महाजॉब्स पोर्टलच्या माध्यमातून पारदर्शकपणे रोजगार उपलब्ध व्हावेत : मुख्यमंत्री
काळाची गरज ओळखून सुरु करण्यात आलेल्या या पोर्टलच्या माध्यमातून भूमीपुत्रांना पारदर्शकपणे रोजगार किंवा नोकरी उपलब्ध करून दिली जावी अशी अपेक्षा व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील युवकांसाठी मोबाईलवर 'महाजॉब्स' नावाचे ॲप उपलब्ध करून देण्याची सुचनाही उद्योग विभागाला केली.
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते 'महा जॉब्स' पोर्टलचं आज लोकार्पण केलं. राज्यातल्या उद्योगात मराठी मुलांना नोकऱ्या मिळाव्यात हा हे पोर्टल सुरु करण्यामागचा उद्देश आहे. कंपन्यांना कुठले कामगार हवे आहेत याची माहिती या पोर्टलवर असणार आहे. महाराष्ट्राने नेहमीच देशाला पथदर्शी आणि भव्यदिव्य स्वरूपाचे काम करून दाखवले असल्याचे सांगताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज लोकार्पण केलेले "महाजॉब्स" हे संकेतस्थळ महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तूरा असल्याचे नमूद केले. काळाची गरज ओळखून सुरु करण्यात आलेल्या या पोर्टलच्या माध्यमातून भूमीपुत्रांना पारदर्शकपणे रोजगार किंवा नोकरी उपलब्ध करून दिली जावी अशी अपेक्षा व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील युवकांसाठी मोबाईलवर "महाजॉब्स" नावाचे ॲप उपलब्ध करून देण्याची सुचनाही उद्योग विभागाला केली. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक, उद्योग राज्यमंत्री श्रीमती आदिती तटकरे यांच्यासह उद्योग विभागाचे प्रधान सचिव बी वेणुगोपाल रेड्डी, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अनबलगन, विकास आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे, राज्याच्या प्रत्येक भागातील उद्योजक आणि रोजगार संधीच्या शोधात असलेले भुमिपुत्र या कार्यक्रमात सहभागी झाले होते. बेरोजगार युवकांना काम उपलब्ध करून देणारे पोर्टल व्हावे
मुख्यमंत्र्यांनी महाजॉब्स या पोर्टलचे लोकार्पण करताना हे पोर्टल अधिक सोपे आणि सुटसुटीत असावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. ते म्हणाले की, पूर्वी एम्प्लॉयमेंट एक्सचेंजच्या माध्यमातून फक्त बेरोजगारांची माहिती कळायची. पण किती लोकांना रोजगार मिळाला हे कळायचेच नाही. तसे या पोर्टलच्या बाबतीत अजिबात होऊ नये. या पोर्टलचा नोकरी, रोजगार देण्यासाठी किती उपयोग होतो याचा नियमित आढावा घेतला जावा. अडचणींची दखल घेऊन पोर्टलच्या माध्यमातून किती रोजगार उपलब्ध करून दिले गेले हे ही सांगितले जावे. यात उद्योजक आणि राज्यातील युवकांना काही अडचणी येत असतील तर त्याचाही अभ्यास केला जावा. हे पोर्टल बेरोजगाराची नोंदणी करणारे नाही तर बेरोजगारांना काम उपलब्ध करून देणारे पोर्टल व्हावे असंही ते म्हणाले. पोर्टलच्या माध्यमातून उद्योगांच्या मनुष्यबळाच्या गरजा भागवाव्यात
महाजॉब्सच्या माध्यमातून राज्यातील उद्योजक, भुमिपुत्र यांच्या दोघांच्याही गरजा भागवल्या जाव्यात, उद्योगांना अपेक्षित मनुष्यबळ मिळावे तर युवकांना रोजगार. या समन्वयातून राज्याचा गतिमान पद्धतीने विकास होतांना घराघरात समाधान नांदावे अशी अपेक्षा ही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. कोरोनाने आपल्यापुढे संकट निर्माण केले असले तरी काही गोष्टी निश्चित शिकवल्या आहेत. त्यामध्ये घराकडे आरोग्याकडे पाहण्याची शिकवण जशी कोरोनाने दिली तशीच आत्मनिर्भर होण्याचीही शिकवण दिली आहे.
बेरोजगारी संपवण्याची संधी- सुभाष देसाई
उद्योग विभागाने केलेल्या पाहणीत राज्यातील उद्योगांत 50 हजार रोजगार उपलब्ध असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्यामुळे या पोर्टलद्वारे नोकरी मागणारे आणि देणारे यांच्यात शासनाने समन्वय साधण्याचा प्रयत्न केला आहे. महाजॉब्स पोर्टलद्वारे अभियांत्रिकी, लॉजिस्टिक, केमिकल आदी 17 क्षेत्राची निवड करण्यात आली आहे. त्यातील 950 व्यावसायासाठी इच्छुक उमेदवार निवड करू शकतात. स्थानिक भूमिपुत्रांनांच नोकरीची संधी मिळावी यासाठी अधिवास (डोमेसाईल) प्रमाणपत्राची अट यामध्ये आहे. याद्वारे राज्यातील बेरोजगारी संपवण्यासाठी मदत होईल.
महाजॉब्स काय आहे?
