कोरोना चाचणीसाठी युवतीच्या गुप्तांगातून स्वॅब घेणाऱ्याला 10 वर्षाचा सश्रम कारावास
अमरावतीत एक युवती बडनेरा येथील ट्रॉमा केअर रुग्णालयात कोरोना चाचणी करण्यासाठी तपासायला गेली तेव्हा त्या रुग्णालयातील कर्मचाऱ्याने तिचा फायदा घेत त्याने नाकातून स्वॅब न घेता त्या युवतीच्या गुप्तांगातून स्वॅब घेतला.
अमरावती : कोरोना चाचणीच्या नावाखाली युवतीच्या गुप्तांगातून स्वॅब घेणाऱ्या विकृताला अमरावती जिल्हा सत्र न्यायालयाने दहा वर्षांची शिक्षा सुनावली आहे. जुलै 2020 मध्ये घडलेल्या या प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. प्रमुख राजकीय पक्षांसह विविध सामाजिक संघटनांनी हे प्रकरण लावून धरले होते. अखेर आज बुधवारी अमरावती जिल्हा सत्र न्यायालयाने या प्रकरणात आपला निर्णय देऊन आरोपीला शिक्षा ठोठावली.
29 जुलै 2020 मध्ये कोरोना महामारी पसरलेली असतांना आरोग्य विभागातर्फे रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची दखल कोरोना चाचणी करण्यात येत होती. अमरावती शहरातील एका मॉलमध्ये काम करणारी एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्याने मॉलमधील इतर कर्मचाऱ्यांची देखील चाचणी करण्यात आली. बडनेरा येथील मोदी ट्रॉमा केअर रुग्णालयात असलेल्या कोविड तपासणी लॅब मधील कर्मचारी अलकेश देशमुख याने एका युवती कर्मचाऱ्याच्या गुप्तांगातून स्वॅब घेतला. सदर महिलेने ही बाब आपल्या भावाला सांगितली असता त्याने जिल्हा सामान्य रुग्णालयात याबाबत चौकशी केली. मात्र स्वॅब घेण्याची अशी कुठलीही पद्धत नसल्याचे समजताच संबंधित युवतीने शहर पोलीस आयुक्तालयाच्या बडनेरा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. त्यानंतर आरोपी अलकेश देशमुख विरोधात पोलिसांनी भादवी 376 नुसार गुन्हा दाखल केला. मागील दीड वर्षांपासून या प्रकरणाची सुनावणी अमरावती जिल्हा सत्र न्यायालयात सुरू होती. आज बुधवारी न्यायाधीश व्हि. एस.गायकी यांनी आपला निर्णय देतांना आरोपी अलकेश याला कलम 376 (1) अंतर्गत दहा वर्षे सक्त मजुरी आणि दहा हजार रुपये दंड तसेच कलम 354 अंतर्गत पाच वर्षांची शिक्षा आणि पाच हजारांचा दंड अशी शिक्षा सुनावली. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे एकूण 12 साक्षीदार न्यायालयात सादर करण्यात आले. या निकालाबद्दल सहायक सरकारी वकील अॅड. सुनील देशमुख यांनी अधिक माहिती दिली.
कोरोनाची अत्यंत भीती असतांना एक युवती बडनेरा येथील ट्रॉमा केअर रुग्णालयात कोरोना चाचणी करण्यासाठी तपासायला गेली तेव्हा त्या रुग्णालयातील कर्मचाऱ्याने तिचा फायदा घेत त्याने नाकातून स्वॅब न घेता त्या युवतीच्या गुप्तांगातून स्वॅब घेतला. ही घटना दाबण्याचा खूप प्रयत्न झाला यावेळी भाजप नेत्या चित्रा वाघ याठिकाणी आल्या आणि त्या मुलीला बळ दिलं. भाजपने हा मुद्दा उचलून धरला आणि मोठं आंदोलन केलं. आमच्यावर केसेस सुद्धा झाल्या पण आम्ही मागे हटलो नाही आणि अखेर तिला न्यायालयाने न्याय दिला ज्याचं आम्ही स्वागत करतो अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी या निकालावर दिली.
महत्त्वाच्या बातम्या:
- 'काँग्रेस, शिवसेनेला राष्ट्रवादी पक्ष खाऊन टाकणार'; चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा डिवचले
- संभाजी भिडे पुन्हा वादात! लिव्ह इन रिलेशनशिपच्या निर्णयावरुन न्यायाधीशांवर केली आगपाखड
- राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इनकमिंग वाढणार; जयंत पाटील यांचे सूचक वक्तव्य