Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
रवींद्र वायकरांच्या मेव्हण्याकडेच ईव्हीएम अनलॉक करणारा मोबाईल सापडल्यानंतर पोलिस आता मोबाईल हाती कसा सापडला आणि ओटीपी जनरेट कसा करण्यात आला या संदर्भाने माहिती घेत आहेत.
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर अवघ्या 48 मतांनी विजयी झाल्यानंतर सुरू असलेला वाद अजूनही कायम आहे. आता या प्रकरणामध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे. ईव्हीएम अनलॉक करणारा मोबाईल हा रवींद्र वायकर यांच्या मेव्हण्याच्या हाती असल्याची धक्कादायक माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. या प्रकरणात वनराई पोलिसांकडून तपास सुरु आहे. त्यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. त्यामुळे आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत.
वायकरांच्या मेव्हण्याकडेच ईव्हीएम अनलॉक करणारा मोबाईल सापडल्यानंतर पोलिस आता मोबाईल हाती कसा सापडला आणि ओटीपी जनरेट कसा करण्यात आला या संदर्भाने माहिती घेत आहेत. मात्र, आता या प्रकरणावरून महाविकास आघाडीतील नेत्यांकडून मात्र निवडणूक आयोग आणि पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. मिड डे या इंग्रजी दैनिकाने या संदर्भातील वृत्त दिल्यानंतर आणि दुसरीकडे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सचे प्रमुख (पूर्वीच ट्विटर) एलाॅन मस्क यांनी ईव्हीएम हॅक होऊ शकते, त्याचा निवडणुकीत वापर करू नये असं ट्विट आजच केल्यानंतर आता वायकरांवर होत असलेल्या आरोपांवर विरोधकांना आणखी बळ मिळालं आहे.
गद्दार उमेदवार आता लोकशाहीशी गद्दारी करत आहे
आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत म्हटले आहे की, एकदा गद्दार तो गद्दार! उत्तर-पश्चिम मुंबईतील मिंधे टोळीच्या उमेदवाराचे प्रकरण गंभीर बनले आहे, कारण गद्दार उमेदवार आता लोकशाहीशी गद्दारी करत आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, संपूर्ण तडजोड- निवडणूक आयोगाने मतमोजणी केंद्राचे सीसीटीव्ही फुटेज शेअर करण्यास नकार दिला आहे. माझा अंदाज आहे की तो आणखी एक चंदिगडचा क्षण टाळण्याचा प्रयत्न करत आहे. आम्ही नेहमी म्हणतो की भाजप आणि मिंधे टोळीला आमची लोकशाही संपवायची आहे आणि आमची घटना बदलायची आहे. हा गैरप्रकार हा त्यांच्या सततच्या प्रयत्नांचा एक भाग आहे.
वायकर यांच्या विजयाचा निवडणूक निकाल रोखणार का?
खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी वनराई पोलिसांच्या तपासाबाबत निवडणूक आयोगाला प्रश्न विचारले आहेत अमोल कीर्तिकर यांनी विचारल्याप्रमाणे ते मतमोजणीच्या दिवसाचे सीसीटीव्ही फुटेज प्रसिद्ध करतील का? फुटेज देण्यास नकार देणाऱ्या उपनगर जिल्हाधिकाऱ्यांकडून ते उत्तरदायित्व मागतील का? वायकर यांच्या विजयाचा निवडणूक निकाल रोखणार का? एकदा मतमोजणी कशी झाली आणि रिटर्निंग ऑफिसरने मतांची फेरमोजणी कशी जाहीर केली हे ते स्पष्ट करतील का? 19 व्या फेरीनंतर प्रत्येक उमेदवाराला मिळालेल्या मतांची घोषणा का थांबवली गेली हे ते स्पष्ट करतील का? अशा प्रश्नांची सरबत्ती केली आहे.
ईव्हीएम म्हणजे ब्लॅक बॉक्स
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विट करत ईव्हीएम म्हणजे ब्लॅक बॉक्स असल्याचं म्हटलं आहे. जर प्रक्रियाच पारदर्शकपणे राबवली गेली नसेल तर लोकशाही ही लबाडी बनते असा आरोप त्यांनी मस्क यांच्या ट्विटला रिप्लाय देताना केला आहे. त्यांनी रवींद्र वायकर प्रकरणाचा संदर्भ दिला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे, राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी, सुषमा अंधारे, शरद पवार गटाच्या विद्या चव्हाण यांनी सुद्धा निवडणूक आयोग आणि वनराई पोलीस स्टेशनवर प्रश्नांची सरबत्ती केली आहे.
मंगेश पंडीलकरला ताबडतोब अटक झालीच पाहिजे
राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या प्रवक्त्या वंदना चव्हाण यांनी मंगेश पंडीलकरला ताबडतोब अटक झालीच पाहिजे, अशी मागणी केली आहे. त्यांनी ट्विट करत म्हटले आहे की, मंगेश पंडीलकरला ताबडतोब अटक झालीच पाहीजे. दिनेश गुरवने EVM मशिन अनलॅाक केले. आयोगाने एकदा 2200 मताने विजयी झालेले अमोल किर्तीकर उमेदवार हे खरे लोकांनी मतदारांनी निवडून दिलेले असतांना मतमजणी केंद्रावर हातचालाखी व EVM मध्ये फेरफार करून पिछाडीवर असलेल्या वायकरांना विजयी घोषीत करणे हे वरून आलेल्या आदेशाची चोर मार्गाने केलेला अमंलबजावणी आहे.
इतर महत्वाच्या बातम्या