(Source: ECI/ABP News/ABP Majha)
International Sports Day : सत्तरी गाठलेल्या ध्येयवेड्या कॅरम खेळाडूची गोष्ट! 200 हून अधिक स्पर्धा जिंकल्या, बक्षिसांत मिळालेले पैसे केले शाळेला दान
कॅरम खेळाडू अशोक केदारी यांनी कॅरमच्या स्पर्धेत बक्षीस म्हणून मिळालेली सगळी रक्कम त्यांनी शाळेला दान केली आहे. मागील अनेक वर्षांपासून ते कॅरमच्या स्पर्धेत सहभाग घेतात.
International Sports Day : खेळ, खेळाबाबत असलेली प्रामाणिकता आणि (International Sports day) खेळातून मिळणारा आनंद काही औरच असतो. आज आंतरराष्ट्रीय क्रीडा दिन आहे. पुण्यातील ध्येयवेड्या आणि दानशूर कॅरम खेळाडूने कौतुकास्पद कामगिरी केली आहे. कॅरमच्या पुण्यात मोठ्या स्पर्धा होतात. खेळाच्या माध्यामातून मोठ्या रकमेची बक्षिसं मिळतात. त्यात बक्षिसांच्या माध्यामातून अनेक खेळाडू आपलं घर चालवतात. मात्र या सगळ्याला पुण्यातील कॅरम खेळाडू अशोक केदारी अपवाद ठरले आहे. कॅरमच्या स्पर्धेत बक्षीस म्हणून मिळालेली सगळी रक्कम त्यांनी शाळेला दान केली आहे. मागील अनेक वर्षांपासून ते कॅरमच्या स्पर्धेत सहभाग घेतात. या स्पर्धेमार्फत मिळालेली बक्षीसरुपी पैसे त्यांनी स्वत:साठी न वापरता ती गरजूंना आणि शाळेला दान केली आहे. त्यांच्या या कार्याचं सध्या सगळीकडून कौतुक होत आहे.
200 हून अधिक स्पर्धा जिंकल्या...
केदारी हे मूळचे पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील अमराळवाडी गावातील आहेत. मात्र त्यांचं बालपण पुण्यातच गेलं आहे. लहानपणापासूनच त्यांना कॅरम खेळाची आवड होती. त्यामुळे ते राहत असलेल्या वाड्यात काहीजण कॅरम खेळत असत. त्यांचे वडील सुतार होते. त्यांनी वडिलांकडे हट्ट धरुन कॅरम बनवून घेतला आणि खेळायला सुरुवात केली. खेळाची आवड एवढी वाढली की ते दिवसातील 6 ते 8 तास कॅरम खेळत असत. आज त्यांचं वय 70 आहे आणि आजहीते नेमाने कॅरम खेळतात. त्यांच्या आतापर्यंतच्या आयुष्यात त्यांनी 400 हून अधिक कॅरम स्पर्धांमध्ये भाग घेतला आणि त्यातील 200 हून अधिक स्पर्धा जिंकल्या आहेत. विशेष म्हणजे स्पर्धा जिंकून मिळालेली बक्षीसरुपी रक्कम त्यांनी स्वत:साठी न वापरता ती गरजूंना आणि शाळेला दान केली आहे.
वयानं सत्तरी गाठली तरी हात थरथरत नाही...
वयाने सत्तरी गाठली मात्र त्यांचा खेळ अजूनही तरुण आहे. वयोमानामुळे ते आता फक्त पुण्यातील काही ठराविक ठिकाणीच कॅरम स्पर्धांमध्ये भाग घेतात. सिंहगड परिसर क्लबतर्फे आयोजित स्पर्धांमध्ये गेली 10 वर्षांपासून काकांना कोणीही हरवू शकले नाही. तसेच पुणे श्रमिक पत्रकार संघाची होणारी वार्षिक कॅरम स्पर्धेतही गेली सलग 20 वीस वर्ष त्यांनीच विजेतेपद पटकवले आहे. नवखे खेळाडू सत्तरी गाठलेल्या तरुणाचा खेळ पाहून अवाक् होत असतात.
बाप से बेटी सवाई मात्र...
केदारी हे संसाराचा गाडा चालवण्यासाठी सुरुवातीपासून वर्तमानपत्रांमध्ये प्रूफ रिडर म्हणून काम करतात. त्यांनी आतापर्यंत अनेक वर्तमानपत्रात त्यांनी काम केलं आहे. वडिलांचा कॅरमचा छंद पाहून त्यांची लेकदेखील याच खेळात तरबेज झाली आहे. मेघना केदारी यांना केदारी यांनी कॅरमची आवड लावली आणि उत्कृष्ट खेळाडू बनवले. दिल्ली, मद्रास येथील राष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेऊन विजय मिळवला. मात्र काकांचा हा आनंद फार काळ टिकू शकला नाही. दुर्दैवाने मेघना यांचे अकाली निधन झाले.
सर्व स्तरावरुन कौतुकाची थाप...
केदारी यांचं आतापर्यंत खेळासाठी अनेक स्तरावरुन कौतुक करण्यात आलं आहे. 1989 मध्ये तत्कालीन उपराष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांच्या हस्ते मुंबईत राष्ट्रपतीपदक मिळालं होतं.1986 साली अटलबिहारी वाजपेयी यांच्याकडूनही गौरव करण्यात आला. तसेच 1986 मध्येच पुणे शहराचे तत्कालीन महापौर उल्हास ढोले पाटील यांच्याकडूनही पुणे महानगरपालिकेतर्फे केदारी यांचा गौरव करण्यात आला होता.