(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kolhapur Cold Wave : कोल्हापूर गेल्या 10 वर्षांत चौथ्यांदा गारठले; पुढील तीन दिवस थंडी राहण्याची शक्यता
Kolhapur News : कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून पारा कमालीचा घसरला आहे. पारा 15 अंश सेल्सिअसपर्यंत घसरल्याने जिल्हा गेल्या 10 वर्षात चौथ्यांदा गारठले आहे.
Kolhapur News : कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून पारा कमालीचा घसरला आहे. पारा 15 अंश सेल्सिअसपर्यंत घसरल्याने जिल्हा गेल्या 10 वर्षात चौथ्यांदा गारठले आहे. दिवसभर निरभ्र वातावरण आणि ऊन असूनही बोचरी थंडी जाणवत आहे. दरम्यान, गेल्या दोन वर्षातील हे निच्चांकी तापमान आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील दोन ते तीन दिवस थंडी अशीच राहण्याची शक्यता आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून पारा सातत्याने घसरला आहे. दिवसभर थंडी जाणवत असातानाच रात्रीच्या वातावरणातही चांगलीच कडाक्याची थंडी जाणवत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात यापूर्वी 2007 मध्ये 9.7 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान घसरले होते. गेल्या चार वर्षात नोव्हेंबर महिन्यात चौथ्यांदा पारा 15 च्या घरात आला आहे. थंडीची तीव्रता अधिक वाढल्याने उबदार कपड्यांना सुद्धा मागणी वाढल्याचे दिसून येत आहे. कोल्हापूर शहरासह डोंगराळ भागात असणाऱ्या तालुक्यातही थंडीचा जोर आहे. चंदगड, आजरा, भुदरगड, राधानगरी, शाहुवाडी, गगनबावडा तालुक्यातही थंडी कायम आहे.
अनेक जिल्ह्यात थंडीची लाट
दररोजच्या दमट हवामानाचा सामना करणाऱ्या मुंबईकरांनाही थंडीचा अनुभव घेत आहे. मुंबईतही हवेत गारवा जाणवू लागला आहे. शहरातील किमान तापमान 17.5 अंश सेल्सिअसवर पोहोचलं आहे. कर्जतमध्ये 14 अंश सेल्सिअस तर लोणावळ्यात 13.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुण्यातील तळेगाव स्टेशनवर 10 अंश सेल्सिअस इतकी कमी तापमानाची नोंद झाली. पुण्यातील पाषाणमध्ये किमान तापमान 8.7अंश सेल्सिअस, अहमदनगर 9.8, राहुरी 9.7 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलं आहे.
दरम्यान, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र असो की मराठवाडा सर्वच ठिकाणी थंडीचा कडाका सुरु झाला आहे. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यातील किमान तापमानात घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. नंदुरबार, धुळे, नाशिक, जळगाव आणि अहमदनगर जिल्ह्यातील काही ठिकाणी तापमान 10 अंश सेल्सिअस खाली राहण्याचा अंदाज आहे. तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात तापमान 12 अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
महाराष्ट्रात सर्वाधिक थंडी नाशिकच्या ओझरमध्ये पडल्याची दिसते. परिणामी कडाक्याच्या थंडीने ओझरकर गारठले आहेत. निफाड तालुक्यातील ओझरमध्ये आज 5.7 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या