(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सांगलीत कार विहिरीत कोसळून 5 जणांचा मृत्यू, चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने अपघात
सांगलीमध्ये कार अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी थेट विहिरीत जाऊन पडली, यामध्ये पाच जणांचा बुडून मृत्यू झाला आहे.
सांगली : वॅगनार कारला अपघात होऊन पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना आटपाडी तालुक्यातील झरे-पारेकरवाडी रोडवर घडली आहे. वॅगनार गाडीवरील चालकाचा ताबा सुटल्याने गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत जाऊन पडली. त्यामुळे कारमधील पाच जणांचा गाडीतच बुडून मृत्यू झाला आहे. रविवारी रात्री10 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सातारा जिल्ह्यातील चितळी येथील सहा जण नातेवाईकांच्या अंत्यविधीच्या कार्यक्रमाला निघाले होते. पारेकरवाडी येथून सातारा जिल्ह्यातील चितळी येथे गाडीने जात असताना गाडीचं स्टेअरिंग लॉक झालं. त्यामुळे चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी थेट रस्त्यालगतच्या विहिरीमध्ये जाऊन पडली. विहीर पाण्याचे भरलेली असल्याने गाडीत असलेल्यांना बाहेर पडणे शक्य झालं नाही आणि त्यात गाडीतील पाच जणांचा मृत्यू झाला. तर हरिबा वाघमोरे हे गाडीची काच फोडून बाहेर आल्याने बचावले आहेत.
अपघातातील मृतांची नावे
घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्याआधी झरे पारेकरवाडी व झरे परिसरातील लोकांनी मदतीसाठी धाव घेतली. त्यानंतर जेसीबीच्या साहाय्याने गाडी बाहेर काढण्यात आली. मात्र या अपघातात मच्छिंद्र पाटील (वय 60 वर्ष), कुंडलीक बरकडे (वय 60 वर्ष), गुंडा डोंबाळे (वय 35 वर्ष), संगीता पाटील (वय 40 वर्ष), शोभा पाटील (वय 38 वर्ष) यांचा मृत्यू झाला आहे.
संबंधित बातम्या