दोन डोसमधील अंतर तीन महिन्यापेक्षा जास्त झाल्यास पुन्हा नव्याने लसीकरण: डॉ. राहुल पंडित
कोरोनाच्या लसीच्या दोन डोसमधील अंतर तीन महिन्यापेक्षा अधिक लागल्यास पुन्हा लसीकरण करून घ्यावे लागणार असल्याचे मत राज्य कोरोना विशेष कृती दलाचे सदस्य डॉ. राहुल पंडित यांनी व्यक्त केलंय.
मुंबई: सध्या लसीचा तुटवडा अपुरा असल्यामुळे काही लोकांना लसीचा दुसरा डोस मिळण्यास अडचणी निर्माण होत आहे. त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. नागरिकांनी यामुळे घाबरण्याची अजिबात गरज नाही एखादा आठवडा इकडे तिकडे झाला तर काही फारसा पडत नाही. मात्र, सर्वसाधारण व्यक्तीस (ज्याला दोन डोसच्या मध्ये कोणताही संसर्ग झालेला नाही) दोन डोसमधील अंतरास तीन महिन्यापेक्षा अधिक कालावधी लागल्यास पुन्हा लसीकरण करून घ्यावे लागणार असल्याचे मत राज्य कोरोना विशेष कृती दलाचे सदस्य डॉ. राहुल पंडित यांनी एबीपी माझा डिजिटलशी बोलताना व्यक्त केले.
सध्या आपल्याकडे दोन लसी उपलब्ध असून नागरिक त्यांच्याद्वारे लसीकरण करून घेत आहेत. त्यामध्ये कोविशील्डसाठी दोन डोसमधील अंतर 6-8 आठवड्याने तर कोवॅक्सिनसाठीचे अंतर हे महिनाभराने असल्याच्या मार्गदर्शक सूचना यापूर्वीच देण्यात आलेल्या आहेत. भारतात 16 जानेवारीपासून लसीकरण मोहिमेस सुरुवात करण्यात आली असून आतापर्यंत महाराष्ट्रात सर्वात जास्त लसीकरण करण्यात आले आहे. 28 एप्रिल पर्यंत राज्यात 1 कोटी 55 लाख 94 हजार 640 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.
पहिला डोस घेतल्यानंतर काही जणांना संसर्ग झाल्यास त्यांच्या डोसमधील अंतर मात्र तीन महिन्यापेक्षा अधिक असू शकते, त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने दुसरा डोस घ्यावा. लस टप्प्या टप्प्याने उपलब्ध होत आहे. सरकार त्यांच्या पद्धतीने लस मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. कुणीही घाबरून जाण्याची गरज नाही. सर्वांचे लसीकरण केले जाणार आहे. थोडा वेळ लागत आहे. सर्वांनी लसीकरण करून घेतले असले तरी कोरोनाच्या अनुषंगाने जे सुरक्षिततेचे नियम आहेत ते सर्वानी पाळलेच पाहिजे अशी माहिती डॉ. पंडित यांनी या वेळी दिली.
ते पुढे असेही म्हणाले कि, " दोन्ही लसी या सुरक्षित आहे. त्याची परिणामकारता चांगली आहे. सगळ्या पात्र नागरिकांनी लसीकरण करून घेतले पाहिजे. लस घेतल्यामुळे फार कुणाला या आजाराचा संसर्ग होत नाही आणि झालाच तर त्याला सौम्य स्वरूपाची लक्षणे येतात. त्यांना आयसीयूमध्ये जाण्याची गरज भासत नाही. तो आजार लवकर बरा होतो.
महत्वाच्या बातम्या :
- Coronavirus: लसीकरणाचा वेग मंदावल्यास कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करावा लागेल, तज्ज्ञांचा इशारा
- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाही महाराष्ट्र दिन साधेपणानेच; प्रशासनाकडून मार्गदर्शक सूचना जारी
- Pankaja Munde Corona Positive: पंकजा मुंडे यांना कोरोनाची लागण; ताई काळजी घे, धनंजय मुंडे यांची भावनिक पोस्ट