(Source: ECI/ABP News/ABP Majha)
India Lockdown | लॉकडाऊनमुळे जगभरातली इंटरनेट सेवा ढेपाळली!
ध्या घरगुती इंटरनेट सेवेवर मोठा ताण आला असून इंटरनेट सेवा पुरती ढेपाळली आहे. साधं ब्राऊझिंग करतानाही कमी स्पीडमुळे अडथळे येत आहेत. त्यामुळे आजच्या काळाची मूलभूत गरज बनलेल्या इंटरनेट अभावी लोक त्रस्त झाले आहेत.
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन करण्यात आलं असून लोकांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र यामुळे इंटरनेट सेवेवर मोठा ताण आला असून जगभरातली इंटरनेट सेवा ढेपाळली आहे. त्यामुळं आता आम्ही करायचं तरी काय? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
कोरोनाच्या संकटामुळे भारतात लॉकडाऊन जाहीर करण्यात आलं आहे. लोकांना घराबाहेर न पडण्याच्या आणि घरातूनच काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र यामुळे सध्या घरगुती इंटरनेट सेवेवर मोठा ताण आला असून इंटरनेट सेवा पुरती ढेपाळली आहे. साधं ब्राऊझिंग करतानाही कमी स्पीडमुळे अडथळे येत आहेत. त्यामुळे आजच्या काळाची मूलभूत गरज बनलेल्या इंटरनेट अभावी लोक त्रस्त झाले आहेत.
सध्या कोरोनामुळे वर्तमानपत्र घरोघरी येणं बंद झालंय. त्यामुळे वर्तमानपत्रांच्या वेबसाईटवर जाऊन ईपेपर वाचायचा म्हटला, तरी वेबसाईट लोड होण्यासाठी साधारण 10 मिनिटे लागतात. याचा सर्वसामान्यांना मनस्ताप होत आहे.
इंटरनेट ही आजच्या तरुण वर्गाची अत्यंत गरजेची गोष्ट आहे. घरबसल्या पब्जीसारखे अनेक ऑनलाईन गेम खेळून तरुण मंडळींचा टाईमपास होईल अशी अपेक्षा होती. मात्र इंटरनेट अभावी ती आशाही मावळली. त्यामुळे तरुणाई सध्या कॅरम, पत्ते या जुन्या खेळांकडे वळली आहे. मात्र ते तरी किती वेळ खेळणार? विरंगुळा म्हणून टिकटॉक ओपन करावं तरी व्हिडीओ ओपन होत नाही, त्यामुळं आता काय करावं? असा प्रश्न तरुणाईला पडला आहे.
इंटरनेटची ही समस्या फक्त मुंबई, महाराष्ट्र किंवा भारतापुरती मर्यादित नाही. तर जगभरात ही समस्या भेडसावत असल्याचं इंटरनेट क्षेत्रातल्या तज्ज्ञांचं मत आहे. एरवी दिवसाला येणाऱ्या तक्रारी सध्या तिप्पट वाढल्या आहेत. स्पीडही अतिशय कमी आहे. मात्र सध्या तरी यावर काहीच उपाय नाही. कारण मोठमोठ्या सर्व्हिस प्रोव्हायडर्सकडेही काम करायला ऑफिसमध्ये मनुष्यबळ नाही.
कोरोनाशी लढण्यासाठी घरात बसण्याच्या सरकारच्या आवाहनाला सगळेच प्रतिसाद देत आहे. मात्र कधीच इतके दिवस घरी बसायची आणि इंटरनेट शिवाय जगायची सवय नसलेल्या नागरिकांना आता इंटरनेटच मिळालं नाही, तर वेडंपिसं व्हायची वेळ येईल, हे मात्र नक्की.
संबंधित बातम्या :
डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांना घर सोडण्यास सांगितल्यास मालक, सोसायट्यांवर कारवाई
Corona helpline numbers | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील हेल्पलाइन क्रमांकांची यादी जारी
WEB EXCLUSIVE | 'कोरोना किलर मशीन' कसं काम करते?; सांगतायेत 'सायन्स अँड टेक्नॉलजी पार्क'चे महासंचालक