Gram Panchayat Election Result : विजयानंतर गुलाल उधळणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांचा चोप
Gram Panchayat Election Result : सोलापूर जिल्ह्यातील 587 ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा निकाल देखील लागत आहे. निकालानंतर नेहमीप्रमाणे जल्लोष होणं अपेक्षित आहे.सोलापुरात विजयानंतर गुलाल उधळणाऱ्या आणि गोंधळ करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी चांगलाच चोप दिलाय.
सोलापूर : राज्यातील 34 जिल्ह्यांतील सुमारे 12 हजार 711 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निकाल आज जाहीर होत आहे. यात सोलापूर जिल्ह्यातील 587 ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा निकाल देखील लागत आहे. निकालानंतर नेहमीप्रमाणे जल्लोष होणं अपेक्षित आहे. मात्र यंदा कोरोनामुळं काही ठिकाणी सेलिब्रेशनवर बंधनं टाकण्यात आली आहेत. सोलापुरात विजयानंतर गुलाल उधळणाऱ्या आणि गोंधळ करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी चांगलाच चोप दिलाय.
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील मतमोजणी केंद्रावर अतिउत्साही कार्यकर्त्यांना पोलिसांनी चोप दिला. वारंवार ध्वनिक्षेपकावरून पोलिसांनी सूचना देऊनही मतमोजणी केंद्राच्या आवारात गुलाल उधळल्यानंतर पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना चांगलाच चोप दिला. गुलाल उधळणे, विजयी मिरवणूक काढणे इत्यादी वर जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी घातली आहे. सध्या हाती आलेल्या वृत्तानुसार बार्शी तालुक्यात आमदार राजेंद्र राऊत यांच्या गटाने 10 तर माजी आमदार दिलीप सोपल यांच्या गटाने 5 ग्रामपंचायतीवर विजय मिळवला आहे.
मतमोजणीच्या ठिकाणी या गोष्टींना मनाई
सोलापुरात आदेशानुसार मतमोजणीच्या संपूर्ण परिसरात शासकीय अधिकारी आणि कर्मचारी वगळता इतर कोणत्याही व्यक्तींना मोबाईल वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. सोबत तंबाखूजन्य पदार्थ, आगपेटी, लायटर, ज्वालाग्राही पदार्थ अथवा कोणतेही घातक पदार्थ किंवा वस्तू मतमोजणीच्या ठिकाणी घेऊन जाण्यास मनाई करण्यात आली आहे. मतमोजणी केंद्राच्या परिसरात निवडणूक संबंधित अधिकारी, कर्मचारी, उमेदवार, उमेदवारांचे दोन अधिकृत प्रतिनिधी आणि पासधारक व्यक्ती यांच्या शिवाय कोणालाही प्रवेश करण्यास परवानगी नसणार आहे.
निकालानंतर विजयी उमेदवार आणि त्यांचे समर्थक मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा करत असतात. गुलाल उधळत विजयी मिरवणुका काढल्या जातात. मात्र या मधून पराभूत उमेदवार आणि विजयी उमेदवार तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी या सगळ्या विजयी जल्लोषावर देखील निर्बंध लावले आहेत. ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर विजयी मिरवणूक किंवा रॅली काढणे, गुलाल उधळणे, घोषणे देणे, फटाके फोडणे, परवानगी शिवाय बॅनर किंवा फ्लेक्स लावणेस बंदी करण्यात येत आहे. असे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले होते. सोबतच 18 जानेवारीच्या रात्री 10 पासून 19 जानेवारीच्या सकाळी 6 पर्यंत ग्रामीण हद्दीतील सर्व ढाबे. हॉटेल्स, पानटपऱ्या इत्यादी बंद ठेवण्याचे आदेश देखील जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.