शरद पवार म्हणाले, इंदापूरकरांचा आग्रह असेल तर निर्णय घ्या, पुढचं मी बघतो, तुतारी हाती घेण्यापूर्वी हर्षवर्धन पाटलांचे 6 मोठे मुद्दे
Harshvardhan Patil Joins NCP Sharad Pawar Party: जनतेच्या भावनांचा आदर ठेवत शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करत असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी जाहीर केले.
पुणे : हर्षवर्धन पाटील यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीतला प्रवेशावर अखेर शिक्कामोर्तब झाला आहे. स्वत: हर्षवर्धन पाटील यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाणार असल्याची घोषणा केली. इंदापुरात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी जाहीर केले. निर्णय जाहीर करण्यापूर्वी त्यांनी तालुक्यात कार्यकर्त्यांशी संवाद साधला. निर्णय घेण्यापूर्वी काय काय घडले? कोणाला भेटले? असा सर्व घटनाक्रम सांगितला. तसेच जनतेचा आग्रह असेल तर तुम्ही निर्णय घ्या, मी जबाबादारी घेतो, असे शरद पवारांनी आश्वासन दिल्याचे पाटील म्हणाले. जनतेच्या भावनांचा आदर ठेवत निर्णय घेतल्याचे पाटील म्हणाले.
शरद पवारांना भेटलो- काय काय चर्चा झाली?
हर्षवर्धन पाटील म्हणाले, विधानसभेबाबत काय निर्णय घ्यायचा यासाठी सर्वांना बोलवलंय. काल सिल्व्हर ओकवर शरद पवारांशी बैठक झाली. पवारांनी काल विधानसभा निवडणूक लढवण्याचा आग्रह धरला. जनतेचा आग्रह असेल तर तुम्ही निर्णय घ्या. त्यानंतर बाकीची जबाबदारी माझी राहील. मग आपण प्रवेश करायचा की नाही? हे माझ्या इंदापूरच्या जनतेने ठरवावे. इंदापूर तालुक्यातील सर्व राजकीय निर्णय जनतेच्या मताने झाले आहेत. इंदापुरात कोणाच्या स्वार्थासठी निर्णय होत नाहीत.
देवेंद्र फडणवीसांना भेटलो काय काय चर्चा झाली?
शरद पवारांची भेट घेण्याअगोदर मी देवेंद्र फडणवीसांशी चर्चा केली. दीड दोन तास माझी सविस्तर चर्चा झाली.कार्यकर्त्यांनी माझ्यासाठी जेवढा संघर्ष केला आहे त्या कार्यकर्त्यांसाठी मी हा निर्णय घेत असल्याचं सांगितलं.
राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर काय?
जनतेच्या ज्या भावना आहेत त्यांच्या भावना जाणून योग्य तो निर्णय घेतला जाईल. आपला निर्णय झाल्यावर ज्या पक्षातले नेते पुढची भूमिका जाहीर करतील. तो अधिकार आपला नाही.
कुणावर टीका नको, सोशल मीडियावर काही लिहू नका
2014 च्या पराभवाची खदखद लोकांच्या मनात आहे. मी निवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. पक्षापेक्षा जनता श्रेष्ठ आहे. जनता सांगते त्यानुसार निर्णय घ्यावा लागतो. आपल्याला कोणाबद्दल वाईट बोलायचं नाही . आपल्याला विजय मिळवायचा आहे. या इंदापूर तालुक्याने 35 वर्ष मंत्रीपदही बघितलं आहे.
पवार कुटुंबाशी वैयक्तिक संबंध : हर्षवर्धन पाटील
पवारांसोबत व्यक्तीगत संबंध आहेत. व्यक्तिगत संबंधामध्ये कधी टोकाची भूमिका घेतली नाही. कोणावर टीका करु नका, असे आवाहन देखील हर्षवर्धन पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.
मागच्या दहा वर्षातील त्रास झाला तो दूर करायचा आहे : हर्षवर्धन पाटील
मागच्या दहा वर्ष जो त्रास झाला ते दुरुस्त करायचा असेल तर मी पदाला हपापलेला माणूस नाही. त्यांच्या पक्षात प्रवेश करणे आपला इतकाच रोल आहे. आपल्याला त्या पक्षात जायचं का? कार्यकर्त्यांकडून हो अशा घोषणा यावेळी देण्यात आली.