बीडमध्ये सावकाराच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या
आत्महत्येपूर्वी गंगाराम यांच्या खिशात लिहीलेली चिठ्ठी आढळून आली. त्यात त्यांनी पैसे परत करूनही सावकाराने अधिक रकमेची मागणी करत केलेल्या छळाबद्दल सविस्तर लिहिले असल्याचे आता पुढे आले आहे.
![बीडमध्ये सावकाराच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या farmer committed suicide after harassed by moneylender in beed बीडमध्ये सावकाराच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/06/19230729/suicide.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
बीड : खाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्यांना आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बीडमध्ये घडली आहे. दोन वर्षापूर्वी घेतलेल्या दोन हजार रुपयांचे सावकाराने व्याजासकट 28 हजार केले. त्यानंतर या रकमेचा तगादा लावत त्या शेतकऱ्याला कपडे फाटेपर्यंत बेदम मारहाण केली. सावकाराच्या सततच्या तगाद्याला, मारहाणीला आणि मानहानीला कंटाळलेल्या शेतकऱ्याने अखेर टोकाचं पाऊल उचललं आणि गळफास लावून स्वत:चं जीवन संपवलं. बीड तालुक्यातील राजुरीत ही घटना घडली आहे.
गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव गंगाराम विश्वनाथ गावडे आहे. एकीकडं घरांमध्ये सततची आर्थिक अडचण, दुसरीकडं शेतीवर घर चालत नव्हतं. म्हणून गावडे हे ऊसतोडीला जायचे. यातच पैशाची गरज पडली म्हणून त्यांनी दोन वर्षापूर्वी गावातील खाजगी सावकार लाला उर्फ युवराज पांडुरंग बहिर याच्याकडून दोन हजार रूपये दहा टक्के प्रतिमहिना व्याजाने घेतले होते. सदर रकमेची परतफेड करूनही सावकारने दोन हजारांची रक्कम दोन वर्षातच व्याजासकट 28 हजार केली आणि त्यासाठी गंगारामच्या मागे तगादा सुरू केला. मारहाणीच्या धमक्या मिळू लागल्याने गंगाराम तणावाखाली होते.
सावकार युवराज बहिरने गंगरामच्या घरी जाऊन धमक्या दिल्या. त्याच दिवशी दुपारी अडीच वाजता सावकाराने गंगारामला स्वत:च्या शेतात बोलावून घेतले. गंगारामची दुचाकी ठेवून घेत त्याने गंगारामला मारहाण करून कपडे फाडले. पुतण्याने दिलेले कपडे घालून गंगारामने कसेबसे घर गाठले. त्यानंतर ते प्रचंड तणावात होते. पत्नीने समजूत घालूनही काही फरक पडला नाही.
अखेर गंगाराम यांनी घरापासून 50 मीटर अंतरावर असलेल्या चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी गंगाराम यांच्या खिशात लिहीलेली चिठ्ठी आढळून आली. त्यात त्यांनी पैसे परत करूनही सावकाराने अधिक रकमेची मागणी करत केलेल्या छळाबद्दल सविस्तर लिहिले असल्याचे आता पुढे आले आहे. गंगाराम यांच्या पत्नी आशाबाई यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सावकार युवराज बहिर याच्यावर बीड ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेनंतर आरोपी सावकार फरार झाला असून बीड ग्रामीण पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)