महाराष्ट्रातील विविध जिल्हे आणि खेड्यापाड्यातील ग्रामीण आणि शहरी युवकांना त्यांच्या कौशल्याला साजेसा सर्वोत्तम जॉब मिळवण्याची व यशस्वी करिअर घडवण्याची संधी महाराष्ट्र सरकार उपलब्ध करून देत आहे. त्यामुळे या युवकांना प्रगतीपासून आणि औद्योगिक क्षेत्राचा एक महत्त्वाचा भाग घेण्यापासून कुणीही थांबवू शकणार नाही. जर त्यांनी त्यांच्या कौशल्याला मेहनतीची जोड दिली तर त्यांच्या प्रगती पुढे आकाश ठेंगणे होणार आहे. महाराष्ट्राला प्रगतीच्या पुढच्या पातळीवर घेऊन जाणे हेच आमचे स्वप्न आहे औद्योगिक विकासासाठी घेत असलेल्या मेहनतीशिवाय पुढील सर्व आव्हानांना तोंड देत पुढे जाण्यासाठी महाराष्ट्र सज्ज आहे.
जेव्हा परदेशातील कंपन्या येथे गुंतवणुकीसाठी येतील किंवा इथलेच उद्योग विस्तारत असतील तेव्हा त्यांना मनुष्यबळाची मोठी निकड भागणार आहे आणि ती निकड सहजतेने पुरवण्यासाठी महाजॉब्ज हे एक प्रभावी महाव्यासपीठ आणि एक महादुरावा ठरणार आहे. विविध कराराचा एक भाग म्हणून 14 देशाहून अधिक गुंतवणूकदाराच्या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या आहेत आणि विविध उद्योग क्षेत्रातील या गुंतवणुकीची रक्कम 25 हजार कोटीपेक्षा अधिक असेल नव्या गुंतवणूकदारांना महाराष्ट्रात गुंतवणूक करणे सहज शक्य व्हावे यासाठी आणि औद्योगिक युनिटची उभारणी करण्यासाठी आवश्यक परवाना मिळविण्यासाठी महापरवाना विषय प्रणालीसह महाराष्ट्र शासन आधीच सज्ज झाले आहे.
आता महाजॉबच्या रूपाने औद्योगिक रोजगार ब्युरो म्हणून कंपन्या व कुशल अर्धकुशल व अकुशल कामगारांमधील महा दुवा महाराष्ट्र शासनाने निर्माण केला आहे. जिथे महाराष्ट्रातील सर्व कुशल अर्धकुशल व अकुशल कामगारांना सतरा क्षेत्रात 950 अधिक व्यवसायामध्ये रोजगाराची एक अतिशय मोठी संधी आहे.
कोरोनामुळे झालेली आर्थिक हानी भरून निघण्यासाठी मोठी मदत होणारच आहे. पण आता महाराष्ट्रातील प्रत्येक नव्या कुशल अर्धकुशल व अकुशल कामगारांना अपेक्षित किंवा साजेसा जॉबपर्यंत पोहोचता येणार आहे आणि कंपन्यांनाही आवश्यक त्या तंत्रज्ञानाचा व कामगारांचा शोध अगदी सहजतेने घेता येणार आहे. त्यासाठी महाजॉबची निर्मिती करण्यात आलेली आहे. महाराष्ट्राच्या औद्योगिक पद्धतीचा अधिक वेळ मिळावा व येथील औद्योगिक क्षेत्रात परकीय गुंतवणूक वाढून मोठी रोजगारनिर्मिती व्हावी यासाठी महाराष्ट्र शासनाने नवे उद्योग स्थापन करण्याबाबतचे महापरवाना विषयक नियम अतिशय शिथिल केलेले आहेत. त्यामुळे स्वाभाविकच येत्या काळात अनेक परकीय उद्योग कंपन्या महाराष्ट्रात सुरू होणार हे निश्चित आहे आणि या कंपन्यांना लागणारे कुशल अर्धकुशल व अकुशल असे सर्व प्रकारचे मनुष्यबळ महाजॉबच्या माध्यमातून पुरवले जाईल. यातून कंपन्यांना हव्या असलेल्या मनुष्यबळाचा प्रश्न सहज सुटेल आणि जॉबच्या शोधात असलेल्या महाराष्ट्रातील तरुणांनाही नवा रोजगार मिळेल या निमित्ताने महाराष्ट्रात एक नव्या प्रगत औद्योगिक पर्वाची सुरुवात होत आहे.
महाजॉब्ज कसे वापरावे?
जॉब शोधण्यासाठी उद्योगासाठी लॉगिनचे दोन पर्याय इथे देण्यात आलेले आहेत. लॉगिन केल्यानंतर कंपन्यांनी आपली नोंदणी करून कंपनीच्या सध्याच्या मनुष्यबळाविषयी आवश्यकता येथे नोंदवावी. कुशल-अकुशल अर्धकुशल अशा जॉबच्या शोधात असलेल्या व्यक्तीने नाव नोंदणीसाठी आपली तपशीलवार वैयक्तिक माहिती भरावी. अशाप्रकारे प्रत्येक खाजगी कंपनीला अपेक्षित मनुष्यबळ व प्रत्येक कामगाराला अपेक्षित जॉबचे असंख्य पर्याय महाजोबच्या मदतीने आपल्याच जिल्ह्यात उपलब्ध करण्याचा प्रयत्न आहे.