(Source: ECI/ABP News/ABP Majha)
परभणीत स्मशानभूमीअभावी मृतदेहाची अवहेलना, मृतदेहावर दोनवेळा अंत्यसंस्कार करण्याची वेळ
दरम्यान रात्री 12 नंतर सर्वजण घरी परतले दुसऱ्या दिवशी घटनास्थळी जाऊन घरच्या लोकांनी पाहणी केली असता प्रेत अर्धवट अवस्थेत जळाल्याचे दिसल्याने पुन्हा प्रेताला अग्नी देण्यात आली.
परभणी : राज्यात आजही अनेक गावांमध्ये स्मशानभूमीची मोठी समस्या आहे. यामुळे अनेकदा वादही उभे राहतात, मात्र प्रश्न काही निकाली निघत नाही. परभणीत तर स्मशानभूमी नसल्याने एका महिलेवर 2 वेळा अंत्यसंस्कार करावे लागल्याचा धक्कादायक प्रसंग समोर आला आहे. एवढंच नाही तर 25 लिटर डिझेल, 5 लिटर पेट्रोल आणि 10 टायर जाळून मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली. त्यामुळे आणखी किती दिवस अशाच प्रकारची मृतदेहाची अवहेलना सहन करायची, असा प्रश्न स्थानिकांकडून विचारला जात आहे.
परभणीच्या जिंतूर तालुक्यातील चारठाणा येथील बंजारा समाजाला स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध नसल्याने नदीकाठावर उघड्यावर अंत्यसंस्कार उरकले जातात. याच समाजातील 60 वर्षीय रेखा रूपचंद राठोड यांचं काल निधन झालं. अंत्यविधीसाठी प्रेत नदीकाठी नेण्यात आले सायंकाळी 4 वाजता प्रेताला अग्नी देण्यात आली. अग्नी देताच पावसाची रिपरिप सुरू झाली. पावसाचे पाणी अग्नीवर पडत असल्याने रात्री 12 वाजेपर्यंत अग्नी देऊनही प्रेत व्यवस्थित जळाले नाही. दरम्यान रात्री 12 नंतर सर्वजण घरी परतले दुसऱ्या दिवशी घटनास्थळी जाऊन घरच्या लोकांनी पाहणी केली असता प्रेत अर्धवट अवस्थेत जळाल्याचे दिसल्याने पुन्हा प्रेताला अग्नी देण्यात आली.
विशेष म्हणजे अग्नी दरम्यान 15 लिटर डिझेल, 5 लिटर पेट्रोल, गाडीचे 10 रबरी टायर टाकल्यानंतर प्रेत संपूर्ण जळाले. त्यामुळे केवळ स्मशानभूमी नसल्याने या मृतदेहची अवहेलना झाली आहे. प्रत्येक वेळी उघड्यावर प्रेत जाळावे लागत असल्याने पावसाळ्यात एखादा व्यक्ती मृत्यू पावल्यास फारच हाल सोसावे लागत असल्याने या गंभीर बाबीकडे लक्ष घालून स्मशानभूमीला जागा उपलब्ध करून देण्याची मागणी स्थानिक बंजारा समाजाने केली आहे.