राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इनकमिंग वाढणार; जयंत पाटील यांचे सूचक वक्तव्य
Jayant Patil : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येत्या काळात मोठ्या प्रमाणावर इतर पक्षांच्या नेत्यांचा प्रवेश होणार असल्याचे सूचक वक्तव्य प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.
NCP Leader Jayant Patil : नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर आता राजकीय पक्षांनी आगामी महापालिका निवडणुकांवर लक्ष केंद्रीत करण्यास सुरुवात केली आहे. येत्या काही दिवसांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर इनकमिंग वाढणार असल्याचे सूचक वक्तव्य प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे मंत्री जयंत पाटील यांनी केले. सांगलीत प्रजासत्ताक दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमानंतर जयंत पाटील यांनी हे वक्तव्य केले.
येत्या काही महिन्यांमध्ये राज्यातील महत्त्वाच्या महापालिका निवडणुका पार पडणार आहेत. त्यासाठी राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. जयंत पाटील यांनी म्हटले की, दर गुरुवारी मुंबईच्या पक्ष कार्यालयात पक्ष प्रवेश सुरू असतो. सांगली जिल्ह्यातील काही नेते लवकरच राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणार आहेत, असे जयंत पाटील यांनी म्हटले. नुकत्याच झालेल्या नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने चांगली कामगिरी केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यातील नगरपंचायतींची संख्या वाढली असून नगरसेवकांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमकपणे पक्ष विस्तार करणार असल्याची चर्चा सुरू आहे.
भाजपचा पराभव करणे शक्य होतं
कडेगाव नगरपंचायती मधील काँग्रेसच्या पराभवावरदेखील जयंत पाटील यांनी भाष्य केले. कडेगाव नगरपंचायत निवडणुकीत भाजपचा पराभव करणे शक्य होतं. कडेगाव मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी या दोन पक्षात अंतर कमी राहिलं असते. दोन्ही बाजूने समजूतदारपणा दाखवला असता तर कडेगाव नगरपंचायत निवडणुकीत भाजपचा पराभव करणे शक्य होतं, असे जयंत पाटील म्हणाले. या निवडणुकीत मिळालेल्या मतांची आकडेवारी देखील काँग्रेस-राष्ट्रवादी मधील अंतर दाखवते. त्यामुळे अशा त्रुटी यापुढे राहणार नाहीत याची काळजी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस ,शिवसेना घेतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सांगली जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निवासस्थानी जो काही प्रकार झाला तो चुकीचा असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत संबंधितांची विचारणा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- संतोष परब हल्ला प्रकरण: अज्ञातवासानंतर नितेश राणे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
- शासकीय कार्यालय कोणाच्या बापाचं नाही; सोमय्यांना दिलेल्या नोटिशीनंतर फडणवीसांचा संताप
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha