एक्स्प्लोर
कौतुकास्पद...! उमरग्यात युवकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून उभारलं सुसज्ज कोविड उपचार केंद्र
उमरग्याच्या काही मुस्लिम युवकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सुसज्ज कोविड उपचार केंद्र उभे केले आहे. मुंबई हैदराबाद महामार्गावर शहरानजीकच्या ईदगाह येथील फंक्शन हॉलमध्ये हे एक उत्तम सुविधायुक्त कोविड केंद्र उभारले गेले आहे.
![कौतुकास्पद...! उमरग्यात युवकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून उभारलं सुसज्ज कोविड उपचार केंद्र Muslim youth set up a well-equipped covid care treatment center in Umarga कौतुकास्पद...! उमरग्यात युवकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून उभारलं सुसज्ज कोविड उपचार केंद्र](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/08/12153454/WhatsApp-Image-2020-08-12-at-9.59.09-AM.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
उस्मानाबाद : 'जे राव न करि, ते रंक करि' ह्या म्हणीप्रमाणे जनतेने मनात आनलं तर काहीही होऊ शकते. उस्मानाबाद जिल्ह्यात लोकसहभागातून एक कोटीची कोविड तपासणी लॅब उभा राहिली आहे. तसाच प्रयत्न उमरगा शहरात झाला आहे. उमरग्याच्या काही मुस्लिम युवकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सुसज्ज कोविड उपचार केंद्र उभे केले आहे. मुंबई हैदराबाद महामार्गावरच्या उमरगा शहरानजीकच्या ईदगाह येथील फंक्शन हॉलमध्ये हे एक उत्तम सुविधायुक्त कोविड केंद्र उभारले गेले आहे. ह्यात एका वेळेला 35 रूग्णांवर उपचार होवू शकतात.
शहरात कोरोनाच्या रुग्णाची संख्या वाढत आहे. प्रशासनाने येथील गुंजोटी रस्त्यावरील वसतीगृह, मुरुम येथील वस्तीगृह ताब्यात घेतले. सुरुवातीला या दोन ठिकाणी क्वारंटाईन केंद्र म्हणून रूग्णांना ठेवले गेले. नंतर मात्र रूग्ण वाढले म्हणून पॉझिटिव्ह रुग्णास येथे ठेवले जात आहे. पण इथे सुविधांचा अभाव, जेवणाचा दर्जा याबद्दल रुग्णांना त्रास होत होता. हा त्रास रुग्ण सहन करत होते. रुग्णाच्या जेवण, पाणी ,चहा, नाष्टा ह्याच्या दर्जाकडे लक्ष दिले जात नाही, याचे अनुभव काही रुग्णांनी, क्वारंटाईन केलेल्या कोरोना संशयितांनी घेतला. अनेकांनी आपले अनुभव सोशल मीडियावर कथन केले.
यानंतर शहरातल्या युवकांनी शासकीय मदतीविना चांगले सुविधायुक्त केंद्र सुरू करण्याबाबत निर्णय घेतला. शहरानजीकच्या, गुंजोटी रस्त्यावरील ईदगाह येथील मोठा हॉल आहे. इथे चांगले कोविड केंद्र सुरू करण्याचे निश्चित झाले. त्यानंतर सोशल मीडियावर चर्चा झाली. 35 बेडचे केंद्र सुरू करण्याचे ठरले. सोशल मीडियातून ' उमरगंस' व 'उमरगा डिबेट' या दोन गृपच्या माध्यमातून समाजाला आवाहन करण्यात आले. चार दिवसात अडीच लाख रुपये जमले. लागलीच कामाला सुरुवात झाली. हॉलचे रंगकाम झाले. नवीन पंखे बसविण्यात आले. तीन नवीन बाथरुम त्वरित बांधण्यात आले.
आरोग्य विभागाच्या डॉक्टर, कर्मचाऱ्यांसाठी वेगळी खोली, स्वच्छता गृह तयार करण्यात झाली. अंधार असू नये म्हणून पाच मोठे फोकस लावण्यात आले. रुग्णास मोबाईल चार्जिंग करता 15 पॉइंटची व्यवस्था करण्यात आली आहे. याठिकाणी किमान 35 रुग्ण राहतील अशी सुसज्ज व्यवस्था करण्यात आली आहे. याठिकाणी रुग्णास सकाळी चहा, काढा, अंडी, नाष्टा देण्यात येणार आहे. दुपारचे जेवण व संध्याकाळी जेवण असा दिनक्रम असणार आहे.
या सामाजिक कामासाठी बाबा जाफरी, जाहेद मुल्ला, कलीम पठाण, पत्रकार नारायण गोस्वामी, खाजा मुजावर, अय्युब मौलाना हाफिज राशिद, मनीष सोनी ,अस्लम शेख या तरुणांनी हे शिवधनुष्य पेलले आहे. कोविड केंद्र सुरू झाल्यानंतर ह्या ठिकाणी काही कार्यकर्ते स्वयंसेवक म्हणून काम करणार आहेत.
उमरगा शहरात गेल्या दीड महिन्यापासून कोरोना रुग्णाची संख्या वाढत आहे. शहरात बाधितांची संख्या 400 च्या पुढे गेली आहे. 15 जणांचा मृत्यू झाला आहे. येथील सरकारी कोविड हॉस्पिटलमध्ये 100 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. रुग्ण वाढत असल्याने काही रुग्ण तुळजापूरला तर काही रुग्णास उस्मानाबाद येथे पाठवले जात होते. काही रुग्ण आपापल्या क्षमतेनुसार सोलापूर व लातूर येथे खाजगी रुग्णालयात जात होते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
राजकारण
पुणे
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)