(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Corona Crisis: राज्यात लॉकडाऊन करण्याचा राज्य सरकारचा निर्णय पक्का? फक्त घोषणा बाकी.. 15 ते 30 एप्रिल दरम्यान लॉकडाऊन लागण्याची शक्यता
राज्यात वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे शासनस्तरावर लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती आहे.
मुंबई : राज्यात वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे शासन स्तरावर लॉकडाऊन लावण्याचा निर्णय झाला आहे. तत्वतः 15 दिवस लॉकडाऊन करण्याचा सरकारचा विचार असून 15 ते 30 एप्रिल लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे. सध्या लॉकडाऊन बाबत कागदपत्रांची तयारी सुरू आहे. त्यानंतर मार्गदर्शक सूचना जारी करण्यात येतील.
या काळात हातावर पोट असणाऱ्या लोकांना मोफत अन्नधान्य देण्याचा विचार असून शिवभोजन थाळी माध्यमातून मदत मिळणार आहे. तसेच या वर्गाला थोडी आर्थिक मदत देण्याचाही सरकारचा विचार आहे. अर्थ विभागाने बैठक घेऊन प्रस्ताव तयार केल्याची माहिती आहे. सार्वजनिक वाहतूक लॉकडाऊनमध्ये बंद नसली तरी सरसकट लोकं सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरु शकणार नाहीत. लोकांना प्रवास करताना त्यांची योग्य कारणे द्यावी लागणार आहेत. परवानगी शिवाय सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतून लोकं प्रवास करू शकणार नाहीत. त्यावर निर्बंध येणार आहेत.
लॉकडाऊनची मानसिकता ठेवा
राज्यात लॉकडाऊन आधी जनतेला पूर्व सूचना देणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. जालन्यात ते पत्रकार परिषदेत बोलत होते. अर्थमंत्री अजित पवार आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यात बैठक झाली. त्यावेळी लॉकडाऊनमधील येणाऱ्या अडचणींवर चर्चा करण्यात आली. दरम्यान लॉकडाऊनची जनतेनं मानसिकता ठेवावी आणि लॉकडाऊन लावण्याआधी जनतेला पुरेसा वेळ आणि पूर्वसूचना देण्यात येईल अशी माहिती टोपे यांनी दिली आहे.
दहावी-बारावीची बोर्डाची परीक्षा पुढे ढकलली
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर दहावी-बारावीची बोर्डाची परीक्षा पुढे ढकलण्याची घोषणा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात आज महत्त्वाची बैठक पार पडली. राज्यात लागणाऱ्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर दहावी, बारावीचे वेळापत्रक बदलण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली. आता दहावीची परीक्षा जून महिन्यात आणि बारावीची परीक्षा मे अखेरीस घेण्यात येणार आहे. राज्यातील कोरोनाची स्थिती पाहून लवकरच नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात येईल, अशी माहिती शिक्षणमंंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.