Kolhapur-Gaganbawda-Karul Ghat-Talere Highway : कोल्हापूर-गगनबावडा-करुळ घाट-तळेरे महामार्ग नव्हे 'मसणवाट' जाहीर करा! क्षणाक्षणाला मृत्यूला आमंत्रण
Kolhapur-Gaganbawda-Karul Ghat-Talere Highway : जी भिकार अवस्था कोल्हापूर शहरातील अंतर्गत रस्त्यांची आहे तीच अवस्था कोल्हापूरला जोडणाऱ्या महामार्गांची सुद्धा झाली आहे.
Kolhapur-Gaganbawda-Karul Ghat-Talere Highway : जी भिकार अवस्था कोल्हापूर शहरातील अंतर्गत रस्त्यांची आहे तीच अवस्था कोल्हापूरला जोडणाऱ्या महामार्गांची सुद्धा झाली आहे. कोल्हापूर-गगनबावडा-करुळ घाट-वैभववाडी-तळेरे मार्गाची अवस्था म्हणजे हा महामार्ग नसून मसणवाट झाली आहे. करूळ घाटात रस्ताच उखडून गेला असून दीड ते दोन फुटांपर्यंत खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी 50 ते 100 फुटांवरील रस्ताच गायब झाला आहे. करुळ घाटात अवघड वळणांवर गुडघाभर खोल आणि 15 ते 20 फुट लांब खड्ड्यांनी वाहन चालवायचे तरी कसे? असाच प्रश्न पडतो.
कोल्हापूर - गगनबावडा- करुळ घाट-तळेरे महामार्ग मृत्यूचा सापळा
कोल्हापूर-गगनबावडा मार्गाचीही (Kolhapur-Gaganbawda-Karul Ghat-Talere Highway) अवस्था सुद्धा काहीशी अशीच झाली आहे. या मार्गावर आता ऊस वाहतूक वाढल्याने चिंतेत आणखी भर पडली आहे. या मार्गावरूनही प्रवास करतानाही संध्याकाळी घरी परतण्याची कोणतीही श्वाश्वती नाही. या मार्गावर खड्ड्यात जाऊन ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टर उलटले आहेत. दररोज किरकोळ अपघात घडत आहेत. सुमारे 25 जणांचा बळी या मार्गावर गेला आहे.
कोल्हापूर शहरातील रस्ते ज्या पद्धतीने खड्ड्यात गेले आहेत तशीच अवस्था कोल्हापूर-गगनबावडा-करुळ घाट-तळेरे महामार्गाची झाली आहे. कोल्हापूर शहरापासून उखडलेला रस्ता, खड्डे यांची मालिका सुरु होते ती थेट 90 किमीवरील तळेरे बसस्थानकापर्यंत जाऊन थांबते इतकी भीषण अवस्था आहे. तळेरेच्या दिशेने वैभववाडीपर्यंत पॅचवर्क सुरु असले, तरी चिंधड्या झालेल्या रस्त्यावर ठिगळं लावण्याचा प्रकार झाला आहे.
करुळ घाटात सेकंदाला मृत्यूला आमंत्रण
करुळ घाटातून कोल्हापूरच्या दिशेने येत असताना पार घाटातील कोल्हापूरची हद्द लागेपर्यंत करूळ घाटातील रस्त्याची अवस्था भिकार, दयनीय, पाणंद, कचरा या शब्दांना सुद्धा लाजवेल, अशी झाली आहे. त्यामुळे कोल्हापूरहून सिंधुदुर्ग तसेच कोकण गोव्याकडे जाण्याचा नादच सोडून दिला आहे. विविध ठिकाणी खचलेला घाट, साईट पट्ट्यांची दुरावस्था, त्याचबरोबर रस्त्यांच्या मधोमध पडलेले महाकाय खड्डे तसेच 25 ते 50 फुट संपूर्ण उखडून गेलेला रस्ता अशी अवस्था करूळ घाटाची झाली आहे.
सिंधुदुर्ग हद्द संपल्यानंतर कोल्हापूर हद्दीत घाटाची अवस्था तुलनेत बरी असली, तरी खड्ड्यातून सुटका होत नाही. त्यामुळे दररोज 15 ते 20 हजार वाहने क्षणाक्षणाला मृत्यूला आमंत्रण देत प्रवास करत आहेत. कोल्हापूर-गगनबावडा-करुळ घाट-तळेरे महामार्ग एप्रिल 2020 पासून राष्ट्रीय महामार्ग रुपांतर झाला आहे.
कोल्हापूर ते गगनबावडाही मार्गावरही दैना
कोल्हापूर ते कळे हा पहिल्यांदा रुंदीकरण होणार आहे. मात्र, या मार्गाची झालेली दैना उघड्या डोळ्यांना पाहवत नाही, अशी झाली आहे. 100 ते 200 मीटर तुलनेत ठिक त्यानंतर पुन्हा पूर्णत: उखडलेला रस्ता अशीच अवस्था गगनबावड्यांपर्यंत आहे. त्यामुळे पॅचवर्कच्या मलमपट्टीने आजचे मरण उद्यावर अशी स्थिती झाली आहे.
व्हाया कोल्हापूर कोकणात जाणारी वाहने 20 हजारांच्या घरात असून आतापर्यंत शेकडो अपघात झाले आहेत. त्यामुळे अनेकांनी जीव गमावला आहे. डाॅ. डी. वाय. पाटील साखर कारखाना, कुडित्रे तसेच राजाराम कारखान्याची ऊस वाहतूकही याच मार्गावरून होत आहे. दोन ते तीन ऊस वाहतूक ट्राॅली याच खड्ड्यांमध्ये अडकून पलटी झाल्याची घटनाही हंगाम सुरु होताच झाल्या आहेत.
गोवा, तळकोकणात जाणाऱ्या वाहनधारकांनी नाद सोडला
कोल्हापूर हे कोकणचे प्रवेशद्वार आहे. त्यामधील कोल्हापूर-गगनबावडा-करुळ घाट-तळेरे महामार्ग अत्यंत महत्वाचा आहे. तळेरेतून मुंबई गोवा महामार्गाने प्रवास करता येत असल्याने तेथून काडी अडचण नाही. मात्र, तळेरे ते कोल्हापूर या 90 किमी अंतराची दैना पाहून बाहेरून येणाऱ्या पर्यटकांनी तसेच वाहतूकदारांनी राधानगरी-फोंडा किंवा आजरा आंबोलीतून कोकणात जाण्याचा मार्ग अवलंबला आहे. आजऱ्यापासून आंबोलीपर्यंतही रस्त्याची अवस्था सुमार आहे. तुलनेत राधानगरी-फोंडा मार्ग बरा आहे.
इतर महत्वाच्या बातम्या