(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेवरुन मोठा दणका, प्रशासन गंभीर; जास्त पैसे उकळणाऱ्या 2 नेट कॅफेविरुद्ध सोलापुरात गुन्हा
Solapur News : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या कामासाठी जास्त पैसे घेणाऱ्या दोन नेट कॅफेवर सोलापुरात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात लाभार्थी महिलांकडून ज्यादाचे पैसे घेतल्याचा प्रकार उघडकीस आलाय.
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana : राज्यातील महिलांसाठी महत्त्वकांशी ठरणाऱ्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) नोंदणीला 1 जुलैपासून सुरुवात झाली आहे. दरम्यान, या योजनेसाठी लागणाऱ्या कागदपत्र आणि नोंदणी प्रक्रियेसाठी ग्रामीण भागासह अनेक शहरात महिलांची मोठी झुंबड उडाल्याचे बघायला मिळाले. दरम्यान अनेक ठिकाणी तलाठी आणि संबंधित शासकिय अधिकार्यांकडून लाभार्थी महिलांची आर्थिक लूट केल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत.
या प्रकरणाची दखल घेऊन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)यांनी सर्व जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांसोबत संवाद साधत याबाबत कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. असे असताना या योजनेच्या लाभार्थी महिलेकडून पैसे घेणाऱ्या दोन नेट कॅफे चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जास्त पैसे उकळणाऱ्या 2 नेट कॅफेविरुद्ध गुन्हा दाखल
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या कामासाठी जास्त पैसे घेणाऱ्या दोन नेट कॅफेवर सोलापुरात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात लाभार्थी महिलांकडून योजनेतील फी ची रक्कम न आकारता ज्यादाचे 100 ते 200 रुपये घेतल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणाची दखल घेत सोलापुरातील सदर बाजार पोलीस ठाण्यात प्रगती नेट कॅफे आणि योगेश्वर नेट कॅफे चालकांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आलाय. सोलापूर उत्तर तहसील कार्यालयातील मंडल अधिकारी सारिका वाव्हळ यांनी देलेल्या तक्रारीवरुन हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. संबंधित दोन्हीही नेट कॅफे अधिकृत महा-ई-सेवा केंद्र नसतानाही लाभार्थी महिलांची आर्थिक लूट करत असल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम 318 (2), 318(4), 3(5) प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
घरबसल्या मोबाईलवर 'असा' भरा अर्ज
- गुगलच्या प्ले स्टोअरवरून 'नारीशक्ती दूत' ॲप डाऊनलोड करा.
- 'नारीशक्ती दूत' ॲप ओपन करा.
- तुमचा मोबाईल नंबर, ओटीपी आणि टर्म्स अँड कंडिशनवर क्लिक करून लॉगिन करा.
- तुमचे पूर्ण नाव, ईमेल आयडी, जिल्हा, तालुका आणि नारीशक्तीचा प्रकार म्हणजे सर्वसामान्य महिला, बचत गट अध्यक्ष, गृहिणी, ग्रामसेवक या गोष्टी भरून प्रोफाईल अपडेट करा.
- नारीशक्ती दूत या पर्यायावर क्लिक करून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हा पर्याय निवडा.
- अॅप्लीकेशनला लोकेशनची परमिशन द्या.
- तुमच्यासमोर लाडकी बहीण योजनेचा फॉर्म येईल.
- आधार कार्डवरील संपूर्ण नाव, जन्मतारीख, पतीचे किंवा वडिलांचे नाव, तुमचा गाव, तालुका, जिल्हा, पिन कोड, आधार कार्ड क्रमांक आणि तुम्ही इतर शासनाच्या योजनेचा लाभ घेत असाल तर त्याची सविस्तर माहिती भरा.
- तुम्ही शासनाच्या इतर योजनेचा लाभ घेत नसाल तर नाही या पर्यायावर क्लिक करा.
- वैवाहिक स्थिती काय आहे त्याबाबत माहिती टाका.
- लग्नाआधीचे संपूर्ण नाव नमूद करा.
- तुमचा जन्म परप्रांतात झाला असेल हो निवडा. आणि जर महाराष्ट्रात झाला असेल तर नाही या पर्यायावर क्लिक करा.
- आता बँकेचा तपशील तुम्हाला भरायचा आहे. त्यात अकाउंट नंबर, बँकेचे नाव, आयएफसी क्रमांक, आधार कार्ड बँक खात्याला लिंक आहे की नाही याची सविस्तर माहिती भरा.
- त्यांनतर तुम्हाला काही कागदपत्रे अपलोड करावे लागणार आहेत.
- त्यात आधार कार्ड, अधिवास प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला, उत्पन्न प्रमाणपत्र किंवा पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड, अर्जदाराच्या हमीपत्र, बँक पासबुक, आणि महिलेचा जन्म जर पर प्रांतामध्ये झाला असेल तर त्याचा दाखला हे सर्व कागदपत्रे तुम्हाला अपलोड करायची आहे. हमी पत्राचा अर्ज तुम्हाला या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये एक लिंक दिली जाईल. त्यावर क्लिक करून तुम्ही हमीपत्र डाऊनलोड करू शकता. त्याची प्रिंट काढून तुम्हाला ते हमीपत्र फॉर्म भरायचे आहे.
- सर्व कागदपत्रे अपलोड केल्यानंतर तुम्हाला खाली अर्जदाराच्या फोटोचा ऑप्शन आला असेल.
- या ठिकाणी कोणताही फोटो अपलोड करायचा नाही. तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या कॅमेऱ्याने अर्जदार महिलेचा लाईव्ह फोटो काढून अपलोड करायचा आहे.
- फोटो काढून अपलोड झाल्यावर तुम्हाला खाली "Accept हमीपत्र डिस्क्लेमर" यावर क्लिक करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला या योजनेसाठी अटी आणि शर्ती काय आहे याची माहिती आली असेल. आता तुम्हाला ते एक्सेप्ट करायचे आहे.
- त्यानंतर तुम्ही अपलोड केलेली कागदपत्रे पुन्हा एकदा चेक करून घ्या. त्यानंतर खाली तुम्हाला सबमिट फॉर्म या बटन वरती क्लिक करायचं आहे. आता तुम्हाला एक ओटीपी येईल तो ओटीपी टाका.
- या पद्धतीने तुम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फॉर्म घरबसल्या मोबाईलवर भरू शकता.
आणखी वाचा