(Source: ECI/ABP News/ABP Majha)
औरंगाबादमधील पाटोद्यात भास्कर पेरे-पाटलांचं वर्चस्व संपुष्टात; 25 वर्षांनंतर गावात सत्तांतर
Maharashtra Gram Panchayat Election Results 2021 : औरंगाबादमधील पाटोद्यात आदर्श गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाटोद्यात भास्कर पेरे-पाटलांचं वर्चस्व संपुष्टात आलं आहे. जवळपास 25 वर्षांनंतर गावात सत्तांतर झालं आहे.
Maharashtra Gram Panchayat Election Results 2021 : जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांची आज मतमोजणी पार पडत आहे. औरंगाबादच्या पाटोद्यात भास्कर पेरे-पाटलांचं वर्चस्व संपुष्टात आलं आहे. तब्बल 25 वर्षांनी आदर्श गाव असलेल्या पाटोद्यात सत्तांतर झाल्याचं पाहायला मिळत आहे. पेरे पाटलांनी या निवडणुकीतून माघार घेतली होती. त्यांच्या कन्या अनुराधा पेरे- पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या असून त्यांचा पराभव झाला आहे.
महाराष्ट्रभरात गावाला ओळख देणारे विकास पुरुष भास्कर पेरे-पाटील यांचं वर्चस्व संपुष्टात आलं आहे. भास्कर पेरे-पाटील यांचा तब्बल पंचवीस वर्ष एक हाती गावावर वर्चस्व होतं. मात्र यावर्षी त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली होती. त्यामुळे अकरा सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये निवडणुकीपूर्वीच आठ सदस्य बिनविरोध निवडून आले होते. तर तीन जागांसाठी निवडणूक घेण्यात आली, यात भास्कर पेरे पाटील यांची मुलगी अनुराधा पेरे उभ्या होत्या. त्यांचा या निवडणुकीमध्ये पराभव झाला आहे.
पाहा व्हिडीओ : मी रिटायर झालोय! मीच का सरपंच राहायचं? बाकीच्यांनाही संधी मिळावी - भास्कर पेरे पाटील
अनुराधा पेरे-पाटील यांच्याविरोधात उभे असलेल्या दुर्गेश खोकड यांना 204 मतं मिळाली, तर अनुराधा पेरे पाटील यांना 184 मतं मिळाली. पंचवीस वर्ष सत्तेत असलेल्या पेरे-पाटील यांनी पाटोदा गावाचं रूपडं बदललं, गावाला आदर्श गाव म्हणून महाराष्ट्रभर ओळख दिली. त्यात गावात त्यांच्या मुलीचा मात्र पराभव झाला आहे. या पराभवामुळे भास्कर पेरे-पाटील यांना देखील गावात पराभव होण्याची कुणकुण लागली होती का? त्यामुळे त्यांनी माघार घेतली अशी चर्चा देखील सुरू झाली आहे.
दरम्यान, गेल्या पंचवीस वर्षांपासून औरंगाबादमधील पाटोदा गावाला राज्यभर ओळख देणारे विकास पुरुष भास्कर पेरे यांनी गावच्या राजकारणातून आता निवृत्ती घेतलीय. पाटोद्यात निवडणूक व्हायची पण पेरे निर्विवाद बाजी मारायचे. मात्र यावर्षी पेरे पाटलांनी ग्रामपंचायत निवडणुकीत आपला पॅनलची उभा केला नाही. आता पुढच्या पिढीला संधी द्यायची म्हणून आपण बाजूला झाल्याचे पेरे पाटील यांनी सांगितलं होतं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Gram Panchayat Election Results 2021 | हिवरे बाजारमध्ये पोपटराव पवारांचं वर्चस्व, सातही जागांवर विजय
पाहा महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांच्या मतमोजणीचे कल फक्त एका क्लिकवर 'एबीपी माझा'वर, Maharashtra Gram Panchayat Election Results 2021 Live Updates या लाईव्ह ब्लॉगमध्ये, तसेच इतर अपडेट्ससाठी 'एबीपी माझा'च्या फेसबुक पेजला आणि ट्विटर हँडलला भेट द्या.