Rain Video: छत्रपती संभाजीनगरात जोरदार पावसासह गारपीट, अजिंठा लेणीतील धबधबे कोसळू लागले
Rain Update : सोयगाव तालुक्यात पावसासह गारपीट देखील पाहायला मिळाली.

Chhatrapati Sambhaji Nagar Rain Update : मराठवाड्यात 25 मार्चपर्यंत पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात (Chhatrapati Sambhaji Nagar) आज पुन्हा अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) हजेरी लावली आहे. विशेष म्हणजे अनेक भागात अक्षरशः मुसळधार पाऊस पडल्याने नदीला पूर आला आहे. अजिंठा लेणी परिसरात जोरदार पाऊस पडल्याने लेण्यातील धबधबे ओसंडून वाहत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. जोरदार वाऱ्यासह झालेल्या या पावसामुळे अजिंठा येथील वघुर नदीला पूर आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तर सोयगाव तालुक्यात पावसासह गारपीट देखील पाहायला मिळाली.
मराठवाड्यात 25 मार्चपर्यंत पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान आज दुपारनंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. तर अजिंठा लेणी परिसरात देखील पावसाने हजेरी लावली. त्यामुळे लेणीमध्ये असलेल्या अनेक छोठे-मोठे धबधबे ओसंडून वाहत आहे. तर पावसासह जोरदार सोसाट्याचा वारा देखील पाहायला मिळाला.
सोयगाव तालुक्यात गारपीट...
दरम्यान जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात जोरदार पावसासह गारपीट झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहेत. केळी, ज्वारी, गव्हाचं पीक अक्षरशः आडवे झाले आहेत. विशेष म्हणजे सोयगाव तालुका कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघ असून, याठिकाणी शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे गेली आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे देखील सोयगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते.
25 मार्चपर्यंत पावसाची शक्यता
मराठवाडा विभागात 17 ते 23 मार्च दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त, कमाल तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा किंचित कमी तर किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विस्तारित अंदाजानुसार मराठवाड्यात 19 ते 25 मार्च दरम्यान कमाल तापमान मध्यम प्रमाणात सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीपेक्षा कमी तर पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता वर्तवली गेली आहे, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील ग्रामीण कृषी हवामान विभागाचे मुख्य प्रकल्प समन्वयक डॉ. कैलास डाखोरे यांनी हा अंदाज वर्तवला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी
अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी आज जिल्हाधिकारी अस्तिककुमार पाण्डेय यांनी करून तेथील शेतकऱ्यांशी संवाद साधला. राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे. जे कर्मचारी संपावर आहेत त्यांच्या जागेवर पर्यायी कर्मचारी देऊन पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी पाण्डेय यांनी अधिकाऱ्यांना दिले. जिल्ह्यातील काही भागात 6,7,16 आणि 17 मार्च रोजी अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे गहू, हरभरा,ज्वारी, मोसंबी, डाळींब तसेच भाजीपाला पिकाचे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी आज या भागाचा दौरा केला. त्यांनी शेकट्या जवळील वाहेगाव देमणी या भागात जाऊन बळवंत तांगडे या बळीराजाच्या शेतात जाऊन पिकाची पाहणी केली.
अजिंठा लेणीतील धबधबे कोसळू लागले, पाहा व्हिडिओ
Rain Update: छत्रपती संभाजीनगरात जोरदार पावसासह गारपीट, अजिंठा लेणीतील धबधबे कोसळू लागले #Rain #ChhatrapatiSambhajinagar
— Mosin Shaikh (@MosinAbp) March 17, 2023
@abpmajhatv pic.twitter.com/wUi5IteUcQ
इतर महत्वाच्या बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
