(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Rain : पुढील चार दिवस राज्यात अवकाळी पावसाचा इशारा, शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगावी; हवामान विभागाचं आवाहन
Maharashtra Rain : हवामान विभागाने (Meteorological Department) दिलेल्या अंदाजानुसार येत्या चार दिवसात राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
Maharashtra Rain : राज्यात अवकाळी पावसामुळे (Unseasonal rain) शेतकऱ्यांच्या पिकांना मोठा फटका बसला आहे. काही जिल्ह्यात शेतकऱ्यांची (Farmers) उभी पिके जमीनदोस्त झाली आहेत. दरम्यान, हवामान विभागाने (Meteorological Department) दिलेल्या अंदाजानुसार येत्या चार दिवसात राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. तर काही भागात गारपिटीचीही शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगावी असं आवाहान हवामान विभागाच्या वतीने करण्यात आलं आहे.
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार राज्याच्या विविध भागात पावसाने हजेरी लावली आहे. याचा शेती पिकांना मोठा फटका बसला आहे. या पावसामुळे रब्बीची पिके धोक्यात आली आहेत. गहू, हरभरा यासह द्राक्ष आणि केळीच्या बागांचे मोठं नुकसान झालं आहे. याचा शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.
नांदेड जिल्ह्यात गारपीट
नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर, मुदखेड तालुक्यात सायंकाळी जोरदार गारपीट झाली. गारपिटीमुळे रब्बी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. बारड येथे घर कोसळून एकाचा मृत्यू झाला आहे. अर्धापूर तालुक्यातील आंबेगाव, चनापूर, पाटणूर परिसरात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. वादळी वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडली आहेत. केळीच्या बागांना मोठा फटाका बसला. वीजवितरण कंपनीचे विद्युत खांब, तारा तुटल्याने वीज पुरवठा खंडित झाला. हरभरा, गहू आंबा आदी पिकांना फटका बसल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. मुदखेड तालुक्यात वादळी पाऊस आणि गारपीट झाली. यामध्ये शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. नांदेड-मुदखेड मार्गावर काही ठिकाणी झाडे पडली आहेत. हदगाव तालुक्यालाही वादळी पावसाचा तडाखा बसला. नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
सोलापूर जिल्ह्यातही अवकाळी पाऊस
सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट, पंढरपूर तालुक्यातील अनेक गावात अवकाळी पावसाने हजेरी लावली. अक्कलकोट तालुक्यातील शिरवळ, सदलापूर, बादोला, सापळा, किनिमोड या भागात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. ज्वारी, गहू, हरभरा, करडी यासारख्या काढणीला आलेल्या पिकांना यामुळे फटका बसला आहे. जोरदार वाऱ्यासह पावसाने झोडपून काढल्यामुळे आंब्याच्या फळबागेला नुकसानीचा सामना करावा लागणार आहे. द्राक्ष पिकाचेही मोठं नुकसान झालं आहे.
राज्याच्या विविध भागात पावसाची हजेरी
हिंगोली, जालना तसेच पुणे जिल्ह्यातही अवकाळी पावसाने हजेरी लावले आहे. मुंबईमध्येही विविध ठिकाणी पावसाने हजेरी लावली. तसेच ठाणे जिल्ह्यातही अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. उकाड्याने हैराण झालेले नागरिक सुखावले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या: