एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
Anil Patil : एकनाथ खडसे आणि मंत्री गिरीश महाजन हे पुन्हा एकत्र येण्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे वक्तव्य रक्षा खडसेंनी केले होते. यावर अनिल पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
जळगाव : केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे (Raksha Khadse) यांनी ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) हे पुन्हा एकत्र येण्यासाठी मी नक्की प्रयत्न करणार असे वक्तव्य केले. आता यावर मंत्री अनिल पाटील (Anil Patil) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
रक्षा खडसेंनी मंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर त्या शनिवारी प्रथमच रावेर मतदारसंघात दाखल झाल्या. यावेळी कार्यकर्त्यांकडून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. पत्रकारांशी संवाद साधताना रक्षा खडसे यांनी एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाबाबत आणि गिरीश महाजन-एकनाथ खडसे यांच्या वादाबाबत महत्वाचे भाष्य केले होते.
दिल्लीतली चर्चा गल्लीत किती यशस्वी होते हे काळ अन् वेळच ठरवेल
यावरून अनिल पाटील म्हणाले की, रक्षा खडसे या एकनाथ खडसेंच्या सून आहेत. त्यामुळे गिरीश महाजन व एकनाथ खडसेंना एकत्र आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला पाहिजे. एकनाथ खडसेंनी मनापासून रक्षा खडसेंचा भाजपचा प्रचार केला आहे. त्यामुळे एकनाथ खडसे व गिरीश महाजन यांच्यातील दुरावा नक्की कमी व्हावा यासाठी शुभेच्छा. मात्र दुरावा कमी करून घेण्याकरिता दिल्लीतली झालेली चर्चा ही गल्लीमध्ये किती यशस्वी होते हे काळ आणि वेळ ठरवेल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
राष्ट्रवादी वाढवण्यास भुजबळांचा सर्वात मोठा वाटा
गेल्या काही दिवसांपासून मंत्री छगन भुजबळ यांच्या नाराजीच्या चर्चा पुन्हा एकदा रंगल्या आहेत. याबाबत अनिल पाटील यांनी म्हटलं की, छगन भुजबळ आमचे ज्येष्ठ नेते आहेत. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून राष्ट्रवादी वाढवण्यास सर्वात मोठा वाटा छगन भुजबळांचा आहे. त्यांचा ज्येष्ठतेबाबत कोणीही प्रश्नचिन्ह उभे करू शकत नाही. सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज भरला त्यावेळी छगन भुजबळ हे खुश व आनंदात होते. नाशिकची जागा आम्हाला मिळावी हा आग्रह नक्की होता. छगन भुजबळ यांच्या नाशिकमधून उमेदवारीबाबत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची चर्चा झाली होती. छगन भुजबळ यांच्यासारखा ज्येष्ठ नेता व ओबीसी नेतृत्व नाशिकच्या जागेच्या माध्यमातून देशपातळीवर पाठवण्यासंदर्भात चर्चा झाली होती. नाशिकची जागा मिळाली नाही ते आम्ही मान्य केलं मात्र महायुती म्हणून आम्ही त्या ठिकाणी प्रचार केला, असे त्यांनी म्हटले.
अनिल पाटलांचा मविआला टोला
महाविकास आघाडीमधले नेते म्हणतायेत की, आम्ही सोडून गेलेल्यांना परत घेणार नाही. मात्र तुमच्याकडे येतं कोण आहे? तुमच्याकडे यायलाच कोणी तयार नाही. तुम्ही जबरदस्ती लोकांना का सांगताय की आम्ही घ्यायला तयार नाही. येणारा माणूस कोणाला सांगून येत नाही. ज्याला घ्यायचं असतं तो जाहीर करत नाही. महाविकास आघाडीतील कोणताही नेता बोलत असला तरी त्यांच्याकडे कोणी जायला तयार नाही हे त्यांच्याच बोलण्यावरून स्पष्ट होते, असा टोला त्यांनी यावेळी महाविकास आघाडीला लगावला.
आता दंगली घडवण्याचा शोध त्यांनी लावलाय
सोलापुरात लोकसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पिलावळ्यांचा दंगली घडवण्याचा प्लॅन होता, असा गंभीर आरोप काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी केला. याबाबत अनिल पाटील म्हणाले की, प्रणिती शिंदे यांना कुठे स्वप्न पडलं आणि कुठे कुठे दंगली घडल्या हे प्रणिती शिंदे यांनाच विचारलं पाहिजे. आधी ईव्हीएमवर महाविकास आघाडीवाले बोलायचे, ईव्हीएमवर वल्गना करायचे. आता दंगली घडवण्याचा शोध त्यांनी लावला आहे. दंगली घडवून कोणालाही मत प्राप्त होत नसतात. माहोल बनवण्याचा महाविकास आघाडीचा हा प्रयत्न त्यांच्या नेत्यांकडून केला जातोय. महाविकास आघाडीचे नेते जनतेला फसवत आहेत, अशी टीका त्यांनी यावेळी केली आहे.
आणखी वाचा