यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
यम्मो कंपनीचे आईस्क्रीम विविध ठिकाणावरून बनवून घेतले जातात, त्यापैकी ते इंदापुरातील फॉर्च्यून डेअरीमार्फत देखील बनवले जातात
पुणे : आईस्क्रीममध्ये मानवी शरिराचे बोट सापडल्याने खळबळ उडाली असून अन्न व औषध प्रशासन विभागाने कारवाईही सुरू केली आहे. मुंबईच्या (Mumbai) मालाडमधील एका महिलेने ऑनलाईन पद्धतीने यम्मो कंपनीचं आईस्क्रीम मागवले होते. या महिलेने त्या आईस्क्रीमचा कोन खायला सुरुवात करताच तिला त्यामध्ये मानवी बोटाचा तुकडा दिसला. आईस्क्रीममध्ये (Ice cream) मानवी अवयवाचा तुकडा पाहातच महिला ओरडू लागली आणि बेशुद्ध पडली. काही क्षण तिच्या कुटुंबातील लोकांनाही काहीच समजलं नाही. पण, त्यांना सर्व प्रकार लक्षात येताच त्यांनी तात्काळ मलाड पोलीस ठाणे गाठलं. मालाड पोलिसांनी (Police) याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर यम्मो कंपनीवर कारवाई सुरू झाली असून इंदापूर (Indapur) येथील फॉर्च्यून डेअरीलाही उत्पादन बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यासंदर्भात आता डेअरीचे संचालक सजिन जाधव यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.
यम्मो कंपनीचे आईस्क्रीम विविध ठिकाणावरून बनवून घेतले जातात, त्यापैकी ते इंदापुरातील फॉर्च्यून डेअरीमार्फत देखील बनवले जातात. मुंबईतील मालाडमध्ये एका महिलेला आईस्क्रीममध्ये मानवी बोट सापडल्याच्या घटनेनेनंतर इंदापुरातील फॉर्च्यूनर डेअरीचा परवाना स्थगित करण्यात आला आहे. त्यानंतर, फॉर्च्यून डेअरीचे संचालक सचिन जाधव यांनी पत्रकार परिषदेत घेत यम्मोने आईस्क्रीम बनवणाऱ्या सर्व कंपन्यांचा पुरवठा तात्पुरत्या स्वरुपात स्थगित केल्याची माहिती दिली.
यम्मो कंपनीच्या ब्रँडला बाजारात बदमान करण्याची शक्यता असल्यामुळे असा प्रकार झाला असावा असा खळबळजनक दावाही त्यांनी प्रतिक्रियेच्या माध्यमातून केला आहे. कंपनीबाबत झालेल्या तक्रारीसंदर्भात पोलीस तपास सुरु आहे. यंत्रणेला तपासात आम्ही सहकार्य करत आहोत. एफएसआयकडून फॉर्च्यून डेअरी ही दूध, भुकटी, बटर उत्पादन करण्यासाठी परवानगी घेऊन ते पुन्हा चालू करण्यासाठी आमचा प्रयत्न असणार असल्याचंही फॉर्च्यून डेअरीचे सचिन जाधव यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे. सदर घटना मालाडमध्ये घडली असून तपास यंत्रणांचे काम सुरु आहे. याबद्दल अधिक कोणतीही माहिती आमच्यापर्यंत आलेली नाही. कंपनी कुठेही सील केलेली नाही कंपनीचा परवाना हा तात्पुरत्या स्वरूपात स्थगित केलेला आहे, असे जाधव यांनी सांगितले. दरम्यान, पुणे, गाझियाबाद आणि पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथून ही कंपनी आईस्क्रीमचे उत्पादन करते.
मुंबईतील मालाड परिसरात एका महिलेला आईस्क्रीमच्या कोनमध्ये मानवी बोटाचा तुकडा सापडला होता. या महिलेने ऑनलाइन डिलिव्हरी ॲपद्वारे यम्मो कंपनीचा आईस्क्रीम कोन मागवला होता. त्या आईस्क्रीम कोनमध्ये मानवी बोटाचा तुकडा आढळला. त्यामुळे घाबरलेल्या महिलेने मालाड पोलीस ठाणे गाठून पोलीस तक्रार दिली. मालाड पोलिसांनी यम्मो आईस्क्रीम कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करुन हे आईस्क्रीम तपासासाठी पाठवलं आहे. मालाड पोलिसांनी आईस्क्रीममध्ये सापडलेला मानवी अवयव फॉरेन्सिककडे विभाागाकडे (FSL) पाठवला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे. आईस्क्रीम ज्या ठिकाणी बनवले आणि पॅक केले त्याचाही शोध घेण्यात येणार आहे.