(Source: ECI/ABP News/ABP Majha)
डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांना घर सोडण्यास सांगितल्यास मालक, सोसायट्यांवर कारवाई
काही ठिकाणी घरमालक किंवा हाऊसिंग सोसायट्या भाड्याने राहत असलेल्या डॉक्टर, नर्सिंग कर्मचारी आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घर सोडून जाण्यास सांगत असल्याच्या तक्रारी समोर आल्या. त्यानंतर सरकारने घरमालक आणि सोसायट्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
मुंबई : डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचाऱ्यांना घर सोडण्यास सांगितलं तर घरमालक आणि हाऊसिंग सोसायटीवर कारवाई होणार, असा इशारा सरकारने दिला आहे. भाड्याच्या घरात राहणाऱ्या डॉक्टर, नर्स यांना बाहेर काढण्याच्या तक्रारी आल्यानंतर सरकारने हा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात सरकारने प्रसिद्धी पत्रक जाहीर केलं आहे.
"राज्यात काही ठिकाणी घरमालक किंवा हाऊसिंग सोसायट्या भाड्याने राहत असलेल्या डॉक्टर, नर्सिंग कर्मचारी आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घर सोडून जाण्यास सांगत असल्याच्या तक्रारी समोर आल्या. मात्र मानवतेच्या दृष्टीने तर हे अत्यंत चुकीचे आहेच परंतु नियमबाह्य देखील आहे. घरमालकांनी आणि सोसायट्यांनी आरोग्य यंत्रणेचे महत्त्व लक्षात घेऊन सहकार्य करावे. अन्यथा साथरोग नियंत्रण कायद्यानुसार संबंधित घरमालक किंवा हाऊसिंग सोसायटीवर कारवाई करण्यात येईल," असं सरकारतर्फे सांगण्यात आलं आहे.
"सध्या करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यातील डॉक्टर, नर्सिंग कर्मचारी आणि इतर आरोग्य कर्मचारी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. हे करताना त्यांना कोरोनाची लागण होऊ नये यासाठी आवश्यक ती सर्व काळजी त्यांच्यामार्फत तसेच प्रशासनामार्फत घेतली जात आहे. त्यामुळे त्यांच्याकडून इतरांना संसर्गाचा कोणताही धोका नाही," असं सरकारच्या वतीने सांगण्यात आलं आहे.
असे असूनही काही घरमालक, हाऊसिंग सोसायट्या त्यांच्याकडे भाड्याने राहणारे डॉक्टर, नर्सिंग कर्मचारी आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांनाघर सोडण्यास सांगत असल्याच्या तक्रारी मिळाल्या आहेत. हे पूर्णतः चुकीचे असून संबंधित घरमालक, हाऊसिंग सोसायट्यांनी असे करु नये, असं आवाहन सरकारने केलं आहे. एखादे घरमालक किंवा हाऊसिंग सोसायटी असे करत असल्याचे निदर्शनास आल्यास साथरोग नियंत्रण कायद्यानुसार त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल," असा इशाराही सरकारने दिला आहे.
दरम्यान, "भाड्याच्या घरात राहणारे डॉक्टर, नर्सिंग कर्मचारी आणि इतर आरोग्य कर्मचारी यांना असा अनुभव आल्यास त्यांनी आपल्या परिसरातील पोलीस ठाण्याशी संपर्क साधून तक्रार करावी," असं आवाहनही सरकारने केलं आहे.