एक्स्प्लोर
विठ्ठलाची शासकीय महापूजा मानाचे वारकरी करणार, मुख्यमंत्र्यांचा निर्णय
पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीची मानाची विठ्ठलाची महापूजा यावर्षी मानाचे वारकरी करणार आहेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेतला आहे.
![विठ्ठलाची शासकीय महापूजा मानाचे वारकरी करणार, मुख्यमंत्र्यांचा निर्णय honourable varkari will perform mahapooja in pandharpur cm decided latest updates विठ्ठलाची शासकीय महापूजा मानाचे वारकरी करणार, मुख्यमंत्र्यांचा निर्णय](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/10/16191547/Latur-CM-Devendra-Fadanvis-Helicoptor-5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीची मानाची विठ्ठलाची महापूजा यावर्षी मानाचे वारकरी करणार आहेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेतला आहे. एबीपी माझाला अधिकृत सूत्रांनी ही माहिती दिली आहे. महापुजेवेळी सोलापूरचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी तसंच अन्य मंत्री उपस्थित राहतील, असा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे.
मराठा समाजाच्या भावना लक्षात घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आषाढी पूजेला न जाण्याचा निर्णय घेतला. पंढरपुरात दरवर्षी आषाढीला राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय पूजा होते. मात्र यासाठी मराठा समाजाचा विरोध होता. ''मराठा आरक्षणासंदर्भात उच्च न्यायालय निर्णय घेऊ शकतं. काही संघटनांना हे माहित असूनही मराठा समाजाला उचकवण्याचं काम केलं जात आहे.
माझ्यावर दगडफेक करुन जर आरक्षण मिळत असेल तर मी तयार आहे,'' असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत. ''महाराष्ट्रात वारीची परंपरा 800 वर्षांपासून आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील याला सरंक्षण दिलं. मुख्यमंत्र्यांनी पूजा करावी ही परंपरा आहे. मी तीन वर्षांपासून जातो. मात्र काही संघटनांनी याला विरोध केला. ही भूमिका चुकीची आहे.
विठ्ठलाची पूजा करण्यापासून मला कोणीही रोखू शकत नाही. संरक्षणात ती केली जाऊ शकते. पण वारकऱ्यांच्या जीवाला धोका होईल म्हणून मी न जाण्याचा निर्णय घेतलाय,'' अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
आषाढी पूजा आणि आंदोलनाचा इतिहास
आषाढी यात्रा काळात आंदोलनाची ही पहिलीच वेळ नाही. या काळात नेहमीच आंदोलक सक्रिय असतात. कारण, या आंदोलनातून राज्याचं लक्ष वेधलं जातं. ही गेल्या अनेक वर्षांपासूनची ही प्रथा आहे. आषाढी यात्रेच्या काळात विविध संघटना आंदोलन करतात. ज्यामुळे यापूर्वीही अनेक नेत्यांना याचा फटका बसला आहे.
राज्यात 1996 साली युतीचं सरकार असताना मनोहर जोशी यांना आषाढीची पूजा रद्द करावी लागली होती. मुंबईतील रमाबाई आंबेडकर नगरमध्ये गोळीबार झाला होता. तेव्हा दलित संघटनांनी मनोहर मोठ्या आंदोलनाची तयारी केली मनोहर जोशींना पूजा न करु देण्याची भूमिका घेतली. त्यामुळे यात्रेला गालबोट लागू नये म्हणून मनोहर जोशी यांनी स्वतःच पंढरपूरला न जाण्याचा निर्णय घेतला. तेव्हा राज्याच्या मुख्य सचिवांनी पूजा केली होती.
राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आणि माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांना कार्तिकीची पूजा रद्द करावी लागली होती. वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ बंडा तात्या कराडकर यांच्या आंदोलननानंतर आर. आर. पाटलांनी पूजेला जाणं रद्द केलं. तेव्हाच्या वारकरी प्रश्नावर आंदोलन सुरु करण्यात आलं होतं.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुष्काळात धरणासंदर्भात केलेल्या वक्तव्याने राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. तेव्हा सर्वांनी त्यांच्या हस्ते होणाऱ्या कार्तिकीच्या पूजेला विरोध केला होता. त्यामुळे अजित पवार यांच्या हस्ते होणारी पूजा रद्द करण्यात आली आणि जिल्ह्यातले नेते दिलीप सोपल यांच्या हस्ते पूजा करण्यात आली.
काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनाही बंडा तात्या कराडकर यांनी अडवलं होतं. पंढरपुरातल्या शिवाजी चौकात मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवण्यात आला आणि आश्वासन घेतलं होतं. त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी पूजा केली.
दरम्यान, 25 वर्षांपूर्वी गजानन महाराज संस्थानचा हत्ती उधळला अशी अफवा पसरली आणि चेंगराचेंगरी झाली होती. या अफवेने झालेल्या चेंगराचेंगरीत दहा वारकऱ्यांचा मृत्यू झाला होता, तर अनेक जण जखमी झाले होते. त्यामुळे प्रत्येकानेच कोणतीही संभ्रमाची परिस्थिती निर्माण होईल, असं कृत्य न करण्याची गरज आहे.
संबंधित बातम्या :
आषाढी वारी सुरळीत पार पडू द्यावी, उदयनराजेंचं आवाहन
जेव्हा मनोहर जोशी, अजित पवार यांना विठ्ठलाच्या पूजेपासून रोखलं होतं...
मुख्यमंत्र्यांना विठ्ठलाची पूजा न करु देण्यावर मोर्चेकरी ठाम
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)