(Source: ECI/ABP News/ABP Majha)
विदर्भात पहिल्यांदाच पोलीस दलातील वाहनांचे स्टेअरिंग महिलांच्या हाती; 11 महिलांचं ट्रेनिंग पूर्ण
इतिहासात पहिल्यांदाच पोलीस दलातील वाहनांचं स्टेअरिंग महिलांच्या हाती देण्यात येणार आहे. यवतमाळ जिल्हा पोलीस दलातील 11 महिला आता वाहन चालक म्हणून जिल्हा पोलीस दलातील मोटार परिवहन विभागात लवकरच रुजू होणार आहेत.
यवतमाळ : पोलीस दलातील वाहनांचे स्टेयरिंग आता महिलांच्या हातात येणार आहे. यवतमाळ जिल्हा पोलीस दलातील 11 महिला आता वाहन चालक म्हणून जिल्हा पोलीस दलातील मोटार परिवहन विभागात लवकरच रुजू होणार आहेत. या 11 महिलांच ट्रेनिंग आता पूर्ण होत असून या महिला पोलीस दलाची महत्वपूर्ण जबाबदारी लवकरच सांभाळताना दिसणार आहे. आतापर्यंत या विभागात पुरूष मंडळीच वाहन चालक म्हणून असायची. आता या महिला चालक झाल्याने त्यांच्या कुटुंबातील सदस्य सुद्धा आनंदी आहेत.
पहिल्यांदा स्टेरिंग सांभाळताना थोडी चिंता वाटली होती. आपण वाहन चालवू शकणार का? असेही वाटले मात्र आता ट्रेनिंगनंतर भीती, चिंता दूर गेल्या आहेत. आता अवजड आणि लाईट वेट असलेले वाहन या महिला सहज रित्या चालवित आहेत. आता स्वतःचा अभिमान वाटतो असेही वाहन चालक ट्रेनिंग करणाऱ्या महिला पोलिसांच म्हणणं आहे.
वेगवेगळ्या भागातून परिस्थितीतून या महिला पोलीस दलात दाखल झाल्या असून शेतकरी कुटुंबातील या महिला आणि मुली शिपाई म्हणून जिल्हा पोलीस दलात रुजू झाल्या आहेत. दरम्यान पोलीस दलात महिलांसाठी 33 टक्के आरक्षण मिळाल्यानंतर विभागात अनेक महिला दाखल झाल्या आहेत. प्रत्येक भरती प्रक्रियेमध्ये पोलीस दलात नोकरी मिळावी म्हणून हजारो महिला यात सहभागी होतात.
पोलीस दलातील पुरुषांप्रमाणेच महिलांना देखील कर्तव्य बाजावावे लागते, असे असले तरी जिल्हा पोलीस दलात एकही महिला पोलीस वाहनांचे चालक म्हणून कार्यरत नाही. दरम्यान पोलीस विभागात कार्यरत आणि इच्छुक महिलांनी वाहन चालक होण्याची संधी विभागातील महिलांना उपलब्ध झाली. त्याद्वारे 11 महिला वाहन चालक पदासाठी विविध पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या महिला पोलीस शिपाई यांनी आम्हाला वाहन चालक व्हायचे आहे आणि काही तरी वेगळे करायचे आहे, असं चॅलेंज त्यांनी स्वीकारले. यासाठी स्वखुशीने जिल्हा पोलीस मोटार परिवहन विभागात अर्ज सादर केला आणि या सर्व महिलांचे पुणे जिल्ह्यात चालक प्रशिक्षण केंद्र येथे 45 दिवसांचे जानेवारी दरम्यान ट्रेनिंग पूर्ण झाले. त्यानंतर कोरोना संकटामुळे त्यासर्वांना बंदोबस्तासाठी पाठविण्यात आले होते. आता मात्र या सर्व महिला मोटार परिवहन विभागात त्या रुजू झाल्या असून त्यांनी सराव सुरु केला आहे.
लाईट हेवी वेट वाहनं या सर्वजणी चालवतात. आता वाहन चालवत असल्याने आई वडील नातलग यांना अभिमान वाटतो, असे या ट्रेनिंग करणाऱ्या महिला पोलीस शिपाई आणि वाहन चालक सांगतात. आता त्यांचे येथील ट्रेनिंग पूर्ण होत असून त्या लवकरच पोलीस दलातील वाहन चालक पदाची जबाबदारी सांभाळणार आहेत, असे मोटार परिवहन अधिकारी यांनी सांगितले आहे. 'सद्रक्षणाय खलनिग्रहणाय' या ब्रीद वाक्याप्रमाणे या सर्व महिला चालक म्हणून पोलीस दलाचा अभिमान वाढविण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :
कौतुकास्पद...! उमरग्यात युवकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून उभारलं सुसज्ज कोविड उपचार केंद्र
सांगलीत भाजपच्या खासदार-आमदारामध्येच जुंपली; गोपीचंद पडळकरांचा संजय पाटलांवर निशाणा
मराठवाड्यातील खऱ्या कोविड योद्ध्यांना दोन महिन्यांपासून वेतनच नाही!