Kokan Politics : कोकणात आगामी निवडणुकांमध्ये कुणबी समाज गेम चेंजर ठरणार? फेब्रुवारी महिन्यात ठाण्यात तर मे महिन्यात शिवतीर्थावर भव्य सभेचे नियोजन
आगामी विधानसभा निवडणुकीत कोकणातल्या काही मतदारसंघांमध्ये कुणबी समाजाच्या मतदानाची टक्केवारी पाहता निवडणुकीच्या रिंगणात देखील कुणबी संघटना किंवा कुणबी समाज नेते उतरण्याची दाट शक्यता आहे.
Konkan Politics : कोकणात (Kokan) आता आगामी निवडणुकांमध्ये (Election) कुणबी फॅक्टर किंवा कुणबी वोट बँकचं (Kunabi Vote Bank) राजकारण होणार का? लोकसभा असो अथवा विधानसभा किंवा अगदी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यामध्ये कुणबी समाज एकत्र येत निर्णायक भूमिका बजावणार का? याची चर्चा सुरु झाली आहे. त्याचं कारण म्हणजे सध्या कुणबी जोडो अभियानांतर्गत कुणबी समाजाच्या काही प्रमुख नेत्यांनी कुणबी समाजाला जिल्ह्यानुसार एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरु केले आणि यावेळी चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा दावा या नेत्यांकडून केला जात आहे.
फेब्रुवारी महिन्यात ठाण्यात तर मे महिन्यात शिवतीर्थावर भव्य सभेचे नियोजन
आगामी काळात कुणबी समाजाची एक वेगळी राजकीय संघटना स्थापन करण्याचा देखील प्रयत्न सध्या सुरु आहे. साधारणपणे 8 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी दरम्यान ठाणे येथे लाखोंच्या संख्येने कुणबी समाजाला एकत्र आणण्याचे नियोजन सुरु असून मे महिन्यामध्ये शिवाजी पार्कवर मोठी सभा घेण्याचा प्लॅन आहे. रत्नागिरी जिल्ह्यातले नाणार रिफायनरी विरोधातील प्रमुख नेते आणि कुणबी समाजाचे नेते म्हणून ज्यांची ओळख आहे त्या अशोक वालम यांनी हे नियोजन केलं आहे. मे महिन्यात झालेल्या सभेनंतर कदाचित कुणबी समाजाची एखादी वेगळी राजकीय संघटना देखील स्थापन केली जाण्याची शक्यता आहे. मुख्य बाब म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकीत कोकणातल्या काही मतदारसंघांमध्ये कुणबी समाजाच्या मतदानाची टक्केवारी पाहता निवडणुकीच्या रिंगणात देखील कुणबी संघटना किंवा कुणबी समाज नेते उतरण्याची दाट शक्यता आहे.
रिफायनरी आंदोलकांना आणखी पाठबळ कसं मिळेल?
साधारणता: कोकणातल्या एकूण कुणबी समाजाच्या लोकसंख्येचा विचार केल्यास ती 60 ते 70 टक्क्यांच्या दरम्यान आहे. परिणामी कुणबी समाजाची मत ही निर्णायक देखील ठरतात. हीच बाब लक्षात घेत सध्या कुणबी समाजाचे नेते मोर्चेबांधणी करत असताना दिसून येत आहेत. राजापूर तालुक्यातील प्रस्तावित रिफायनरीला विरोध हा देखील यातला एक महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण पनवेल इथे झालेल्या कुणबी जोडो अभियानामध्ये रिफायनरीच्या विरोधात भूमिका घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे राजापूर तालुक्यातल्या रिफायनरी आंदोलकांना आणखी पाठबळ कसं मिळेल? याची देखील सध्या तयारी होत असतानाच चित्रात दिसून येत आहे.
नेत्यांचं नेमकं म्हणणं काय?
ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा विचार केल्यास कुणबी समाजाची संख्या मोठी आहे. पण राजकीय स्थान मात्र कुणबी समाजाला नाही. आमच्यामुळे आमदार खासदार निवडून येतात. निवडणुका आल्यानंतर मोठ्या प्रमाणात असलेला कुणबी समाज यामध्ये निर्णायक भूमिका बजावतो. पण कुणबी समाजाचा आमदार, खासदार किंवा लोकप्रतिनिधी मात्र नाही. त्यामुळे ज्या ठिकाणी आमची ताकद आहे, त्या ठिकाणी मात्र आम्ही आमचा लोकप्रतिनिधी निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. समाज म्हणून एकत्र येण्याचा आवाहन आम्ही लोकांना केलं आहे. आतापर्यंत झालेले मेळावे, कुणबी जोडो अभियान त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आणि त्यामुळे आम्हाला आशा आहे की, आगामी निवडणुकांमध्ये देखील कुणबी समाज एकत्र येईल. त्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत. आत्तापर्यंत मिळालेल्या प्रतिसादामुळे आमच्या अशा नक्कीच वाढल्या आहेत. त्यामुळे कुणीही, कोणतेही राजकीय पक्षाने किंवा नेत्याने आम्हाला गृहित धरु नये. त्यामुळेच आम्ही आता राजकारणाच्या आखाड्यात उतरणार आहोत. आमच्या संघटनेचे नाव, ध्येयधोरणं लवकरच स्पष्ट करु असं कुणबी समाजाच्या नेत्यांनी म्हटले आहे .