नाशिक-पुणे महामार्गावर दरड कोसळण्याचं सत्र सुरुच, महामार्ग प्रवासासाठी धोकादायक
चंदनापुरी घाटातील अनेक ठिकाणी डोंगरातील मोठ-मोठे दगड निसटणची शक्यता आहे. यापूर्वी मध्यरात्रीच्या सुमारास संरक्षक जाळीसह मोठी दरड कोसळली होती.
शिर्डी : नाशिक-मुंबई पाठोपाठ आता नाशिक-पुणे महामार्ग प्रवासासाठी धोकादायक बनला आहे. संगमनेर शहराजवळ महामार्गावरील चंदनापुरी घाटात दरड कोसळण्याचं सत्र गेल्या महिनाभरापासून सुरूच आहे. त्यामुळे या घाटातील वाहतूक एकेरी करण्यात आली आहे.
नाशिक-पुणे महामार्ग प्रवासासाठी धोकादायक बनला आहे. गेल्या महिनाभरात अनेक वेळा दरड कोसळण्याच घटना याठिकाणी घडल्या आहेत. मात्र सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. अजूनही घाटातून प्रवास करताना दरड कोसळण्याच्या घटना घडण्याची शक्यता आहे. घाटातील अनेक मार्गावर एकेरी वाहतूक सुरू आहे. दिल्ली येथील पथक पाहणी करणार असून त्यानंतर निर्णय घेण्यात येणार आहे.
पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या घटना अनेकदा घडतात. मात्र चंदनापुरी घाटातील अनेक ठिकाणी डोंगरातील मोठ-मोठे दगड निसटणची शक्यता आहे. यापूर्वी मध्यरात्रीच्या सुमारास संरक्षक जाळीसह मोठी दरड कोसळली होती. यानंतर महामार्ग पोलिसांनी एकेरी वाहतूक सुरू केली असून वाहन धारकांना काळजी घेण्याचं आवाहन महामार्ग पोलीस करत आहेत.
गेल्या महिनाभरात अनेक वेळा छोट्या दरडी कोसळण्याच्या घटना समोर आल्या असून लवकरच यावर मार्ग न निघाल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग उपाय योजना करणार कधी असा सवाल आता प्रवासी वर्गातून होऊ लागला आहे.