(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Indian gaurs in kolhapur : कोल्हापूर शहराच्या वेशीवर गव्यांच्या कळपाचा मुक्काम; ऊसतोड सुरु असल्याने शेतकऱ्यांमध्ये दहशत
कोल्हापूर शहराच्या वेशीवर गव्यांचा कळप दिसून आल्याने शेतकऱ्यांसह जॉगर्स,मॉर्निंग वॉक करणाऱ्यांमध्ये दहशत पसरली आहे. रमणमळा परिसरात शनिवारी पहाटे गव्यांचा कळप दिसून आला.
Indian gaurs in kolhapur : कोल्हापूर शहराच्या वेशीवर गव्यांचा कळप दिसून आल्याने शेतकऱ्यांसह जॉगर्स,मॉर्निंग वॉक करणाऱ्यांमध्ये दहशत पसरली आहे. रमणमळा परिसरात शनिवारी पहाटे गव्यांचा कळप दिसून आला. गव्यांचा कळप दिसल्याने वनविभागही सतर्क झाला असून अधिक कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. कळप दिसल्यानंतर वनविभागाने शहराच्या हद्दीत नागाळा पार्क, जयंती नाला आणि रमणमळा परिसरात तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढवली आहे. कर्मचाऱ्यांनी लाल मिरची पावडरचा धूर करून गव्यांना घालवण्यासाठी प्रयत्न केला जातो.
वनपरिक्षेत्राधिकारी विजय पाटील यांनी अधिक माहिती देताना सांगितले, “प्राणी उसाच्या शेतात आश्रय घेतात, जिथे ते दिवसभर विश्रांती घेतात, गोड उसाचा आस्वाद घेतात आणि नंतर रात्री बाहेर पडतात. ऊस हा आवडता चारा आहे आणि ऊस तोडणीचा हंगाम सुरू झाला की हे प्राणी वनक्षेत्रातून ऊसाच्या शेतात वळतात.”
ते पुढे म्हणाले, “आमचे कर्मचारी गव्यांच्या कळपाचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. एखाद्याला गवा दिसल्यास लोकांनी अराजकता निर्माण करू नये कारण एखाद्या लहानशा चुकीमुळे त्यांना त्रास होऊ शकतो. पंचगंगा नदी, वडणगे, खुपिरे, आंबेवाडी, चिखली, शिंगणापूर गावे ओलांडून हे प्राणी स्वतःहून परततील.”
नदीकाठच्या भागात फिरत गवे रमणमळ्याच्या दिशेने आल्याच्या पाऊलखुणा वन पथकाला दिसल्या आहेत. तरीही खबरदारीसाठी वनविभागाची तीन पथके आज येथे गस्त घालत असून गवे मानवी वस्तीकडे घुसणार नाहीत, याची खबरदारी घेतली जात आहे. कोल्हापुरात सहा गव्यांचे दर्शन विन्स हॉस्पिटल परिसरात झाले. त्यानंतर वनविभागाच्या पथकाने या गव्यांना नदीकाठाने पिटाळून लावले. बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास गवे वडणगेच्या दिशेने गेल्याची खात्री वनपथकाने केली होती. गुरुवारी दिवसभर गव्यांचा वावर शहराच्या बाजूला आढळला नाही.
वनविभागाचे बचाव पथक तसेच करवीरच्या वनपथकाने नदीकाठच्या ऊस शेतीत पाहणी केली. तेव्हा त्यांना गवे दिसले नाहीत, मात्र परिसरातील शेतमजुरांनी दोन गवे दिसल्याचे सांगितले. त्यामुळे या भागात गवे परतल्याचा अंदाज होता. सायंकाळी सहानंतर गवे पुन्हा नदीकाठाने वडणगेच्या दिशेला गेल्याच्या पाऊलखुणा दिसल्या. मात्र, खात्री नसल्याने गवे नदीकाठालगतच असतील, अशी शक्यता गृहीत धरून वन कर्मचाऱ्यांनी या भागात शेकोटी करीत गस्त लावली आहे. खबरदारीचा भाग म्हणून रमणमळा पाणंद रस्ता, बेडेकर मळा, शंभर फुटी रोड या भागात वनविभागाची गस्त सुरू आहे.
इतर महत्वाच्या बातम्या