(Source: ECI/ABP News/ABP Majha)
महामंडळ वाटपाच्या मुद्यावरून महाविकास आघाडी सरकारमध्ये मतभेद?
सिद्धिविनायक सारखी महत्वाची 12 महामंडळ शिवसेनेकडे आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना महामंडळ देण्यात यावी अशी मागणी होत होती. अखेर आज तीनही पक्षांच्या नेत्यांची महामंडळाच्या वाटपावर बैठक झाली.
मुंबई : महामंडळ वाटपाच्या मुद्यावरुन महाविकास आघाडी सरकारमध्ये पुन्हा एकदा मतभेद होण्याची दाट शक्यता आहे. महामंडळांचं वाटप करण्यासंदर्भात आज सह्याद्री अतिथीगृहावर महाविकास आघाडी समन्वय समिती आणि इतर महत्वाच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीला महाविकास आघाडीमधील तीनही पक्षांचे नेते उपस्थित होते. राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार, जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण उपस्थित होते. तर शिवसेनेकडून मंत्री एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई उपस्थित होते.
महामंडळ वाटपाची चर्चा आजच्या बैठकीत करण्यात आली. त्यामुळे येत्या काही दिवसात महामंडळाच वाटप होणार आहे. मात्र हे वाटप होत असताना पुन्हा एकदा महाविकास आघाडीत वाद होऊ शकतो. तीनही पक्षांना सम-समान महामंडळाचं वाटप होईल अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. तर आमदारांच्या संख्येनुसार महामंडळ वाटप होईल अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. आमदारांच्या संख्येनुसार वाटप केलं तर सर्वाधिक आमदार शिवसेनेचे आहेत. त्यामुळे आमदारांच्या संख्येनुसार महामंडळाचे वाटप झालं तर शिवसेनेला सर्वाधिक महामंडळ मिळतील. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी नाराज होऊ शकतात.
गेले अनेक दिवसांपासून महामंडळ वाटपासंदर्भात राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून सातत्याने मागणी होताना पाहायला मिळत होती. मागील युती सरकारच्या काळात जी महामंडळ शिवसेनेकडे होती ती आजतागायत शिवसनेकडे आहेत. सिद्धिविनायक सारखी महत्वाची 12 महामंडळ शिवसेनेकडे आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना महामंडळ देण्यात यावी अशी मागणी होत होती. अखेर आज तीनही पक्षांच्या नेत्यांची महामंडळाच्या वाटपावर बैठक झाली. मात्र बैठकीनंतर शिवसेना आणि काँग्रेसच्या भूमिका वेगवेगळ्या पाहायला मिळाल्या. त्यामुळे तीनही पक्षातील महामंडळ वाटप झाल्यानंतर पक्षातील कार्यकर्त्यांची समजूत काढण्यासाठी तिनही पक्षाच्या नेतृत्वाला ही तेवढीच कसरत करावी लागणार आहे.