित रुग्ण बरे झाल्याची माहिती आहे. एक्सबीबी 1.16 सब-व्हेरियंटचे रुग्ण सर्वाधिक पुण्यात आहेत. पुण्यात एकूण 151 रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोनाच्या XBB 1.16 व्हेरियंटचा प्रसार इतर विषाणूंच्या तुलनेत खूप जास्त आहे. यामुळे सरकारने सावधगिरी खबरदारी बाळगण्यास सांगितलं आहे.
काही जिल्ह्यात पॉझिटिव्हिटी रेट वाढला
राज्यातील मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांचे सर्वेक्षण 24 डिसेंबरपासून सुरुच आहे. राज्यात दररोज सरासरी 6 हजार 204 चाचण्या केल्या जातात. काही जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी रेट वाढला आहे. सोलापुरातील पाॅझिटिव्हीटी रेट 20.05 टक्क्यांवर तर सांगलीत पॉझिटिव्हिटी रेट 17.47 टक्क्यांवर आहे.
देशात एका दिवसात कोरोना रुग्णांच्या संख्येत दुप्पट वाढ
देशातील कोरोनाचा संसर्ग (Covid19 Updates) दिवसेंदिवस वाढत चालला आहे. एका दिवसात कोरोना रुग्णांच्या संख्येत दुप्पट वाढ झाली आहे. देशात आज 3016 नवीन कोरोना रुग्ण सापडले आहेत. सोमवारी हा आकडा 1573 इतका होता. त्यामुळे सोमवारच्या तुलनेत देशातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दुप्पट झाली आहे. मंगळवारी देशात 2 हजार 151 कोरोनाबाधित सापडले होते. देशातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण वाढून 2.73 टक्के झालं आहे.
देशातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णांचे प्रमाणदेखील वाढले आहे. देशात आता 13,509 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. देशातील कोरोनाबाधित बरे होण्याचे प्रमाण 98.78 टक्के आहे. तसंच गेल्या 24 तासांत 1,396 रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या दैनंदिन रुग्ण सकारात्मकता दर 2.73 टक्के तर आठवड्याच्या रुग्ण सकारात्मकता दर 1.71 टक्के इतका आहे.