(Source: ECI/ABP News/ABP Majha)
भविष्यात राज्याचं विरोधी पक्षनेते पद वंचित बहुजन आघाडीकडे असेल : मुख्यमंत्री
राष्ट्रवादीतून सुरु असलेल्या आऊटगोईंगवर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष फक्त महाराष्ट्रापुरता होता. त्यातही पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीचं वर्चस्व होतं. मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेस केवळ काही जिल्ह्यांपुरती मर्यादित राहिली आहे.
नांदेड : मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा नांदेडमध्ये पोहोचली आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पत्रकरांशी संवाद साधला. शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष आता केवळ काही जिल्ह्यांपुरता मर्यादीत राहिला आहे, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. तसेच भविष्यात वंचित बहुजन आघाडी विरोधी पक्षात असेल, असं भाकीतही मुख्यमंत्र्यांनी वर्तवलं.
वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीत आपली ताकद दाखवून दिली आहे. विधानसभा निवडणुकीतही आघाडीसोबत युती न करता वंचित स्वबळावर निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहे. सुरुवातीपासून वंचित बहुजन आघाडी भाजपची बी टीम असल्याचा आरोप सातत्याने होत आहे. वंचितच्या भवितव्याविषयी बोलताना मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की, "सध्याची परिस्थिती पाहिली तर ही बी टीम आता ए टीम बनली आहे. आगामी काळात राज्याचं विरोधी पक्षनेते पद हे वंचित आघाडीकडे असेल."
नारायण राणे भाजपचे खासदार
नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशावरही मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली. नारायण राणे हे भाजपचे खासदार आहेत. फक्त त्यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे भाजपमध्ये विलीनीकरण कधी करायचे हा प्रश्न आहे. शिवसेना हा आमचा मित्रपक्ष आहे, त्यामुळे त्यांच्याशी चर्चा करून नारायण राणेंच्या पक्षाचे विलीनीकरण कधी करायचे हा निर्णय घेण्यात येईल, असं मुख्यमंत्री म्हणाले.
राष्ट्रवादी पक्ष काही जिल्ह्यापुरता मर्यादीत
राष्ट्रवादीतून सुरु असलेल्या आऊटगोईंगवर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष फक्त महाराष्ट्रापुरता होता. त्यातही पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीचं वर्चस्व होतं. मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेस केवळ काही जिल्ह्यांपुरती मर्यादित राहिली आहे.
आदित्य ठाकरे वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत, अशी चर्चा सध्या जोर धरु लागली आहे. त्यात शिवसेना नेते, आमदार अनिल परब यांनी राज्याचा आगामी मुख्यमंत्री वरळी मतदारसंघातून असेल असं वक्तव्य केलं. त्यावर विचारलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी प्रतिप्रश्न उपस्थित करत परब हे शिवसेनेचे अधिकृत प्रवक्ते आहेत का? असा सवाल केला.