(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पंढरपुरातल्या देवडेत 85 वर्षांच्या कलावती आज्जींची व्हिक्ट्री, विजयानंतर म्हणाल्या...
पंढरपूर तालुक्यातील देवडे ग्रामपंचायतमध्ये 85 वर्षांच्या कलावती शिंदे या भाजप परिचारक गटाकडून विजयी झाल्या आहेत. याही वयात त्या गावात फिरून प्रचार केला आणि जोरदार विजय देखील मिळवला.
पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील देवडे ग्रामपंचायतमध्ये 85 वर्षांच्या कलावती शिंदे या भाजप परिचारक गटाकडून विजयी झाल्या आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीची नशाच काहीशी और असते म्हणतात ते खोटे नाही. याचाच प्रत्यय या ग्रामपंचायत निवडणुकीत देवडे या गावात आला. कलावती बलभीम शिंदे या 85 वर्षाच्या आज्जीबाई यंदा गावाचा विकास करण्यासाठी निवडणूक रिंगणात उतरल्या. याही वयात त्या गावात फिरून प्रचार केला आणि जोरदार विजय देखील मिळवला.
कलावती शिंदे विजयानंतर म्हणाल्या की, गावात रस्त्यांची अडचण आहे. लहान पोरांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे. त्यांना जायला यायला रस्ता चांगल नाही. पावसाळ्यात तर चिखलाने खूप त्रास होता. तसंच लाईटचा देखील प्रश्न आहे, याबाबत काम करणार असल्याचं विजयानंतर कलावती आज्जींनी सांगितलं. आजवर अनेकवेळा मी निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असायचे पण प्रत्येकवेळी माझे नाव मागे पडायचे. यंदा मात्र परिचारक गटाने मला संधी दिल्याने मी निवडणूक लढवत असून गावाची कामे मी करणार असल्याचा दावा आज्जीबाईंनी केला होता.
अकलूजमध्ये विजयदादांचा गड आला पण सिंह गेला राज्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमधील लक्षवेधक लढतींपैकी एक लढत म्हणजे अकलूज ग्रामपंचायत निवडणूक. यामध्ये विजयसिंह मोहिते पाटील गटाची सरशी झाली असून त्यांनी 17 पैकी 14 जागा जिंकल्या आहेत. असे असले तरी भाजप पॅनलचे प्रमुख उमेदवार व विजयसिंह मोहिते यांचे पुतणे संग्रामसिंह मोहिते पाटील यांचा पराभव झाला आहे. त्यामुळे भाजपची 'गड आला पण सिंह गेला' अशी अवस्था झाली आहे. माळशिरसमध्ये तालुक्यात विजयसिंह मोहिते पाटील गटाची सरशी झाली असून त्यांनी 44 पैकी 35 ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळवलं आहे. तर उर्वरित नऊ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीला आपलं वर्चस्व राखण्यात यश आलंय. माळशिरस तालुक्यातील भाम्ब येथे राष्ट्रवादी उमेदवार चिट्ठीवर तर बीजवडी मध्ये भाजप उमेदवार चिट्ठीवर विजयी झाले आहेत. या दोन्ही ठिकाणी समसमान मते मिळाल्याने चिट्ठी टाकण्यात आली होती.
गावपातळीवर पक्ष नव्हे तर पॅनल महत्वाचं ग्रामपंचायतीच्या निवडणुका म्हटलं की गावगाड्यातला मोठा उत्साह असतो. मात्र या निवडणुकांमध्ये स्थानीय लेव्हलवरचं राजकारण हे अनेकदा विकोपाला गेलेलं पाहायला मिळतं. बहुतांश गावं दोन पॅनलमध्ये विभागलेली असतात. काही गावांमध्ये तर एकाच नेत्याच्या किंवा पक्षांचे दोन पॅनल असतात. सांगायचा उद्देश हा की, ग्रामपंचायत निवडणुका या पार्टीच्या चिन्हावर लढवल्या जात नाहीत तर पॅनल निहाय लढवल्या जातात. जे उमेदवार आज अमक्या नेत्याच्या गटाचे म्हणून सांगितले जातात ते विरुद्ध पार्टीचेही असू शकतात. त्यामुळं नेत्यांनी किंवा पक्षांनी आम्हाला इतक्या जागा मिळाल्या, असं सांगितलेलं अनेकदा खरं असेलच असं नाही.
संबंधित बातम्या Gram Panchayat Election Results 2021 | हिवरे बाजारमध्ये पोपटराव पवारांचं वर्चस्व, सातही जागांवर विजय
औरंगाबादमधील पाटोद्यात भास्कर पेरे-पाटलांचं वर्चस्व संपुष्टात; 25 वर्षांनंतर गावात सत्तांतर
Gram Panchayat Election Result : विजयानंतर गुलाल उधळणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांचा चोप