Fake Currency: परभणीत 'फर्जी'चा शाहिद कपूर... चक्क प्रिंटरवर छापल्या 200 च्या बनावट नोटा
Parbhani News: बनावट नोटांच्या छपाईप्रकरणी परभणीच्या मानवतमध्ये 19 वर्षीय तरुणाला अटक केली आहे. त्याच्याकडून 30 हजारांचं साहित्य जप्त करण्यात आलं आहे.
परभणी: शाहिद कपूरची 'फर्जी' ही बनावट नोटा तयार करण्यावर आधारित वेब सीरिज प्रचंड चर्चेत आहे. या वेब सीरिजप्रमाणेच चक्के प्रिंटरवर बनावट नोटा छापणाऱ्या परभणीतील एका 19 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. परभणी पोलिसांनी ही कारवाई केली असून मानवत या ठिकाणी असलेल्या 200 च्या बनावट नोटा, प्रिंटर, कागद आणि इतर साहित्यही ताब्यात घेतलं आहे. विशाल खरात असं अटक करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे.
अवैध धंद्याच्या अनुषंगाने परभणीच्या मानवतमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक पेट्रोलिंग करत असताना त्यांना याची गुप्त बातमी मिळाली. मानवत शहरामध्ये एक जण बनावट नोटा तयार करत असल्याच्या पक्क्या खबरीनंतर पोलिसांनी या ठिकाणी दोन पंचांना समक्ष घेऊन छापा टाकला. मानवतमधील खंडोबा रोड या ठिकाणी एका घरावर हा छापा टाकला.
या घरांमध्ये 19 वर्षाचा एक तरुण विशाल संतोष खरात याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्याची विचारपूस केली असता त्याने प्रिंटरवर बनावट नोटा छापल्यची कबुली दिली. पोलिसांनी 200 च्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. त्यामध्ये एकाट क्रमांकाच्या 27 नोटा, दुसऱ्या क्रमांकाच्या दोन नोटा आणि तिसऱ्या क्रमांकाची एक नोट अशा एकूण 30,200 च्या नोटा पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
पोलिसांनी या ठिकाणचे पिक्समा कंपनीचे जी 2010 प्रिंटर, रिफील इंक, लिक्विड करता वापरलेली पिवळ्या रंगाची प्लास्टिक बॉटल, हिरवी, सिल्वर, पोपटी आणि गुलाबी रंगाची चिकटपट्टी, नटराज कंपनीचे पांढरे पेपर, 115 पांढऱ्या रंगाचे पेपर ज्यावर दोन्ही बाजूने 200 च्या छापलेल्या बनावट नोटा, विविध कंपन्यांचे पांढरे पेपर असा असा एकूण 30,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस नाईक दिलावर खान रशीद खान पठाण यांच्या फिर्यादीवरून विशाल खरात या तरुणाच्या विरोधात मानवत पोलीस ठाण्यात कलम 420, 489 (अ), 489 (क), 489 (ड) भादवी प्रमाणे गुन्हा दाखल केला.
जळगावात यूट्यूबवर पाहून नोटांची छपाई
काही दिवसांपूर्वी बनावट नोटांच्या छपाईची घटना समोर आली होती. जळगाव शहरापासून जवळ असलेल्या कुसुंबा गावा जवळील देविदास आढाव हा 30 वर्षीय तरुण युट्यूबवरून पाहून घरातल्या घरात भारतीय चलनाच्या बनावट नोटा बनवत होता. याबाबतची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारावर नोटा छापणाऱ्या संशयिताला पोलिसांनी एमआयडीसीतील व्ही सेक्टर मध्ये छापा टाकून अटक केली होती. कुसुंबा तालुक्यातील देविदास पुंडलिक आढाव (वय 30) याच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
ही बातमी वाचा: