'चोरीच्या तपासात दिरंगाई, नीट तपास करा' म्हणत औरंगाबाद खंडपीठानं पोलिसांना फटकारले
परंडा शहरातील वर्धमान ज्वेलर्सच्या धाडसी चोरी प्रकरणाच्या तपासात पोलिसांनी दिरंगाई केली आहे. त्यामुळे औरंगाबाद उच्च न्यायालयाने परंडा पोलिसांना नोटीस जारी केली केली आहे.
उस्मानाबाद : पोलिसांनी चोरीचा तपास करून लवकरात लवकर आरोपीकडून मुद्देमाल हस्तगत करावा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे. पोलिसांचा तपास नीट होत नसल्याने चोरीचा तपास किती दिवसांत पोलिसांनी पूर्ण करावा तसेच कसा करावा? याचे आदेश उच्च न्यायालयाने देण्याची ही पहिलीच घटना असावी. पोलिसांच्या दिरंगाईबद्दल लोक उच्च न्यायालयात जावू लागले तर काय होईल? याची ही पहिली पायरी ठरू शकते.
घटना उस्मानाबाद जिल्ह्यातल्या परंडा शहरातील आहे. परंडा शहरातील वर्धमान ज्वेलर्सच्या धाडसी चोरी प्रकरणाच्या तपासात पोलिसांनी दिरंगाई केली आहे. त्यामुळे औरंगाबाद उच्च न्यायालयाने परंडा पोलिसांना नोटीस जारी केली केली आहे. चोरीस गेलेला माल पोलिसांनी संबंधिताकडून त्वरीत हस्तगत करावा. 21 जानेवारी रोजी तपास अधिकारी तथा पोलीस निरीक्षक एस.बी.गिड्डे यांनी अहवालासह न्यायालयात हजर रहावे, असे आदेश दिले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, परंडा शहरातील मयुर मनोजकुमार बेदमुथा यांचे वर्धमान ज्वेलर्स येथे 9 जानेवारी 2019 रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी करुन सोने, चांदी व रोख रक्कम असा एकूण 29 लाख 65 हजाराचा मुद्देमाल लंपास केला होता. याप्रकरणी मयुर बेदमुथा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून परंडा पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली होती. पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासात दिरंगाई केली. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असताना देखील अद्याप तपास झालेला नाही.
बेदमुथा यांनी उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे या प्रकरणाची सखोल चौकशी होवून चोरीस गेलेला माल परत मिळण्या बाबत याचिका दाखल केली होती. याप्रकरणी उच्च न्यायालयाने परंडा पोलीस यांना फटकारले असून या चोरी प्रकरणात दिरंगाई का करीत आहात? म्हणून नोटीस देण्यात आली आहे. चोरीस गेलेला माल त्वरीत हस्तगत करून 21 जानेवारी 2021 रोजी तपासिक अधिकारी पोलीस निरीक्षक गिड्डे यांना अहवालासह न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.