Ashadhi Wari | आषाढी वारीदरम्यान पंढरपुरात आठ दिवस संचारबंदी!
आषाढी वारीसाठी (Ashadhi Wari) 17 ते 25 जुलै या काळात चंद्रभागा परिसरात कलम 144 लागू करण्यात आला आहे. त्यामुळे परवानगी नसलेल्या एकाही भाविकाला या काळात सोलापूर जिल्ह्यात प्रवेश मिळणार नाही.

पंढरपूर : आषाढी वारीला (Ashadhi Wari) यंदाही भक्तांचा हिरमोड होणार आहे. कारण 17 ते 25 जुलै या काळात म्हणजेच आषाढी वारीसाठी पंढरपुरात (Pandharpur) संचारबंदी लागू करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिले आहेत. या काळात चंद्रभागा परिसरात कलम 144 लागू करण्यात येईल त्याचप्रमाणे सोलापूर जिल्ह्यातही या काळात त्रिस्तरीय नाकाबंदी लावण्यात येणार आहे. त्यामुळे परवानगी नसलेल्या एकाही भाविकाला या काळात सोलापूर जिल्ह्यात प्रवेश मिळणार नाही. त्यामुळे यंदाही बहुतेक भाविकांना आषाढी एकादशीला विठ्ठलाचं थेट दर्शन घेता येणार नाही.
यावर्षीही कोरोनामुळे पंढरपूरची पायी वारी होणार नसल्याचं राज्य सरकारने स्पष्ट केलं आहे. त्याऐवजी मानाच्या पालख्यांना बसने वाखरीपर्यंत पादुका नेण्याचं नियोजन सरकारनं केलं आहे. वाखरीवरून प्रतिकात्मक स्वरूपात पालख्या पायी पंढरपूरला जाणार आहेत. केवळ वाखरी ते पंढरपूर दीड किलोमीटर दिंडी पायी येणार असून एकादशी दिवशी शहरातील 195 महाराज मंडळींना देवाचे मुखदर्शन मिळणार आहे. यंदाच्या आषाढी वारीसंदर्भात शासन आदेश निघाला असून पायी वारीला मंजुरी न देण्यावर शासन ठाम आहे.
मानाच्या 10 पालखी सोहळ्यांच्या प्रस्थान सोहळ्याबाबत शासनाच्या आदेशात म्हटलं आहे की, देहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी 100 तर उर्वरित 8 सोहळ्यांसाठी 50 वारकऱ्यांना प्रस्थान सोहळ्यात सहभागी होता येईल. मानाचे पालखी सोहळे प्रस्थान ठिकाणाहून विशेष वाहनाद्वारे वाखरी येथे पोहोचल्यानंतर तिथून पंढरपूरकडे दीड किमी अंतर प्रातिनिधीक स्वरुपात पायी वारी करण्यात परवानगी देण्यात आली आहे. यंदाच्या वर्षी सर्व मानाच्या पालखी सोहळ्यांचे पंढरपूरमध्ये दशमीच्या दिवशी आगमन होईल तर पौर्णिमेच्या दिवशी प्रस्थान करण्यास मान्यता देण्यात आली आहे. शासकीय महापूजा, विठ्ठलाशी संतांच्या भेटी गेल्यावर्षीप्रमाणेच करण्यात येणार आहे. तर नित्योपचार परंपरेनुसार सुरु ठेवून आषाढी यात्रा कालावधीत भाविकांसाठी दर्शन बंद ठेवण्यात येणार आहे.
एकादशी दिवशीचा रथोत्सवासाठी रथाऐवजी स्वतंत्र वाहनाने 10 मानकरी आणि मंदिर समितीचे 5 कर्मचारी असे 15 व्यक्ती येतील. यावेळी सोशल डिस्टन्सिंग पाळलं जाईल. संताच्या पादुका भेटीदरम्यान मानाच्या पालखी सोहळ्यातील 40 वारकऱ्यांना परवानगी देण्यात आली आहे. तर वारीसाठीच्या 2 बसमध्ये प्रत्येकी 20 असे 40 वारकऱ्यांची संख्या निश्चित करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
